मोठ्यांप्रती आदरभाव असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद !

महर्षी कर्वे यांना वाकून नमस्कार करणारे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद !

वर्ष १९५९मध्ये पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचा (कॉलेजचा) अमृतमहोत्सव होता. प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ते व्यासपिठावर आले आणि समोर पाहिल्यावर त्यांना महर्षी अण्णा कर्वे व्यासपिठाजवळ बसलेले दिसले. डॉ. राजेंद्रप्रसाद त्वरित व्यासपिठावरून खाली उतरले.ते अण्णांजवळ गेले. त्यांनी अण्णांना वाकून नमस्कार केला आणि ते पुन्हा व्यासपिठावर जाऊन बसले. वास्तविक डॉ. राजेंद्रप्रसाद हेही ज्ञानाने मोठेच होते; पण महर्षी कर्वे यांनी संन्यस्त वृत्तीने केलेली समाजसेवा आणि शिक्षणकार्य या दोन्हींना राष्ट्रपतींनी केलेले ते अभिवादन होते.

– श्री. वेणूगोपाल धूत, उद्योजक आणि भगवद्गीतेचे अभ्यासक (‘दैनिकलोकमत’, ६.४.२०११)

‘न विचारता आंबा काढला, ही चूक झाली’, असे सांगून प्रामाणिकपणाचा आदर्श समोर ठेवणारे दादोजी कोंडदेव !

बाल शिवबाच्या चारित्र्याची जडणघडण परकीय संस्कृतीच्या वातावरणात होऊ नये, म्हणून वडील शहाजीराजे यांनी त्याला दादोजी कोंडदेव यांच्यासमवेत पुण्याला पाठवले. एकदा शहाजीराजांच्या आमराईत फेरफटका मारतांना दादोजींना झाडावर पिकलेला आंबा दिसला. त्यांनी तो स्वतःसाठी काढला. आंबा काढल्यावर त्यांच्या लक्षात आले की, तो आंबा त्यांनी कोणाला विचारून काढलेला नाही. त्यांनी लगेचच शहाजीराजांना पत्र लिहून ‘न विचारता आंबा काढला, ही चूक झाली’, असे कळवले आणि चुकीची शिक्षा म्हणून आंबा काढणारा स्वतःचा हात कापायची सिद्धताही त्यांनी त्या पत्रातून दर्शवली. अर्थात एवढी मोठी शिक्षा दादोजींना कोणीच घेऊ दिली नाही. दादोजींनी मात्र या चुकीची शिक्षा म्हणून आयुष्यभर उजवी बाही कापलेला अंगरखा वापरला.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘दोष घालवा, गुण जोपासा’ ! (प्रकरण २ : गुण का आणि कसे वाढवावेत ?)