मुलांची भीती कशी घालवावी ?

भीती

‘भीतीमुळे माणूस धोकादायक प्रसंगांपासून दूर पळतो. आग किंवा गुंड यांपासून तो दूर पळतो, त्या वेळी त्याची भीती योग्य असते; परंतु काल्पनिक गोष्टी, तसेच अंधार, झुरळ इत्यादीविषयींची भीती अयोग्य असते. भीती जाण्यासाठी उपाययोजना करावी लागते.

भीती कशी घालवावी ?

१. रात्रीच्या वेळी अंधारामुळे मूल लघवीला जाण्यासाठी घाबरत असेल, तर तेथे दिवा चालू ठेवावा.

२. बर्‍याच वेळेला असे आढळते की, उडते झुरळ खोलीत दिसल्यास आईचीच घाबरून त्रेधातिरपिट उडते. अशा आईची मुले साहजिकच झुरळाला घाबरू लागतात. त्यामुळे मुलांसमोर आईने न घाबरता खंबीर रहावे.

३. भीती धोकादायक प्रसंगांनी निर्माण झाल्यास तसे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करावा,
उदा. एखादा गुंड शाळेच्या वाटेत त्रास देत असेल, तर शाळेचा मार्ग बदलणे इष्ट असते.

४. एखादा प्रसंग टाळताच येत नसेल, उदा. एखाद्या व्यक्तीचा असाध्य कर्करोग झाला असेल, तर त्याने तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा. ‘प्रत्येक रोग आपणच पूर्वी केलेल्या पापकर्मांचे फळ म्हणून आपण भोगत आहोत’, अशी निश्चिती झाल्यावर आपल्या पापातून मुक्त होण्यासाठी तो कर्करोगाचा आनंदाने स्वीकार करू शकतो.

५. ‘देह नश्वर असल्यामुळे मृत्यू कुणालाच टाळता येत नाही आणि प्रत्येकाचा आत्मा अमर असल्यामुळे मृत्यूविषयी भीती बाळगण्याचे कारणच नाही’, असेही मनावर बिंबवावे.

शरिराने आणि मनाने दुर्बल असलेली माणसेच भित्री असतात. ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ ही म्हण सर्वश्रुत आहेच. भगतसिंग, स्वा. सावरकर इत्यादी देशभक्तांनी निर्भीडपणे आणि मृत्यूला न भिता जुलमी ब्रिटीश सत्तेविरुद्ध तोंड दिले. त्यांच्या त्यागाची फळे आज आपण उपभोगत आहोत.

उपनिषदात म्हटलेलेच आहे, ‘ आपला दुसर्‍याशी संबंध आल्यावर तो आपल्याला फसवेल कि काय, अशी आपल्याला सतत भीती असतेच. म्हणून साधुसंतांनी सांगितल्याप्रमाणेच सर्वत्र समदृष्टी झाल्यावर, म्हणजेच, ‘मी-तू पणाची झाली बोळवण’, अशी अवस्था प्राप्त झाल्यावर आपोआपच भीतीचा लवलेशही उरत नाही.’

– डॉ. वसंत बाळाजी आठवले, बालरोग तज्ञ (खिस्ताब्द १९९०)

Leave a Comment