शिक्षणखात्याचा अनागोंदी कारभार !

शाळेत शिकणार्‍याविद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेचे निकाल लागतात. एका शाळेतील सहाव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांचे प्रगतीपुस्तक पाहिल्यावर त्यातील लक्षात आलेल्या काही चुकीच्या गोष्टी समाजापुढे मांडत आहोत. जागृत पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या त्या लक्षात आणून द्याव्यात आणि त्यामध्ये सुधारणा करून घ्याव्यात, अशी अपेक्षा आहे.

१. परीक्षेचा निकाल गुणांद्वारे न देता श्रेणीद्वारे दिल्याचे दुष्परिणाम !

सध्या प्रगतीपुस्तकात विद्यार्थ्यांना मुख्य विषयांच्या परीक्षेचे गुण दिले जात नाहीत. त्याऐवजी 'ए', 'बी', 'सी' आणि 'डी' अशी श्रेणी (ग्रेड) दिली जात आहे. त्यामुळे पुढील तोटे होतात.

अ.विद्यार्थ्यांना आपल्याला प्रत्येक विषयात नेमके किती गुण मिळाले आहेत, हे कळत नाही.

आ.हुशार विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची इच्छा असते. गुण न कळल्यामुळे त्यांचा हिरमोड होतो.

इ.गुण न देता श्रेणी दिल्याने वर्गामध्ये कोण कितवा आला, हे कळतच नाही. वर्गातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये आपला क्रमांक कितवा लागला, हे विद्यार्थ्यांना कळत नसल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना, तसेच इतर विद्यार्थ्यांनाही परीक्षेच्या निकालाचा आनंद घेता येत नाही.

ई.वर्गशिक्षिका परीक्षेची उत्तरपत्रिका पडताळतात आणि गुण देतात. त्यांचे हे श्रम वाया जातात.

चित्रकला, शारीरिक शिक्षण, हस्तकला अशा विषयांकरता श्रेणी देणे योग्य आहे; पण प्रश्नपत्रिका असलेल्या विषयांकरता गुण देणेच योग्य !

२. प्रगतीपुस्तक घरी नेऊ दिले जात नाही !

विद्यार्थ्यांना निकालाच्या दिवशी वर्गातच प्रगतीपुस्तक देतात आणि बघून ते परत शिक्षकांकडे जमा करायला सांगतात. ते त्यांना घरी नेऊ दिले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले प्रगतीपुस्तक सर्वांना दाखवायचा आनंद मिळत नाही. सर्वच पालक निकालाच्या दिवशी आपल्या मुलासोबत शाळेत येऊ शकत नाहीत, तसेच आई-वडिलांपैकी फारतर एखादा जण समवेत येऊ शकतो. त्यामुळे घरातील फारतर एकाला प्रगतीपुस्तक बघायला मिळते, सर्वांना नाही. त्यामुळे घरातल्यांनाही आनंद घेता येत नाही.

३. प्रगतीपुस्तकात मुख्य विषयांसह २० – २५ विषयांचा अनावश्यक भरणा !

प्रगतीपुस्तकात 'शैक्षणिक क्षेत्र (स्कोलॅस्टिक एरिया)' असा गट करून त्यामध्ये मुख्य विषय आणि इतर विषय दिले आहेत, तसेच 'जोड-शैक्षणिक क्षेत्र (को-स्कोलॅस्टिक एरिया)' असे गट केले आहेत. प्रगतीपुस्तकात या प्रत्येकाला श्रेणी दिली जाते. या सर्व विषयांच्या प्रत्यक्ष चाचण्या होत नाहीत, तर विद्यार्थ्याच्या वर्षभरातील वर्तनावरून श्रेणी दिली जाते. त्याचा विद्यार्थ्याला काही उपयोग होत नाही. शिक्षकांना मात्र वर्गातील ४० – ५० मुलांच्या प्रगतीपुस्तकात त्या २० – २५ विषयांकरता श्रेण्या भराव्या लागतात. त्यांचे हे श्रम अनावश्यक ठरतातच, तसेच प्रगतीपुस्तकातील इतक्या श्रेण्या बघून दमायला होते !

Leave a Comment