परीक्षेतील अपयशाच्या कारणांवर उपाय योजावेत !

मुलांनो, तुम्ही नियमित अभ्यास करूनही तुम्हाला परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत, तर वाईट वाटून घेऊ नका. ‘अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे’, असा विचार करा. मात्र अपयशाच्या कारणांचा अवश्य विचार करून त्यांच्यावर उपायही काढा. अपयशाची काही नेहमीची कारणे आणि त्यांवर योजावयाचे उपाय पुढे दिले आहेत.

१. अपयशाचे कारण – अभ्यास मनापासून न करणे

सर्वसाधारणपणे मुलांना अभ्यास करायचा कंटाळा येतो, पण गोष्टीची पुस्तके, रहस्यकथा अन् खेळ या गोष्टी मनापासून आवडतात. मुलांना अभ्यास करायला फारसे आवडत नाही; कारण अभ्यास करतांना प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचावा
लागतो, संबंधित विषयावर मन एकाग्र करावे लागते आणि विषय समजून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. मुलांसमोर अनेक आकर्षणेही असतात, उदा. दूरचित्रवाणीवरील ‘कार्टून्स’, क्रिकेटचा सामना, चित्रपट. यामुळे मुले अभ्यास मनापासून करत नाहीत.

उपाय

अ. अभ्यासाचे महत्त्व मनावर बिंबवावे !

१. मुलांनो, समजा एखाद्याला चांगला खेळाडू बनायचे असेल, तर त्यान प्रतिदिन व्यायाम करणे, खेळाचा सराव करणे या गोष्टी कराव्याच लागतात ना ? तुमच्या मनातही ‘आपले भवितव्य उज्ज्वल असावे’, अशी इच्छा असतेच, मग त्यासाठी अभ्यास करणे, हे आवश्यकच आहे.

२. अभ्यास करणे, ही एक तपश्चर्याच आहे. ती केल्यास ज्ञानवृद्धी होते. या ज्ञानाचा आनंद उपभोगण्यासाठी भरपूर अभ्यास करायला हवा. मुलांनो, तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येत असेल, तर तुम्ही प्रतिदिन अभ्यासाचे वर सांगितलेले महत्त्व पुन्हा पुन्हा आठवा. यामुळे अभ्यासाचे महत्त्व तुमच्या मनावर बिंबेल.

आ. मनाला ‘स्वयंसूचना’ द्यावी !

प्रसंग – कु. गुरुदासने दिवसभरात अभ्यासाच्या वेळा ठरवलेल्या आहेत; परंतु अभ्यासाची वेळ उलटून गेली, तरी तो अभ्यासाला न बसता खेळतच रहातो.

स्वभावदोष – अभ्यासाचे गांभीर्य नसणे

कु. गुरुदासने द्यायची स्वयंसूचना – अभ्यासाची वेळ उलटून गेल्यावरसुद्धा जेव्हा मी खेळतच असेन, तेव्हा ‘मी वेळच्या वेळी अभ्यास केला, तरच परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईन’, याची मला जाणीव होईल आणि मी लगेच अभ्यासाला बसेन.

२. अपयशाचे कारण – अभ्यास करतांना मन एकाग्र न होण

एखादे दृश्य दिसले की, त्याच्या संदर्भातही आपल्या मनात विचार येतात. एखादा मुलगा भावनाप्रधान असेल, तर त्याच्या मनात पुढील प्रकारे विचारमालिका चालू होते – भावाने चिडवल्याची आठवण – आई भावावर ओरडल्याचा प्रसंग – बाबा – शेजारी इत्यादी. थोडक्यात अभ्यासाचे पुस्तक दृष्टीसमोर असले, तरी मनात इतर विचार येतात. त्यामुळे मन अभ्यासावर एकाग्र होऊ शकत नाही. मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी काय करायला पाहिजे हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

३. अपयशाचे कारण – स्मरणशक्ती अल्प असण

साधारणतः एकाग्रता आणि स्मरणशक्ती या जोडीनेच असतात, म्हणजेच एखाद्याचे मन चांगले एकाग्र होऊ शकत असले, तर त्याची स्मरणशक्ती चांगली असते आणि मन एकाग्र होत नसेल, तर स्मरणशक्ती चांगली नसते. याचे कारण म्हणजे मन एकाग्र करून काही वाचले, तर ते अंतर्मनापर्यंत पोहोचते आणि चांगल्या प्रकारे लक्षातही रहाते.

उपाय

अ. स्मरणशक्तीचा खेळ खेळावा

लहान मुले स्मरणशक्तीचा खेळ खेळतात. या खेळामुळे शब्द लक्षात ठेवण्याचा सराव होतो. साधारणतः १५- २० शब्द आठवतील इतका सराव झाला की, स्मरणशक्ती वाढते.

आ. ‘स्मरणशक्तीविषयक योगासन’ करावे

हे योगासन शक्यतो सकाळी करावे.

अ. दोन्ही पाय जुळवून ताठ उभे रहावे.

आ. कुलदेवतेचे किंवा उपास्यदेवतेचे मनोमन स्मरण करावे.

इ. पायांपासून समोर साधारण ५ फूट अंतरावर दृष्टी भूमीवर स्थिर करावी.

ई. मानेचा कोन / स्थिती त्याच अवस्थेत ठेवून टाळूवर मन एकाग्र करावे. त्याच स्थितीत मोठ्याने आणि भराभर १२ ते १५ वेळा श्वासोच्छ्वास करावा. यामुळे मोठ्या मेंदूला अधिक रक्तपुरवठा होऊन स्मरणशक्ती सुधारते.

४. अपयशाचे कारण – परीक्षेची भीती वाटणे

परीक्षा जवळ आली की, तुमच्यापैकी अनेकांच्या पोटात गोळा येतो. काहीजण तर चक्क आजारी पडतात. परीक्षेची वाटणारी भीती किंवा चिंता घालवण्यासाठी काय करायचे, या संदर्भातील माहितीसाठी येथे क्लिक करा.

५. अपयशाचे कारण – स्वभावदोषांचे प्रमाण जास्त असणे

आळस, चालढकलपणा, वेळेचे सुनियोजन न करणे, गांभीर्य नसणे, आत्मविश्वास नसणे, अती आत्मविश्वास असणे यांसारखे स्वभावदोष असलेल्या मुलांकडून अभ्यास व्यवास्थित होत नाही. तसेच स्वभावदोष जास्त असलेल्या मुलांच्या मनाची शक्ती अनावश्यक गोष्टींवर व्यय (खर्च) होत असते. त्यामुळे अशा मुलांच्या कार्यक्षमतेचा परिपूर्ण वापर होत नाही. त्यामुळे अशा मुलांना परीक्षेत यश मिळत नाही. स्वभावदोष दूर करण्यासाठी पद्धतशीरपणे आणि नेमके प्रयत्न कसे करायचे, या संदर्भातील माहितीसाठी येथे क्लिक करा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘अभ्यास कसा करावा ?