त्यागातूनच ईश्वरप्राप्ती शक्य !




बालमित्रांनो, तुकाराम महाराजांची विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे ते सर्व गोष्टींचा त्याग अगदी सहजतेने करू शकले. तुकाराम महाराजांची थोरवी समजल्यानंतर लोक त्यांचा सन्मान करू लागले. तेव्हा ते दूर अरण्यात जाऊन एकांतात ईशचिंतन करू लागले. एकदा दोन मास ते घरी गेलेच नव्हते. एक दिवस त्यांची पत्नी नदीवरून पाणी आणत असतांना वाटेत तिला तुकाराम महाराज भेटले. ती पटकन त्यांना वाटेत अडवून म्हणाली, ”तुम्ही घरी येत नाही. आमची वाट काय ?” तेव्हा तुकाराम म्हणाले, ”पांडुरंग हाच माझा पिता आणि रुक्मिणी हीच माझी माता. तूही त्यांचे पाय धर, म्हणजे ती तुलाही अन्न-वस्त्र पुरवतील.” तेव्हा ती म्हणाली, ”मी हरिचरणांचे स्मरण करीन; पण तुम्ही घरी बसा.” तुकाराम महाराज म्हणाले, ‘तू तसे वचन देत असलीस, तर मी घरी येतो.” तिने तसे वचन दिले आणि दोघे जण घरी आले. तुकाराम महाराज घरी आले त्या दिवशी एकादशी होती. तुळशी वृंदावनाजवळ बसून त्यांनी आपल्या पत्नीला उपदेश केला. त्या उपदेशाने ती प्रभावित झाली. तिने दुसऱ्या दिवशी सूर्योदयी स्नान करून देवपूजा केली आणि ब्राह्मणांस बोलावून सर्व घर लुटवले. नंतर दुपारच्या वेळी घरात अन्न नाही, असे पाहून मात्र ती विचारात पडली. आदल्या दिवशी एकादशीचा उपवास असल्यामुळे ती आणि मुले भुकेने अगदी व्याकुळ झाली.

जगज्जननी त्या संकटात एका महाराणीचे रूप घेऊन तुकाराम महाराजांचे सत्त्व पहाण्यासाठी आली. ती म्हणाली, ”तुम्ही सर्व घरदार ब्राह्मणांकरवी लुटवले असे ऐकले, तर काही उरले असेल, तर मला द्यावे.” ते ऐकून घरात जे एक लुगडे वाळत घातले होते, तेही तुकाराम महाराजांनी तिला दिले. लुगडे दिले ही गोष्ट तुकारामांच्या पत्नीला समजली. तेव्हा तिला राग आला. ती म्हणू लागली, ”दोन मासांनी कालच त्यांना समजावून आणले. त्यांनी उपदेश करून मला कशी भुरळ घातली पहा. ब्राह्मणांकडून सर्वस्वी लुटवले. मुले भुकेने व्याकुळ झाली.” ती संतापली आणि ज्या चरणांच्या चिंतनाने असा अनर्थ झाला, ते पाय फोडून टाकण्याकरिता ती दगड घेऊन जाऊ लागली. तुकाराम महाराजांनी विचारल्यावर तिने खरे कारण सांगितले. ते ऐकून ”तो दगड माझ्या मस्तकावर घाल”, असे तुकाराम महाराज म्हणाले; परंतु ती दगड घेऊन देवळाकडे जाऊ लागली. तुकाराम महाराज तिच्या मागोमाग गेले.

दगड घेऊन ती देवळात येताच रुक्मिणीने दार बंद केले आणि तुकाराम बाहेर राहिले. तुकारामांची पत्नी पांडुरंगाच्या चरणांवर दगड मारणार इतक्यात रुक्मिणीने तिचे हात धरले आणि तुझा कोणता अपराध आम्ही केला, असे विचारले. तेव्हा ती म्हणाली, ”घरात मुले उपाशी असून अन्नासाठी त्यांनी रडून गोंधळ केला आहे. या चरणांनी आमचा घात केला; म्हणून मला राग येऊन मी हे चरण फोडत आहे. रुक्मिणीने तिला समजावून सांगितले, ”तू स्वस्थ बस. तुला संसारात जे जे न्यून पडेल ते ते मी पुरवत जाईन.” मग रुक्मिणीने तिला लुगडे, चोळी, होन देऊन शांत केले. तेव्हा दगड टाकून देऊन तिने जगज्जननीचे पाय धरले आणि आनंदाने घरी गेली.

एवढा उपदेश करूनही आपली बायको उतावळी होऊन रुक्मिणीजवळून होन घेऊन आलेली पाहून तुकाराम महाराजांना फार वाईट वाटले. ते तिला म्हणाले, ”तू परमार्थ दवडलास. त्र+द्धी-सिद्धी, संपत्ती या सर्वांचा त्याग केल्यानेच ईश्वरप्राप्ती होते.” त्यानंतर तुकाराम महाराजांनी तिच्याकडील सर्व होन गोरगरिबांमध्ये वाटून टाकले.

मुलांनो, ईश्वरावर दृढ श्रद्धा असली, तरच आपण त्याग करू शकतो. सर्व आपल्याला ईश्वराच्या कृपेमुळेच मिळालेले असते; पण आपली भक्ती नसल्यामुळे आपल्याला समजत नाही. त्यासाठी नामजप करणे आवश्यक आहे.