चंद्रशेखर आझाद यांचा शौर्यशाली जीवनपट

बनारसला संस्कृतचे अध्ययन करीत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच चंद्रशेखर आझाद यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले, तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फटक्यांची अमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला आणि अहिंसेवरील त्यांचा विश्‍वास पार उडाला. पुढे ब्रिटीश अधिकारी साँडर्सचा बळी घेतल्यानंतर आझाद निरनिराळे वेष पालटून भूमिगत राहिले. काकोरी कटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती. तरी त्या खटल्यातील क्रांतिकारकांना सोडवण्याच्या योजनेत ते गर्क होते. ‘गांधी-आयर्वीन करार’ होत असतांना त्यांनी गांधींना असा संदेश पाठविला की, आपल्या वजनाने भगतसिंह इत्यादींची सुटका आपण करावी, असे झाल्यास हिंदुस्थानच्या राजकारणाला निराळे वळण लागेल, परंतु गांधींनी तो संदेश फेटाळून लावला. तरी आझादांनी क्रांतिकारकांना सोडवण्याचे जोरदार प्रयत्न चालू ठेवले. ‘मी जीवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’, ही आझादांची प्रतिज्ञा होती.

आझाद २७ फेब्रुवारी १९३१ ला शेवटचे प्रयागच्या आल्फ्रेड पार्कमध्ये शिरले. पोलीस अधिक्षक नॉट बॉबरने तेथे येता क्षणी आझादांवर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीस लागली. पण त्याच वेळी आझादांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्याचा हातच निकामी केला. आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला ! वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी आझाद यांनी भारतमातेच्या चरणी प्राणार्पण केले.

(संदर्भ : संकेतस्थळ)

Leave a Comment