लाल बहादूर शास्त्री

आपल्या गरीब आई-वडिलांवर ओझे व्हायला नको आणि त्यांचे पैसेही वाचावेत; म्हणून प्रतिदिन गंगा नदी पोहून शाळेत जाणारा असामान्य धाडसी बालक लाल बहादूर शास्त्री !

‘एक मुलगा काशीतील ‘हरिश्चंद्र हायस्कूल’ मध्ये शिकत होता. त्याचे गाव काशीपासून ८ मैल दूर होते. तो तिथून प्रतिदिन चालत शाळेत यायचा. वाटेत येणार्या गंगा नदीला पार करून शाळेत यावे लागत असे. त्या काळात गंगा पार करण्यासाठी नावाड्याला दोन पैसे द्यावे लागत. दोन पैसे जाण्याचे आणि दोन परत येण्याचे, म्हणजे त्या काळातील एक आणा; म्हणजे प्रतिमास जवळपास दोन रुपये व्हायचे. तेव्हा सोन्याचा भाव शंभर रुपये प्रति तोळ्याहून न्यून होता, त्या काळी ही रक्कम पुष्कळच होती.

त्या मुलाने आपल्या आई-वडिलांवर पैशाचा भार नको, असा विचार केला आणि त्यांच्याकडे पैसे न मागता तो पोहायला शिकला. उन्हाळा, पावसाळा किंवा थंडी कोणत्याही ऋतूत नित्यनेमाने पोहून गंगा पार करून शाळेला जायचा त्याचा नेम बनला होता. असे बरेच दिवस गेले. एकदा पौष मासातील थंडीत सकाळच्या शाळेसाठी तो गंगेत उतरला. पोहत-पोहत नदीच्या मध्यभागी आला. एका नावेतून काही यात्री नदी पार करत होते. त्यांनी पाहिले, एक लहान मुलगा नदीत बुडत आहे, असे समजून त्यांनी नाव त्याच्याजवळ घेतली आणि त्याला हाताला धरून वर ओढून नावेत घेतले. त्या मुलाच्या चेहर्यावर भीती, काळजीचा लवलेशही नव्हता. त्याचे असामान्य धाडस पाहून सर्व लोक आश्चर्यचकीत झाले!

लोक :
तू आता बुडून मेला असतास तर ? असे धाडस करणे, योग्य नव्हे !

मुलगा : साहस हा गुण आहे, धाडसी असायलाच हवे. आयुुष्यात विघ्न-संकटे येणारच, त्यांना सामोरे जाण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी धाडस हवेच. आतापासून धाडसी नाही झालो, तर जीवनात मोठमोठी कामे कशी करता येतील ?

लोक : अशावेळी पोहायला कशाला आलास ? दुपारी यायचे ?

मुलगा : मी पोहायला नदीमध्ये उतरलो नाही. मी तर शाळेत चाललो आहे.

लोक : नावेत बसून जायचे !

मुलगा : प्रतिदिन चार पैसे लागतात. माझ्या गरीब आई-वडिलांवर मला ओझे बनायचे नाही. मला स्वतःच्या पायांवर उभे रहायचे आहे. माझा खर्च वाढला तर, आई-वडिलांची चिंता वाढेल. त्यांना घर चालवणे अवघड होईल.

लोक त्याच्याकडे आदराने पहात राहिले, तो मुलगा पुढे भारताचा पंतप्रधान बनला. कोण होता तो मुलगा ? ते होते लाल बहादूर शास्त्री. एवढ्या उच्च पदावर असतांनाही त्यांच्या मध्ये सत्य, निर्मळपणा, प्रामाणिकपणा, साहस, साधेपणा, देशप्रेम इत्यादी सद्गुण होते आणि सदाचाराचे ते मूर्तीमंत स्वरूप होते. असे महापुरुष अल्प काळ राज्य करूनसुद्धा जनसामान्यांवर आपला प्रभाव सोडून जातात.’

– प.पू. संत श्री आसारामजी महाराज (तू गुलाब होकर महक)

Leave a Comment