परदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला आणि स्वदेशी वस्तू वापरा !

विदेशी कपड्यांनी भरलेला ट्रक छातीचा कोट करून रोखणारा हुतात्मा बाबू गेनू, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वा. सावरकर आदी देशभक्तांनी स्वदेशीविषयी जागृती करण्यासाठी केलेल्या त्यागाचे विस्मरण होऊ देऊ नका ! स्वदेशी वस्तूच वापरा ! विदेशी वस्तूंच्या खरेदीने राष्ट्राचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे परदेशी वस्तू विकून भारताची प्रतिवर्षी लाख कोटी रुपयांची लूट होत आहे ! स्वदेशीचा पुरस्कार करणे ही काळाची गरज आहे.

3

१. वस्तू विदेशी आस्थापनाची (कंपनीची) आहे, हे कसे ओळखाल ?

विदेशी वस्तू न वापरता स्वदेशी वस्तूच वापरणे म्हणजे, स्वतःच्या देशाचा अभिमान बाळगणे होय. यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती विदेशी कि स्वदेशी आहे, याची विक्रेत्याकडून माहिती करून घ्या. त्याला ठाऊक नसल्यास उत्पादनाच्या वेष्टनावरून ते उत्पादन विदेशी आहे का, ते ओळखता येते. भारतात सध्या ३ प्रकारच्या विदेशी आस्थापनांच्या वस्तू विक्रीस येतात.

अ. परदेशी आस्थापनाने थेट भारतात निर्यात केलेली वस्तू, उदा. निव्हिया क्रीम, नोकिया भ्रमणभाष (मोबाईल).

आ. परदेशी आस्थापनाने भारतात आस्थापन उभारून उत्पादिलेल्या वस्तू, उदा. बाटा इंडिया, नेस्ले इंडिया, पॉन्ड्स इंडिया.

इ. परदेशी आस्थापनाने भारतातील आस्थापनाशी करार करून भागीदारी तत्त्वावर उत्पादिलेल्या वस्तू, उदा. किर्लोस्कर कमिन्स, मारुति सुझुकी.

२. स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रपुरुषांचा आदर्श ठेवा !

अ. स्वराज्यासाठी नाणी बनवून देऊ इच्छिणाऱ्या लबाड इंग्रजाला नकार देणारे छत्रपती शिवाजी महाराज !

‘वर्ष १६७४ मध्ये रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला. शिवराय राजसिंहासनावर बसले. परकीय राज्यांचे प्रतिनिधी एकापाठोपाठ एक येऊन राजांना नमस्कार करून भेटवस्तू (नजराणे) देत होते अन् राजसभेत आसनस्थ होत होते. इंग्रजांचा प्रतिनिधी हेन्री ऑक्झेंडनची पाळी आली. त्याने राजांना नमस्कार करून भेटवस्तूचे तबक पुढे केले. राजांनी तबकाला हात लावला. हेन्रीने पुढे होऊन तबकावरील वस्त्र सरकवले. झगमगाट झाला. ताटात इंग्रजांच्या टांकसाळीत बनलेली चकचकीत आणि सुबक नाणी दिसली. महाराजांना कौतुक वाटले अन् त्यांच्या मुखावर स्मितरेषा उमटली. हेन्री वाटच पहात होता. त्या क्षणी तो मोडक्यातोडक्या मराठीत म्हणाला, ‘‘अ‍ॅपन म्हॅणॅलात थर टुमच्या स्वहराझ्याच्छी नॅणी अ‍ॅम्ही टयार खरून डेवू.’’

राजांच्या मुखावरील स्मित ओसरले. कठोर स्वरात राजे गर्जले, ‘‘पुन्हा अशी आगाऊपणाची सूचना करू नका ! आमची स्वराज्याची नाणी असतील ओबडधोबड, सुधारू आम्ही ती ! देणार असाल, तर आम्हाला टांकसाळीचे तंत्रज्ञान द्या ! दिले नाहीत, तरी आम्ही ते विकसित करू !’ ही होती शिवरायांची स्वदेशी अन् स्वावलंबनाची दृष्टी !’

आ. ‘स्वदेशी’चा शत्रू तो ‘स्वदेशा’चाही शत्रू’, असे सांगणारे लोकमान्य टिळक !

स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध मोठी जनजागृती करणारे लोकमान्य टिळक एके ठिकाणी म्हणतात, ‘अमुक वस्तू परदेशी असल्याने घेऊ नयेत, असे एकदा ठरल्यावर फाजील शहाणपणाने किंवा  डौलाने त्याच्याविरुद्ध जो जाईल, त्याच्यावरच बहिष्कार टाकून त्याच्याशी सर्व व्यवहार बंद केला पाहिजे. ‘स्वदेशी’चा शत्रू आणि ‘स्वदेशा’चा शत्रू यांत काही भेद नाही !’

इ. क्रांतीकारकांचे मुकुटमणी : स्वा. विनायक सावरकर

१. बालपणी स्वदेशीविषयक स्फूर्तीगीत रचणे : बालपणीच सावरकरांच्या मनात स्वदेशीच्या अभिमानाचा उदय झाला होता. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी ‘स्वदेशीचा फटका’ (‘फटका’ म्हणजे एक प्रकारचे आवेशयुक्त गाणे) रचला होता.

२. परदेशी कपड्यांची प्रचंड सार्वजनिक होळी करणे : बंगालच्या फाळणीच्या विरोधात ७.१०.१९०५ या दिवशी पुणे येथे गाडाभर विदेशी कपड्यांची पहिली होळी करण्यात आली. लोकमान्य टिळक आणि शि.म. परांजपे यांच्या साक्षीने पुण्यात सार्वजनिक रितीने परदेशी कपड्यांची प्रचंड होळी करणारे सावरकर हेच पहिले भारतीय पुढारी होत. या तथाकथित अपराधासाठी त्यांना महाविद्यालयाच्या वसतीगृहातून काढून टाकण्यात आले आणि १० रु. दंडही करण्यात आला.

३. स्थानबद्ध असतांनाच्या काळातही स्वदेशीविषयी जागृती करणारे हिंदूंचे पुढारी ! : ‘अंदमान येथे कारावास भोगून आल्यावर रत्नागिरीत स्थानबद्ध असतांनाही सावरकरांनी ग्रंथलेखनाव्यतिरिक्त अस्पृश्यता निवारण, भाषाशुद्धी आदी चळवळींसह ‘स्वदेशी’वरही लक्ष केंद्रित केले होते. एक प्रश्नावली करून आणि स्वयंसेवक पाठवून (आजच्या भाषेत ‘मार्केट सर्व्हे’) घरोघरी कोणत्या परदेशी वस्तू वापरल्या जातात, याची माहिती त्यांनी गोळा केली. इच्छा असूनही ‘स्वदेशी वस्तू कोठे उपलब्ध आहेत’, हे कळल्यावाचून त्या वस्तू विकत घेतल्या जाणार नाहीत, हे त्यांनी ओळखले होते. रत्नागिरी नगरात कोणत्या दुकानात कोणत्या स्वदेशी वस्तू उपलब्ध आहेत, या सामान्य वाटणाऱ्या विषयावर त्यांनी एक लेखच लिहिला होता. ‘तरुणपणी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ लिहिणारा अन् ‘जयोस्तुते…’ हे स्वतंत्रतादेवीचे स्तोत्र रचणारा मी, असले लेख कुठे लिहीत बसू’, असा विचार त्यांनी केला नाही. रत्नागिरीत असतांना स्वा. सावरकर स्वदेशी वस्तूंची हातगाडी फिरवीत, तसेच स्वदेशी वस्तू दुकानांत ठेवण्यासाठी दुकानदारांचे मनही वळवीत.’

३. परदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला आणि याविषयी इतरांचेही प्रबोधन करा !

स्वदेशी वस्तू वापरा आणि परदेशी वस्तू टाळा !

एखाद्या देशातून (उदा. चीनमधून) येणाऱ्या वस्तू तुलनेने स्वस्त असल्या किंवा अधिक आकर्षक असल्या, तरी त्या विकत घेऊ नका. त्या वस्तू घेतल्याने संबंधित वस्तूंचे भारतीय उद्योजक व कामगार देशोधडीला लागतात. स्वदेशीचे महत्त्व ओळखून स्वदेशी वस्तू वापरा आणि परदेशी वस्तू टाळा.

अ. पुढील सारणीमध्ये स्वदेशी आणि परदेशी वस्तू यांची काही उदाहरणे दिली आहेत. ही सारणी https://swadeshionline.in/assets/pdf/Swadeshi-Videshi_Products.pdf या मार्गिकेवरून घेतली आहे.

वस्तू

परदेशी उत्पादक

स्वदेशी उत्पादक

दंतमंजन कोलगेट, पेप्सोडेंट, क्लोज-अप बबूल, मिसवाक
दाढीचे क्रीम पामोलिव्ह, ओल्ड स्पाईस, जिलेट गोदरेज, इमामी, विको
दाढीचे पाते सेव्हन-ओ-क्लॉक, जिलेट सुपरमॅक्स, टोपाझ, लेझर, अशोक
केशरक्षक हॅलो, ऑल क्लीयर, नाईल, सनसील्क, हेड अ‍ॅण्ड शोल्डर्स, पॅन्टीन हर्बल, वाटिका, (शॅम्पू) शिकेकाई, केशकांती,
हिना, सनातन शिकेकाई (चूर्ण स्वरूपात)
सौंदर्यप्रसाधने लक्स, डव्ह, लॅक्मे, रेव्हेलॉन, डेनीम डाबर, विको, इमामी, आयुर, पतंजली
शीतपेये कोका कोला, पेप्सी, लिम्का, स्प्राईट अमूल, हल्दीराम

आ. परदेशी कपडे, खाद्यपदार्थ (उदा. कृत्रिम शीतपेये, बर्गर, पिझ्झा), लेखण्या (पेन), खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इत्यादी खरेदी करू नका !

अन्य काही प्रयत्न

अ. आई-वडील, भावंडे, मित्र-मैत्रिणी आदींनाही स्वदेशी वस्तू वापरण्याविषयी सांगा !

आ. ‘विद्यार्थी वस्तू भांडारा’त स्वदेशी वस्तू असाव्यात, असा मुख्याध्यापकांकडे आग्रह धरा !

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !

Leave a Comment