राष्ट्रगीतांचा मान राखा !

‘जन-गण-मन’ हे भारताचे राष्ट्रगीत (National Anthem) आहे, तर ‘वन्दे मातरम् ।’ हे राष्ट्रीय गीत (National Song) आहे.

१. राष्ट्रगीत

गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांनी रचलेले ‘जन-गण-मन’ हे गीत रवींद्रनाथ संपादक असलेल्या ‘तत्त्वबोधिनी’च्या जानेवारी १९१२ च्या अंकात प्रसिद्ध झाले. सध्या या संपूर्ण गीतातील दोन चरण म्हटले जातात.

२. राष्ट्रीय गीत

बंकीमचंद्र चट्टोपाध्याय (चॅटर्जी) यांनी कोलकाताच्या जवळील नैहाटी गावात ७.११.१८७५ या दिवशी ‘वन्दे मातरम् ।’ हे गीत रचले.

अ. गीत नव्हे, राष्ट्रीय महामंत्र !

१९०५ मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घोषित केली. हिंदुस्थानची ही पहिली फाळणी रहित करण्यासाठी सारा बंगाल पेटून उठला. त्या आंदोलनातील ‘वन्दे मातरम् ।’ या दोन शब्दांनी इंग्रजांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडू लागली. त्यांनी ‘वन्दे मातरम् ।’ हे शब्द उच्चारण्यावर बंदी घातली आणि तो एक ‘राष्ट्रीय महामंत्र’ झाला.

आ. ‘वन्दे मातरम् ।’साठी शाळा सोडणारा केशव !

१. केशवने सर्व वर्गांतील प्रमुख मुलांची गुप्त बैठक घेऊन शाळेत पाहणीसाठी येणाऱ्या पर्यवेक्षकाचे ‘वन्दे मातरम् ।’ने स्वागत करण्याचे ठरवणे : वर्ष १९०८. केशव नागपूरच्या ‘नील सिटी हायस्कूल’ मध्ये शिकत होता. ‘इंग्रजांनी ‘वन्दे मातरम् ।’ हे शब्द उच्चारायलाही बंदी केली आहे’, हे केशवला ठाऊक होते. त्याने शाळेतील सर्वच वर्गांतील प्रमुख मुलांची एक गुप्त बैठक घेतली. तो सर्वांना म्हणाला, ‘‘आपल्याला इंग्रज शासन ‘वन्दे मातरम् ।’ उच्चारूसुद्धा देत नाही. याला विरोध म्हणून जेव्हा शाळेत पाहणीसाठी पर्यवेक्षक येईल, तेव्हा ‘वन्दे मातरम् ।’ उच्चारून त्याचे स्वागत करूया.’’ सर्व मुलांनी तसे करण्याला आनंदाने होकार दिला.

२. पर्यवेक्षक वर्गात येताच मुलांनी उभे राहून ‘वन्दे मातरम् ।’ अशी घोषणा देणे : ठरलेल्या दिवशी शाळेची पाहणी करण्यासाठी पर्यवेक्षक आला. त्याच्यासमवेत मुख्याध्यापकही वर्गात आले. ते दोघे ‘मॅट्रीक’च्या (११ वीच्या) वर्गात गेल्यावर तुकडीतील सर्व मुलांनी उभे राहूून ‘वन्दे मातरम् ।’ हे शब्द उच्चारले. पर्यवेक्षक चपापला. तो मुख्याध्यापकांना म्हणाला, ‘‘हा
काय मूर्खपणा आहे, यांना ‘वन्दे मातरम् ।’ म्हणायला कोणी सांगितले ?’’ असे म्हणून तो दुसऱ्या तुकडीकडे वळला. तेथेसुद्धा मुलांनी उभे राहून ‘वन्दे मातरम् ।’चा उद्घोष करण्यास आरंभ केला. शाळेची पाहणी तेथेच थांबली. संतप्त पर्यवेक्षक तणतणतच निघून गेला.

३. केशवला शाळेतून काढून टाकण्यात येणे : मुख्याध्यापकांनी चौकशी आरंभली. त्यांनी मुलांना विचारले, ‘‘तुम्हाला ‘वन्दे मातरम् ।’ म्हणायला कोणी सांगितले ?’’ कोणीच नाव सांगेना. शेवटी ‘नाव सांगेपर्यंत दोन्ही तुकड्यांतील मुलांना शाळेत बसू दिले जाणार नाही’, असे सांगण्यात आले. त्याच दिवशी स्थानिक हिंदू पुढाऱ्यांशी केशव आणि त्याचे सहकारी यांनी विचारविनिमय केला. ‘दोन्ही तुकड्यांतील मुलांना कोणतीही शिक्षा न करता शाळेत बसू देईपर्यंत शाळेवरच बहिष्कार टाकावा’, असे ठरले.

हे आंदोलन चालू होऊन साधारण दीड-दोन मास झाले. आता हा प्रकार शाळेच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने अधिक काळ चालू ठेवणे योग्य नाही, असे शाळाचालकांना वाटू लागले. त्यातून एक तडजोड निघाली. चालकांनी एकेका विद्याथ्र्याला विचारावे, ‘चूक झाली ना ?’ त्यावर विद्याथ्र्याने नुसती मान हालवून ‘होकार’ द्यावा. वर्ष वाया जाऊ नये, या विचाराने विद्यार्थी शाळेत परतू लागले. लवकरच केवळ दोन विद्यार्थी सोडून तेरा-चौदाशे मुलांची शाळा पूर्ववत चालू झाली. त्या दोनपैकी एक विद्यार्थी होता केशव ! काही दिवसांनी त्याचे नाव शाळेतून काढून टाकण्यात आले.

मुलांनो, तुम्ही ‘हा राष्ट्रभक्त विद्यार्थी केशव म्हणजे कोण’, हे ओळखले ना ? हा केशव म्हणजे मोठेपणी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची स्थापना करणारे डॉ. केशव बळीराम हेडगेवार होय !

३. राष्ट्रगीतांचा मान राखण्यासाठी या कृती करा !

१. राष्ट्रगीत चालू असतांना आपापसांत बोलू नका !

२. ‘जन-गण-मन’ हे गीत चालू असतांना ‘सावधान’ स्थितीत उभे रहा !

३. ‘वन्दे मातरम् ।’ हे गीत चालू असतांना हात जोडून उभे रहा !

४. ‘वन्दे मातरम् ।’ या गीताचा अभिमान बाळगण्यासाठी हे करा !

१. संपूर्ण ‘वन्दे मातरम् ।’ तोंडपाठ करून योग्य चालीत म्हणण्याचा सराव करा !

२. मुख्याध्यापकांना विनंती करून शालेय कार्यक्रमांच्या समारोपाला हे संपूर्ण गीत सादर करा !

३. देशभक्तीपर गीते, समूहगीते आदींच्या स्पर्धा असतील, तेव्हा हे गीतसादर करा !

हे गीत संस्कृतप्रचुर असल्याने त्यातीलचैतन्याचाही लाभ ते म्हणणारे आणि ऐकणारे यांना होतो. ऐकुया संपूर्ण ‘वन्दे मातरम् ।’

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !