रात्रीच्या जागरणाऐवजी पहाटे उठून अभ्यास करा !

        विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रात्री जागरण करून अभ्यास करायची सवय आहे का? तुम्ही कधी पहाटे उठून अभ्यास केला आहे का ?

        मित्रांनो, लक्षात घ्या, रात्री अभ्यास करण्यासाठी जेवढी मनाची, बुद्धीची आणि शरीराची शक्ती खर्च होते, त्यापेक्षा अत्यल्प शक्ती पहाटे अभ्यास करतांना खर्च होते ! त्यामुळे अतिशय अल्प वेळात तुमचा अधिकाधिक चांगल्या प्रकारे अभ्यास हा पहाटेच्या वेळी होऊ शकतो. उदाहरणार्थ एखादा भाग वाचून लक्षात ठेवायचा असेल आणि रात्री तुम्ही हा प्रयत्न करत असाल, तर जो वेळ आणि शक्ती लागेल त्यापेक्षा खूप कमी वेळ आणि शक्ती पहाटेच्या वेळी लागेल ! त्यामुळे पहाटे केलेला अभ्यास अधिक चांगला लक्षात रहातो.

        याचे कारण पहाटे वातावरणात सात्त्विकता अधिक असते. त्यामुळे आपले मन, शरीर आणि बुद्धी यांवर रज-तमाचे आवरण अत्यल्प असते. रात्री वातावरणात तमोगुण वाढलेला असतो, त्याचा परिणाम आपले मन, शरीर आणि बुद्धी यांवर होऊन त्यांची सात्त्विकता कमी होते. आपण जेवढे अधिक सात्त्विक असतो, तेवढी आपली ग्रहण आणि आकलन क्षमता अधिक असते. पूर्वीच्या काळी विद्यार्थी  ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत असत.

        दिवसभर आपण विविध कृती आणि विचार करत असतो. त्यामुळे या कृती आणि विचार यांमुळे मन, शरीर आणि बुद्धी थकलेले असतात आणि त्यांच्यावर ताण आलेला असतो. पहाटेच्या वेळी रात्रीच्या विश्रांतीमुळे हा ताण दूर झालेला असतो.

        पहाटेच्या वेळी वातावरण सात्त्विक असण्यामागचे कारण म्हणजे जगाने त्याचे व्यवहार चालू केलेले नसतात, त्या वेळी हिमालयातील अज्ञात ऋषीमुनी, तसेच संत आणि साधक त्यांची साधना करत असतात. त्याच्या सात्त्विक लहरी वातावरणात पसरतात. रज-तम अल्प असल्याने त्या लहरी आपण ग्रहण करू शकतो. अनेक प्रसिद्ध गायकही पहाटे उठून गायनाचा सराव करत असल्याचे तुम्ही ऐकले असेल.

        पहाटेच्या वेळी आपल्या शरिरातील वात, कफ इत्यादी पदार्थ उत्सर्जित होण्याची क्रिया अधिक चांगल्या प्रकारे शक्य होत असल्याने उत्साह वाढतो.  ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास आरोग्य, धनसंपत्ती मिळे ।’, असे म्हटले आहे. म्हणून मुलांनो लवकर निजा आणि लवकर उठा आणि अभ्यासातील एकाग्रता साधून यशाचे धनी व्हा!

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’