मुलांमधील हिंसाचार आणि राष्ट्रवाद

प्रस्तावना

चेन्नईमधील विद्यार्थ्याने शिक्षिकेवर हल्ला केल्याच्या घटनेने केवळ तामिळनाडूतच नव्हे, तर देशभरात सर्वत्र आपला पाल्य आदर्श नागरिक कसा बनेल, याची पालकांना काळजी लागली आहे. प्रचंड नैराश्येतून मुले हिंसाचाराकडे वळत आहेत, असे म्हटले जात आहे. तीन तासांच्या लेखी परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ता सिद्ध करीत सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याची अतिरेकी स्पर्धा हे नैराश्येचे एक कारण आहे.

शिक्षिकेवर विध्यार्थ्याचा हल्ला

चेन्नईच्या सेंट मेरी अंग्लो-इंडियन हायस्कूलमध्ये ९ फेब्रुवारीला एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेला वर्गात चाकूने भोसकून ठार मारले. शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या प्रगती पुस्तकावर तो अभ्यासात कमी पडत असल्याचा शेरा मारला होता. त्यामुळे तो फार दुखावला गेला होता. त्याने तीन दिवस अभ्यासाच्या पडशीत म्हणजे बॅगेत चाकू लपवून ठेवला होता. मुलगा घरचा श्रीमंत असावा कारण तो चारचाकी गाडीतून शाळेत येत असे. तो धट्टाकट्टा आहे; पण अभ्यासात लक्ष देणे त्याला एकंदरीत कमीपणाचे वाटत असावे. या शाळेने नुसती शंभर वर्षे पूर्ण केली आहेत असे नव्हे, तर गुणवत्तेच्या बळावर समाजात प्रतिष्ठा पावलेले अनेक नामवंत विद्यार्थी निर्माण केले आहेत. ही शाळा डॉन बॉस्को शैक्षणिक संस्थेकडून चालवली जाते. मुलाचे नाव मोहमद इरफान असून तो १३ वर्षांचा आहे. शिक्षिकेचे नाव उमा महेश्वरी असून ती चाळीस वर्षांची आहे. तिला दोन मुले आहेत. शाळेत तिच्याविषयी विद्यार्थ्याकडून आणि सहशिक्षकाकडून चांगले बोलले जाते. तिचे शिकविणेही चांगले होते आणि तिचे छात्रांशी वागणेही समंजसपणाचे होते. त्या दिवशी तिसर्‍या तासाला हिंदी शिकविण्यासाठी वर्गात खुर्चीवर बसली असतांना इरफानने वर्गात प्रवेश करून एकदम तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या मानेवर आणि पोटात चाकूने जोरदार वार केले. शिक्षिका तेथल्यातेथे गतप्राण झाली.

नैराश्यातून मुले हिंसाचाराकडे

या घटनेने केवळ तामिळनाडूतच नव्हे, तर देशभरात सर्वत्र जेथे म्हणून आपला पाल्य आदर्श नागरिक कसा बनेल, याची पालकांना काळजी आहे, अशा ठिकाणी काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रचंड नैराश्यातून मुले हिंसाचाराकडे वळत आहेत, असे म्हटले जात आहे. तीन तासांच्या लेखी परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ता सिद्ध करीत सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याची अतिरेकी स्पर्धा हे नैराश्याचे एक कारण आहे. सर्व प्रकारच्या सुखसुविधांनी युक्त असे श्रीमंती आयुष्य आपल्या पाल्यांनी जगावे, अशी इच्छा पालकांच्या मनात मूळ धरते आणि ते त्यादृष्टीने पाल्याचा अभ्यासक्रम निश्चित करतात. सकाळपासून रात्रीपर्यंत शालामहाशाला, तेथे जे शिकविले जाते तेच पुन्हा शिकण्यासाठी खासगी वर्ग, त्या व्यतिरिक्त क्रीडा आणि कला यांच्या प्रत्येकी एखाद्या प्रकाराची साधना करण्यासाठी वेगळा वर्ग असे भरगच्च कार्यक्रम दिवसभराच्या अभ्यासक्रमात कोंबले जातात. आपल्या पालकांच्या आपण सर्वोच्च स्थानावर पोहोचणार असल्याविषयीच्या भयंकर अपेक्षा आणि त्या पूर्ण करू न शकल्यास कुटुंबात आणि समाजात आपली विश्वासार्हता लयाला जाण्याची भीती या तणावाखाली विद्यार्थ्यांची भयंकर मानसिक ओढाताण होत असते. त्यातून कुठेतरी त्यांच्या प्रतिमेला ठेच लागताच त्यांचा समतोल बिघडतो आणि स्वत:ला शांत करण्यासाठी उग्रत्वाकडे धावावे, असे त्यांना वाटू लागते.

काही दृढ संकल्पना पालटण्याची आवश्यकता

आज विद्यार्थी जेवढे स्वत:ला असुरक्षित समजतात, त्याहून अधिक प्रमाणात पालक स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. विद्यार्थी त्यांच्या भविष्याविषयी अनिश्चित असतील कदाचित पण पालकांपुढे त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या मुलाबाळांच्या जीवनात आपण असंबंद्ध झालो असून त्यांना पोसणे आणि त्यांच्या विविध प्रकारच्या आवश्यकता विनातक्रार भागविणे यापलीकडे त्यांचे आणि आपले विशेष प्रकारचे भावनिक नाते पुढील काळात राहू शकेल कि नाही याची पालकांना भीती वाटते आहे. हा प्रश्न सोडवायचा असेल, तर आपल्या काही दृढ संकल्पना बदलाव्या लागतील. लहान मुले निरागस असतात नि त्यांचे आणि मोठ्या माणसांचे जग यात पुष्कळ अंतर असते, असे आपण धरून चाललो आहोत. लहान मुले स्वप्नांच्या विश्वात रहातात, तर मोठ्या माणसांना सतत प्रखर वास्तवाशी टक्कर द्यावी लागत असल्याने त्यांना कधीकधी खोटेपणाने वागावे लागते, लांडीलबाडी करावी लागते. नीतीचा तराजू वाकडा धरावा लागतो. घरसंसार चालू रहावा म्हणून काही वेळा रितीभाती सोडून थोडेसे असभ्यपणे वागावे लागले तरी या कृत्रिमतेचा वारा आपल्या निष्पाप पाल्यांना लागू नये याची काळजी पालक आतापर्यंत घेत असत; परंतु आता परिस्थिती फार बदलली असून मुलांचे कोवळेपण संपले आहे आणि प्रौढत्वाच्या विश्वात त्यांनी अकाली प्रवेश केला आहे. पाल्यांच्या आणि पालकांच्या जीवनक्रमात गुणात्मक फरक फारसा राहिलेला नाही. तथापि जो काही फरक आहे तो भयंकर आहे. तो हा की जे जीवन पालक प्रौढपणी जगत आहेत ते मुले किशोरावस्थेत जगत आहेत.

पाल्य आणि पालक यांच्यातील दरी रूंदावणे

पहिली गोष्ट म्हणजे दोघांची मनोरंजनाची साधने एकच झाली आहेत आणि त्याचा उपभोग दोघे एकमेकांच्या जवळ बसून घेत आहेत. दूरचित्रवाणीवरील करमणूकप्रधान मालिकांचा आस्वाद दोघे शेजारी बसून घेतात. या मालिकांमधील सख्खे नातेवाईक व्यक्तिस्वातंत्रयाच्या नावाखाली क्षुद्र स्वार्थासाठी एकमेकांचा बळी घेतांना दाखविले जातात. तर्कशुद्ध आणि सारासार विचार न करता लेखक, दिग्दर्शक नि निर्माता अनिर्बंध स्वातंत्र्य घेतांना आढळतात. त्यामुळे कुटुंबसंस्था टिकविण्याऐवजी मोडण्याचा संस्कार होतो. लहान मुलांसाठी पाश्चात्त्य देशात ज्या गोष्टीरूप लोकप्रिय मालिका बनविल्या जातात, त्यातील संवादांचे हिंदीत उच्चारण करून आपल्याकडे दाखविल्या जातात. त्यातून अंगी उर्मटपणा बाणतो. आवश्यकता असो वा नसो वडिलधार्‍या माणसांच्या प्रत्येक विधानाकडे संशयाने पाहिले जाते आणि आव्हान दिले जाते. त्यातून दरी निर्माण होते; पण जीवन इतके घाईगडबडीचे झाले आहे की ही दरी वेळीच बुजवायला पालकांना वेळ नसतो. दरी रूंदावत जाते.

मुले विषारी वातावरणात वाढत असणे

संगणकाच्या सहाय्याने मुले स्वत:चा अभ्यास स्वतः करू लागले आहेत. ही चांगली गोष्ट आहे; पण त्यामुळे काही प्रमाणात पालकांची उपयुक्तता कमी झाली आहे. मुलांना संगणकांवरून माहिती मिळते. त्याचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी त्याचा अन्वय लावणे आणि अर्थ सांगणे हे काम थोडेफार पालकांना करावे लागेल. हे अतिशय कष्टाचे काम आहे; पण ते करावेच लागेल. तिसरी गोष्ट वातावरणाची आहे. वातावरण भ्रष्टाचाराने परिपूर्ण व्याप्त आहे. भ्रष्टाचार वैचारिक, मानसिक आणि आचरणातला आहे. आपण हिंदू म्हणून या देशात अधिकाराने जगूच शकत नाही, आपल्याला जगायचे असेल, तर जे जे हिंदू म्हणून आपल्याला हवेहवेसे वाटते त्याचा परिस्थिती समोर येईल त्यानुसार त्याग करावा लागेल, अशी भयंकर नैराश्याची भावना काँग्रेस संस्कृतीने हिंदूंच्या मनात घट्टपणे रूजविली आहे. त्यामुळे सगळ्या देशातले वातावरण जे हिंदू विचारांनी आणि संस्कारांनी भारून जायला पाहिजे होते, ते न होता मोठी पोकळी उत्पन्न झाली. ही पोकळी आक्रमक इस्लाम भरून काढत आहे. वैचारिक आणि मानसिक पातळीवर महायुद्ध चालू आहे. भ्रांतराष्ट्रवादाची कल्पना आणि अहिंसा व्रताचे पालन यामुळे हिंदूंना नाकर्तेपणाने घेरले आहे. परिणामी हे युद्ध एकाच दिशेने चालू आहे. हिंदूंवर युद्धबंदी असल्यामुळे त्यांनी त्यांची सगळी ऊर्जा राष्ट्रव्यापी भ्रष्टाचार या एकमेव उद्योगात गुंतवली आहे. हिंदूंवर प्रथम वैचारिक भ्रष्टाचार लादण्यात आला. त्याची पुढची पायरी आर्थिक भ्रष्टाचार आहे. प्रत्येक माणसाला भारतात भ्रष्टाचार करण्यास प्रवृत्त केले जाते. कोणताही लहानमोठा व्यवहार असो लाच दिल्यावाचून वा घेतल्यावाचून पुरा होत नाही, अशी सवय भारतीयांना लागली आहे. आपली लहान मुले या विषारी वातावरणात वाढत आहेत.

चित्रपटातील नायक-नायिकांचा परिणाम मुलांवर होणे

प्रत्येक माणसात प्रतिकाराची, संघर्षाची आणि युद्धाची खुमखुमी असते. भारताचा सर्वात मोठा शत्रू इस्लामी आतंकवाद असूनही त्याविरुद्ध साधा निषेध व्यक्त करायलाही बंदी असल्याने ऊर्जेने भ्रष्टाचाराचा मार्ग शोधला. तथापि संघर्षाची प्रेरणा त्यामुळे शमत नव्हती. ती शमविण्यासाठी आंतरिक पारिवारिक हिंसाचार हा मार्ग पुढे आला. चेन्नईची गोष्ट हे सांगते की निषेध, मतभेद किंवा राग व्यक्त करण्याचे सभ्य मार्ग अवलंबितांना आपले राजकारणी, चित्रपट नायक-नायिका, विचारवंत दिसत नाहीत. त्याचा दुष्परिणाम अनुकरणशील लहान मुलांवर होतो आहे. दुसरे कोणी विचार करो वा न करो; पण हिंदुत्वनिष्ठ संघटनांना या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपली कार्यशैली लहान मुलांना खिळवून टाकील, अशी गतिमान, सखोल आणि चित्ताकर्षक करावी लागेल.

लेखक :श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment