जेथे भक्ती तेथे देवाची वस्ती

मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांची विठ्ठलभक्ती अपार होती. ते सतत विठ्ठलाच्या नामस्मरणातच गुंग असत. मात्र गावातील काही कुटिल लोक त्यांना फार त्रास देत असत. या त्रासाला कंटाळून एके दिवशी चोखोबांनी गाव सोडले आणि आपली पत्नी सोयरा हिच्यासह ते पंढरपूर येथे आले.

चोखोबा पंढरपुरात एक झोपडी बांधून राहू लागले. त्यांची विठ्ठलाची उपासना चालू होती. विठ्ठलदर्शनाच्या त्यांच्या प्रचंड ओढीमुळे एकदा देवळाला कडीकुलपे असतांनाही चोखोबा आपोआप विठ्ठलाच्या चरणांपर्यंत पोहोचले. तेव्हापासून तेथील पुजाऱ्यांनी देवळात जागता पहारा ठेवला. शेवटी चोखोबांची विठ्ठलाला भेटण्याची तीव्र तळमळ पाहून देवच त्यांच्या घरी त्यांना भेटावयास जाऊ लागला. आता चोखोबा आपल्या घरीच तृप्त मनाने विठ्ठलाच्या सेवेत मग्न राहू लागले.

एकदा विठ्ठलाने चोखोबांना ‘मी तुझ्याकडे जेवायला येतो’, असे सांगितले. हे कळताच सोयराला फार आनंद झाला. देवाला काय बरे खाऊ घालावे, या विचारातच नदीवर भेटलेल्या एका स्त्रीजवळ तिने काही पदार्थ मागितले. बोलता बोलता सोयराने प्रत्यक्ष विठ्ठल आपल्याकडे जेवायला येणार असल्याचे सांगितले. हे ऐकून त्या स्त्रीला धक्काच बसला. हा हा म्हणता ही वार्ता गावात पसरली. अनेकांनी ही गोष्ट थट्टेवारी नेली. या गोष्टीवर कोणी विश्वासच ठेवला नाही.

एक गृहस्थ मात्र रात्री लपतछपत चोखोबांच्या झोपडीजवळ आला. त्याने डोकावून आत पाहिले, तो काय आश्चर्य ! आत विठ्ठलमूर्तीच्या पायांशी चोखोबा बसले होते. जवळच सोयरा नम्रतेने उभी होती. चोखोबा म्हणत होते, ‘पाहिलंस ना सोयरा ! भक्तांसाठी काहीही करणारा असा हा प्रेमळ, भक्तवत्सल भगवंत आहे.’ सोयराने विठ्ठलाच्या चरणांवर डोके ठेवले. तिच्या डोळयांतून अश्रू वहात होते. तिला उठवून भगवंत म्हणाले, ‘मलाही तुमच्या भेटीची तळमळ लागलेली असते.’ तो गृहस्थ हे सारे पहात होता. मग सोयराने जेवणाची पाने वाढली. विठ्ठलाने जेवायला प्रारंभ केला. देवाच्या मूर्तीचे हलणारे हात त्या गृहस्थाला दिसत होते. त्याच वेळी चोखोबांचे शब्द त्याच्या कानांवर आले, ‘अगं, अगं हळू ! काय हे ! देवाच्या पीतांबरावर ताक सांडले ना !’

हे सर्व पाहून ते गृहस्थ तेथून निघाले. पाहिलेली खरी गोष्ट भेटेल त्याला सांगत सुटला. माणसे जमली. ही गोष्ट देवळाच्या पुजाऱ्यांपर्यंत गेली. खरे-खोटे पहावे, या उद्देशाने सगळयांनी गडबडीने देऊळ उघडून पाहिले आणि तेथील दृश्य पाहून ते थक्क झाले. नेहमीप्रमाणेच विठ्ठलाची मूर्ती पाषाणावर उभी होती. वस्त्रे, भूषणेही तशीच होती; परंतु नेसवलेल्या पितांबरावर मात्र ताक सांडलेले होते. पाहुणा म्हणून प्रत्यक्ष विठ्ठल खरोखरच सगुण रूपात चोखोबांच्या घरी जाऊन जेवला. हे पाहून पुजाऱ्यांसह सर्वांनीच त्या थोर संत चोखोबांचे पाय धरले.

बालमित्रांनो, पाहिलेत ना ! आपल्या अपार विठ्ठलभक्तीमुळे चोखोबा, संत चोखोबा झाले. प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्या घरी त्यांना भेटावयास जाऊ लागला.

Leave a Comment