समर्थांची साधना
मुलांनो, राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांची ‘जय जय रघुवीर समर्थ’ ही घोषणा तुम्हाला ठाऊकच असेल. कठोर साधनेमुळे लहान वयातच त्यांना प्रभु श्रीरामाचे दर्शन झाले.

नारायण म्हणजेच आपले समर्थ रामदासस्वामी लहान असतांना इतर मुलांसारखेच फार हूड होते. अत्यंत बुद्धीमान; पण हूड नारायण पूर्ण देवभक्त होता. लहानपणापासूनच त्याचे लक्ष इतर गोष्टींपेक्षा देवभक्तीकडे होते. त्याची श्रीरामावर फार भक्ती होती. त्याचा जास्तीतजास्त वेळ परमेश्वराच्या चिंतनातच जात असे. चिंतनानंतर त्याला असे आढळून आले की, खरे ज्ञान होण्यासाठी आपणास गुरूंकडून उपदेश मिळाला पाहिजे. तेव्हा नारायणाने आपले वडीलबंधू गंगाधर यांना उपदेश देण्याची विनंती केली. नारायणाची ही विनंती ऐकून ते म्हणाले, ”अजून तू लहान आहेस. तुझे खेळण्याचे वय असल्यामुळे थोडा मोठा झालास की, उपदेश देईन.” या बोलण्याने तो हिरमुसला झाला नि गावातल्या मारुतीरायाच्या देवळात एका आडोशाला मारुतिरायाने गुरुपदेश दिल्याविना बसल्या जागेवरून उठायचे नाही, असा निश्चय करून ध्यान करत बसला. त्या वेळी प्रत्यक्ष प्रभु श्रीरामचंद्राने प्रगट होऊन नारायणाला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ या मंत्राचा उपदेश दिला. गुरूंचा उपदेश मिळाल्याने नारायण आनंदित झाला आणि आपला बहुतेक वेळ परमेश्वराच्या चिंतनात घालवू लागला.

त्याचे हे श्रीरामाचे वेड त्याच्या आईला ठाऊक होते. श्रीरामाच्या भक्तीत पूर्णपणे विरघळून गेलेल्या नारायणाचे मन संसारात रमावे यासाठी तिने त्याचे लग्न करायचे ठरवले. त्या वेळी त्याचे वय होते अवघे बारा वर्षे. आई म्हणाली की, ‘शुभमंगल सावधान’ होईपर्यंत माझे ऐक. आईची आज्ञा म्हणून बाल नारायण लग्नासाठी मंडपात येऊन उभा राहिला. मनातील श्रीरामाची मूर्ती स्वस्थ बसू देईना. अक्षता पडायच्या वेळेला जेव्हा ब्राह्मणांनी ‘शुभ मंगल सावधान’चा गजर केला, त्या क्षणी त्याने लग्नमंडपातून धूम ठोकली. पळत पळत तो नाशिकच्या पंचवटीत आला. तिथल्या श्रीरामाच्या मूर्तीचे डोळे भरून दर्शन घेतले आणि तेथूनच जवळ असलेल्या दोन मैलांवरच्या टाकळी या गावी गेला. पुढे त्यांनी गोदावरी आणि नंदिनी नद्यांच्या संगमस्थानी राहून बारा वर्षे तपश्चर्या केली. सूर्योदयापासून सूर्य मध्यान्ही येईपर्यंत गोदामाईच्या कमरभर पाण्यात उभे राहून तेरा कोटी श्रीरामनामाचा त्रयोदशाक्षरी जपाचा संकल्प पूर्ण केला. छोटा नारायण आता नारायण न रहाता ईश्वरासारखा तेजस्वी, दैदीप्यमान पुरुष झाला होता. छातीपर्यंत दाढी, पायात खडावा, भगवे वस्त्र अणि प्रत्येक श्वासागणिक श्रीरामाचे नाम. भोवतालचे सर्व लोक त्यांना समर्थ रामदासस्वामी म्हणून ओळखू लागले होते. दोन तपे साधनेत घालवल्यामुळे प्रत्यक्ष श्रीरामाचे मार्गदर्शन त्यांना पदोपदी होत होते. पुढे प्रभु श्रीरामाच्या आज्ञेवरूनच समर्थांनी श्रीरामाच्या उपासनेचा संप्रदाय चालू केला, तोच समर्थ संप्रदाय. ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ असे त्यांनी म्हटले ते खरे करून दाखवले. समर्थ देहरूपाने गेले; पण आपल्या शिकवणीमुळे ते अजरामर झाले. समर्थांनी ‘दासबोध‘ नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये सर्वांनी कसे वागावे, ईश्वर भक्ती म्हणजे साधना कशी करावी, हे सांगितले आहे.

मुलांनो, साधना म्हणजे काय, हे तुम्हाला कळलेच असेल. या कलियुगात सोप्यातसोपी साधना नामसाधना सांगितली आहे. प्रत्येकाने आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करावे. कुलदेवतेच्या नामस्मरणामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होते.