अभ्यासाच्या माध्यमातून गुणसंवर्धन

अभ्यास करतांना स्वतःमध्ये गुण कसे येऊ शकतात किंवा असलेले गुण कसे वाढू शकतात, यांसंबंधी लक्षात आलेली सूत्रे पुढे देत आहे.

व्यावहारिक गुण कसे अंगी येतात ?

अ. व्यवस्थितपणा : वह्या-पुस्तके ठरलेल्या ठिकाणी ठेवल्यास व्यवस्थितपणा हा गुण येतो.

आ. चांगली सवय लागणे : जसा नामजप प्रतिदिन केल्यावर त्याची सवय लागते, तसा अभ्यास प्रतिदिन केल्यावर त्याचीसुद्धा सवय लागते.

इ. एकाग्रता : बराच वेळ एका ठिकाणी बसून अभ्यास केल्यावर एकाग्रता वाढते.

ई. चिकाटी : प्रतिदिन अभ्यास केल्यावर चिकाटी वाढते.

उ. संयम : अभ्यास भरपूर असेल, तेव्हा धीर न सोडता तो पूर्ण कसा करावयाचा, हे शिकायला मिळते. यातून संयम वाढतो.

ऊ. प्रामाणिकपणा : परीक्षेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर नीट येत नसल्यास, ते दुसर्‍याचे न बघता (‘कॉपी’ न करता) स्वतःला येते, तेवढेच लिहिण्याने प्रामाणिकपणा विकसित होतो.

बौद्धिक गुण कसे अंगी येतात ?

अ. नियोजनबद्धता : अभ्यासाचे नियोजन केल्यास किती दिवसांत, किती घंटे (तास) अभ्यास केल्यावर विषय पूर्ण होईल, हे कळते. यामुळे नियोजन करण्याची सवय लागते.

आ. निर्णयक्षमता वाढणे : दोन महत्त्वाच्या विषयांत कुठला विषय जास्त महत्त्वाचा आहे, हे ठरवावे लागते आणि त्यानुसार अभ्यासाला प्राधान्य द्यावे लागते. यामुळे निर्णयक्षमता वाढते.

इ. पूर्वसिद्धता करणे : आधीपासूनच सर्व प्रकारची सिद्धता (तयारी) केली, तर परीक्षेच्या वेळी ताण येत नाही, हे समजल्याने कोणत्याही कामासाठी पूर्वसिद्धता करण्याची सवय लागते.

ई. वेळेचे महत्त्व समजणे : उत्तरपत्रिका लिहितांना वेळ किती महत्त्वाचा आहे आणि काही मिनिटेसुद्धा कशी महत्त्वाची आहेत, हे कळते.

आध्यात्मिक गुण कसे अंगी येतात ?

अ. जिज्ञासूवृत्ती वाढणे : प्रत्येक विषयात पुढचे पुढचे शिकायला मिळते आणि जिज्ञासाही वाढते.

आ. विचारून घेण्याची सवय लागणे : एखादे सूत्र न कळल्यास ते शिक्षकांना विचारावे लागते.

. तत्परता : मनात आलेली शंका शिक्षकांना तत्परतेने विचारायला शिकतो.

. इतरांकडे लक्ष न देणे : एखादा प्रश्न किंवा शंका वर्गात शिक्षकांना विचारल्यास इतर विद्यार्थी हसतील, हे ठाऊक असूनही शंकानिरसन करून घ्यावे लागते.

उ. उत्साह वाढणे : प्रतिदिन नवीन शिकायला मिळाल्यामुळे उत्साह वाढतो.

ऊ. सातत्य : शाळेत / महाविद्यालयात प्रतिदिन जाणे आणि प्रतिदिन अभ्यास करणे, यांमुळे त्यात सातत्य येते.

ए. तळमळ वाढणे : एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर त्याचे उत्तर मिळवण्याची तळमळ वाढते.

ऐ. स्वभावदोष-निर्मूलन : उत्तरपत्रिका पडताळल्यावर (तपासल्यावर) शिक्षक चुका सांगतात, त्यामुळे स्वभावदोष (उदा. घाई करणे) कळतात आणि त्यांचे निर्मूलन करण्याची संधी मिळते.

ओ. अहं-निर्मूलन : गुण अल्प (कमी) मिळाल्यावर आपोआप अहं-निर्मूलन होते. मित्र / मैत्रीण यांना एखादा प्रश्न विचारल्यास त्यांनी ‘एवढेही तुला येत नाही’, असे म्हटल्यावर अहं-निर्मूलन होते.

औ. मनाविरुद्ध कार्य करणे : अभ्यासाची इच्छा नसतांना अभ्यास करण्यास बसल्यावर मनोलय होण्यास साहाय्य होते. विषय आवडता असो कि नावडता त्याचा अभ्यास करावाच लागतो; म्हणून आवड-नावड घटते.

अं. दुसर्‍यांचे साहाय्य घेणे आणि त्यांना साहाय्य करणे : एखादे कठीण गणित न कळल्यास अन्य विद्याथ्र्यांना विचारावे लागते, तसेच त्यांनाही एखादे गणित न कळल्यास साहाय्य करावे लागते.

क. तळमळीने प्रार्थना करणे : एखादा विषय जास्त अवघड असला, तर ईश्वराला ‘मला खरंच काही येत नाही, तू साहाय्य कर’, अशी तळमळीने प्रार्थना होते.

. अंतर्मुखता येणे : अन्य विद्यार्थी जेव्हा जास्त गुण मिळवतो, तेव्हा ‘मी कुठे मागे (कमी) पडलो’, याविषयी अंतर्मुखतेने विचार होतो.

ग. कृतज्ञता वाढणे : परीक्षेत अभ्यास केलेल्या भागावरच प्रश्न येतात, तेव्हा ईश्वराप्रती कृतज्ञता वाटते.

घ. त्याग : अभ्यासाच्या दिवसांत पाहुणे आल्यास त्यांच्यासमवेत बाहेर फिरायला जाता येत नाही, त्या प्रसंगी त्याग शिकतो.

च. आनंद मिळणे : अभ्यास मनापासून केला की, समाधान आणि आनंद मिळतो.

हे ईश्वरा, अभ्यास ही एक सत्सेवाच आहे, हे शिकवलेस आणि तसे केल्यास त्यातून विकसित होणारे गुणही दाखवून दिलेत, यासाठी मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘हे सगळे गुण आम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये येऊ देत’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’

– कु. प्राजक्ता घोळे, चंदीगड