पालकांनो, तरुणांची सामाजिक नीतीमत्ता ढासळत आहे, हे लक्षात घ्या !

१. तरुणांची अयोग्य विचारसरणी

अ. जगातील सर्व गोष्टी या आपल्याच उपभोगासाठी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांचा आस्वाद घेणे, हे आपले कर्तव्य आहे, असा भोगवादी विचार तरुण पिढीकडून सर्रास मांडला जात आहे.

आ. श्रीमंत तरुणांना वेगाने वाहन चालवणे आणि अपघात घडवणे, म्हणजे गडगंज संपत्तीचे प्रदर्शन वाटते.

२. तरुणांमध्ये गुन्हेगारी कृत्ये करण्याची मानसिकता वाढण्याची कारणे

अ. तरुण पिढीला भावना, लालसा, हव्यास अशा गोष्टींचे सोयरसुतक नसते, हा तर त्यांचा स्थायीभाव झाला आहे. कशाही प्रकारे सुखाची लालसा पुरी करण्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली, तरी चालेल, अशी मानसिकता असणारी तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळतआहे.

आ. राजकीय गुन्हेगार काळी कृत्ये करून कायद्याला वाकुल्या दाखवतात, हे तरुण पिढी पहात आहे. त्यामुळे जिद्द, साहस आणि तत्त्वनिष्ठा यांकडे तरुण मुले दुर्लक्ष करत आहेत.

इ. आजची तरुण पिढी समाजात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अवैध मार्गाने संपत्ती मिळवण्याचा अट्टहास करीत आहे.

ई. खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार झाल्यानंतर तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत आहे. जोपर्यंत त्यांना शिक्षेचे गांभीर्य कळत नाही, तोपर्यंत त्यांना पश्चात्ताप होणार नाही.

३. तरुणांकडून होत असलेले पाश्चिामात्यांचे अंधानुकरण !

अ. दूरचित्रवाहिन्यांवरील असंस्कृत मालिकांच्या चित्रणामुळे सुसंस्कृत तरुण हबकून गेल्याचे, तर असंस्कृत तरुण पिढी बहकल्याचे पहावयास मिळत आहे.

आ. तरुण मुले पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करत असून संस्कारांची होळी करत आहेत.

इ. आज शहरात पब (मद्यालये), डान्स बार, हुक्कापार्लर निर्माण झाल्यामुळे तरुण मौजमजा करण्यासाठी घरातील पैसे चोरत आहेत.

ई. आजचे तरुण पैशाच्या जोरावर केलेली अनैतिक कृत्ये पाहतात, त्यामुळे त्यांची सामाजिक नीतीमत्ता ढासळत आहे. त्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे.

४. पालकांच्या अयोग्य भूमिका !

अ. जागतिकीकरणाचा संस्कृतीवर परिणाम होणे, हे स्वाभाविकच असले, तरी त्यांना मार्गदर्शन करणारे कुणीही नाही. अगदी पालकही ती भूमिका निभावत नाहीत.

आ. पूर्वी दिवे लागण्यापूर्वी घरी परत येण्याचा पायंडा होता. परंतु आज रात्री-अपरात्री घरी येणार्‍याया मुलांचे पालकांना कौतुक वाटते. हाच पालकांचा दृष्टीकोन मुलांचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहे.

५. पालकांनो, भरकटलेल्या तरुण पिढीला दिशा देण्यासाठी हे करा !

अ. मुलांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी पालकांनी मुलांबरोबर संवाद साधणे आवश्यक आहे.

आ. पालकांनीच संस्कारांचे ओझे मुलांवर ठेवले, तर मुले गुन्हेगारी करण्यापासून परावृत्त होतील आणि देशाच्या विकासाला हातभार लावतील.

– शिवदास शिरोडकर, लालबाग, मुंबई. (दैनिक लोकसत्ता, २५ डिसेंबर २०१०)