देवतांचे विडंबन रोखून धर्मरक्षण करा !

जेथे देवतेचे चित्र (रूप) असते, तेथे ती देवता अदृश्य रूपात असते. काही उत्पादक आपल्या उत्पादनांच्या वेष्टनांवर (उदा. मिठाईचा खोका) देवतेचे चित्र छापतात. उत्पादनांचा उपयोग संपला की, या उत्पादनांची वेष्टने बहुधा पायदळी येतात किंवा कचराकुंडीत टाकली जातात. काही जणांच्या कपड्यांवर देवतेचे चित्र किंवा ‘ॐ’ सारखे धर्मचिन्ह असते. अशा कपड्यांचा धुतांना चोळामोळा होतो किंवा त्यांवर डाग पडू शकतात. काही वेळा नाटके, एकांकिका आणि चित्रपट यांमध्ये देवतेची भूमिका करणाऱ्या पात्राने हास्यास्पद कृती करणे, शिवराळ किंवा विकृत वाक्ये बोलणे इत्यादी प्रकार केले जातात.

मुलांनो, या सर्व प्रकारांमुळे देवतेचे विडंबन होते. देवतेचे विडंबन करणाऱ्यांना पाप लागते, तसेच अशी कृत्ये रोखण्यासाठी काहीही न करणाऱ्यांनाही पाप लागते. मात्र अशी कृत्ये होऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले, तर देवतांचा आशीर्वाद मिळतो अन् धर्मरक्षणही होते.

१. वेष्टनांवर देवतांची चित्रे छापणाऱ्या उत्पादकांचे प्रबोधन करा !

१. वेष्टनावर देवतेचे चित्र छापणाऱ्या उत्पादकांना प्रत्यक्ष भेटून, पत्र पाठवून वा दूरभाषद्वारे ‘वेष्टनावर देवतेचे चित्र छापणे अयोग्य आहे’, हे समजावून सांगा !

२. उत्पादनाच्या वेष्टनावर देवतेचे चित्र छापणे बंद होईपर्यंत अशा उत्पादकांची कोणतीच उत्पादने खरेदी करू नका !

३. असा बहिष्कार टाकण्यासाठी मित्रमंडळींचेही प्रबोधन करा !

मुलांनो, या कामी तुम्ही पालकांचे साहाय्यही घेऊ शकता.

२. देवतांचे विडंबन असलेल्या नाटकांना विरोध करा !

अ. शाळेच्या स्नेहसंमेलनात देवतांचे विडंबन असलेले नाटक, एकांकिका आदी सादर होणार असेल, तर ते शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या दृष्टीस आणून द्यावे आणि ते रहित (रद्द) करण्याची विनंती करावी. याविषयी पालकांनाही कल्पना द्यावी.

आ. नाट्यगृहांत देवतांची विडंबनात्मक नाटके लागली असल्यास पालकांच्या साहाय्याने त्या नाटकांचे निर्माते आणि नाट्यगृहांचे मालक यांचे प्रबोधन करावे.

इ. देवतांचे विडंबन असलेली नाटके वा चित्रपट पाहू नयेत, तसेच याविषयी इतरांनाही सांगावे.

ई. देवतांची वेशभूषा करून भीक मागणाऱ्यांचे किंवा तसे करणाऱ्या बहुरूप्यांचे प्रबोधन करून त्यांना तसे करण्यापासून परावृत्त करा !

३. अनुचित प्रथांसाठी वर्गणी देऊ नका !

गोव्यासह महाराष्ट्रातील काही ठिकाणी दिवाळीत नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला ‘नरकासुर प्रतिमे’च्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. नरकासुर बनवण्यासाठी वर्गणीही गोळा केली जाते. नरकासुर बनवण्याच्या या चुकीच्या प्रथेतून मुलांपुढे नकळत त्या राक्षसाचाच आदर्श निर्माण केला जातो. हे टाळण्यासाठी अशी वर्गणी मागणाऱ्यांचे प्रबोधन करून ती देण्यास नम्रपणे नकार द्या !

४. ‘अंनिस’च्या धर्मद्रोही उपक्रमांना विरोध करा !

‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)’ ही विज्ञानाचा पुरस्कार करण्याच्या नावाखाली हिंदु धर्म, हिंदु धर्मातील धार्मिक विधी, व्रते, देवता इत्यादींसंबंधी अपप्रचार करते. याचे एक उदाहरण म्हणजे ‘अंनिस’ शाळाशाळांमधून राबवत असलेला ‘वैज्ञानिक जाणिवा निर्माण करण्यासाठी प्रश्नमंजुषा’ हा उपक्रम. या उपक्रमाच्या अंतर्गत विचारण्यात येणारे काही धर्मद्रोही प्रश्न पुढे देत आहोत.

अ. वटपौर्णिमेच्या व्रतामागील अंधश्रद्धा कोणत्या ?

आ. संत तुकाराम महाराज यांच्या नावावर कोणकोणते चमत्कार खपवले जातात ?

इ. शनिशिंगणापूरला चोऱ्या होत नाहीत, ही अंधश्रद्धा कशी तपासावी ?

ई. वेदांसंबंधी अंधश्रद्धा कोणत्या ?

उ. उपवासाचे शारीरिक दुष्परिणाम कोणते ?

ऊ. सत्यनारायणाच्या कथेमध्ये कोणकोणते चमत्कार सांगितले आहेत ?

ए. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, हे विधान कोणाचे आहे ?

मुलांनो, अशा प्रकारे हिंदु धर्मासंबंधी अपप्रचार करणाऱ्या ‘अंनिस’च्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ नका आणि त्यांविषयी मित्र-मैत्रिणींचेही प्रबोधन करा. पालकांच्या साहाय्याने शाळेच्या मुख्याध्यापकांचेही प्रबोधन करा.

५. धर्माचरण, धर्मजागृती आणि धर्मरक्षण करतांना कदाचित विरोध झाला, तरी माघार घेऊ नका !

मुलांनो, शाळेत किंवा इतरत्र धर्माचरण, धर्मजागृती आणि धर्मरक्षण करतांना काही मुलांकडून किंवा मोठ्या व्यक्तींकडून तुमची एखाद्या वेळी टिंगल होऊ शकते. कदाचित त्यांच्याकडून विरोधही होऊ शकतो; परंतु अशी टिंगल किंवा विरोध यांना घाबरू नका. तुम्ही धर्माच्या (ईश्वराच्या) पक्षात असल्याने अंतिम विजय तुमचाच आहे, याची निश्चिती ठेवून धर्माचे कार्य करत रहा !

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !

Leave a Comment