स्वभाषेचा अभिमान बाळगा !

‘मी फ्रायडेला माझ्या कझीनकडे जाणार आहे; त्यामुळे स्कूलमध्ये येणार नाही’, अशासारखी इंग्रजीमिश्रित वाक्ये आजची मुले सहजपणे बोलून जातात. बालमित्रांनो, शिक्षण घेतांना इंग्रजी भाषा आवश्यकच असेल, तर ठीक आहे; पण अन्य वेळी मातृभाषेत बोलतांना आपण इंग्रजीचा वापर का करतो ? आमची मातृभाषा समृद्ध नाही का ? आता तुम्हाला वाटेल, ‘इंग्रजीचा वापर केला, तर काय बिघडतंय ?’ लक्षात घ्या, ‘आपला उद्देश इंग्रजीचा राग करणे, हा नाही, तर स्वभाषाभिमान जपणे, हा आहे.’ केवळ मातृभाषाच नाही, तर राष्ट्रभाषा ‘हिंदी’ आणि देवता ज्या भाषेत बोलतात ती आपली प्राचीन भाषा ‘संस्कृत’ यांचे महत्त्व आहे.

‘काळाची आवश्यकता ओळखून स्वदेश आणि स्वभाषा यांवर मातेप्रमाणे प्रेम करा आणि मातेच्या संदर्भातील सर्व कर्तव्ये जागृत ठेवा !’ – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन, कल्याण, जिल्हा ठाणे.

१. स्वभाषाभिमानामुळे राष्ट्राभिमान निर्माण होणे

सध्या घरोघरी वडीलधारी मंडळी मातृभाषेत बोलतांना सहजपणे इंग्रजी शब्द वापरतात. महाराष्ट्राचे उदाहरण पाहिले, तर सध्या महाराष्ट्रातून प्रक्षेपित होणाऱ्या दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी यांवरील कार्यक्रमांत; तसेच महाराष्ट्रीय राज्यकर्ते, खेळाडू आणि अभिनेते यांच्या मराठी बोलण्यात मध्ये मध्ये इंग्रजी शब्द अनावश्यक वापरले जातात. असे परकीय शब्द वापरणे, हे भूषणच मानले जाते. याचे अनुकरण मुले करतात. असे चित्र हिंदुस्थानातील सर्वच राज्यांत दिसते.

स्वभाषेत बोलतांना तोंडातून नकळत परकीय शब्द येऊनही त्याचे दुःख न वाटणे किंवा परकीय शब्द वापरायला आवडणे यांमुळे हळूहळू राष्ट्राभिमान घटायला लागतो. याउलट स्वभाषेतील शब्दांचाच अभिमान बाळगला, तर राष्ट्राभिमान वाढायला लागतो.

२. मातृभाषेच्या अभिमानामुळे संस्कृतीरक्षण होऊन धर्माभिमान जागृत होणे

भाषा आणि राष्ट्राभिमान यांचा जसा संबंध आहे, तसाच भाषा आणि धर्माभिमान यांचाही अगदी जवळचा संबंध आहे. दोन स्वभाषाभिमानी मराठी भाषिकांची भेट झाल्यावर ते हात जोडून एकमेकांना ‘नमस्कार’ किंवा ‘राम राम’ असे म्हणतात. या संवादातून ‘स्वतःमध्ये नम्रता आणणे किंवा दुसऱ्यामध्ये राम (देव) पहाणे’, ही शिकवण मिळते. आता पहा, स्वभाषाभिमान नसलेले कोणी दोन जण एकमेकांना भेटल्यावर ते ‘हॅलो’ असे म्हणून परकीय प्रथेप्रमाणे हस्तांदोलन (शेकहँड) करतात. या ‘हॅलो’ शब्दाला काही अर्थ आहे का ? नाही ना; पण ‘नमस्कार’ किंवा ‘राम राम’ म्हणतांना हिंदु संस्कृतीचे रक्षण होते अन् धर्माभिमान जागृत होतो.

३. मातृभाषेचा अभिमान कसा वाढवाल ?

काही मुले आईला ‘मम्मी’ किंवा ‘मॉम’ आणि बाबांना ‘डॅडी’ किंवा ‘डॅड’ अशी हाक मारतांना तुम्ही ऐकले असेल. ‘मम्मी’ किंवा ‘डॅडी’ हे शब्द ऐकायला चांगले वाटतात का ? नाही ना; कारण एकच आणि ते म्हणजे ‘आई’ किंवा ‘बाबा’ या शब्दांतील प्रेम त्या इंग्रजी शब्दांतून व्यक्त होत नाही. स्वभाषाभिमान वाढवण्यासाठी तुम्हीही ‘आई’ आणि ‘बाबा’ अशीच हाक मारा, तसेच पुढील कृतीही करण्याचा प्रयत्न करा !

१. मोठ्या बहिणीला ‘दीदी’ आणि काकांना ‘अंकल’ अशी हाक न मारता अनुक्रमे ‘ताई’ आणि ‘काका’ असे म्हणा !

२. स्वतःचे नाव जी.डी. भोसले, एस्.एम्. जोशी, ए.एस्. कदम अशा प्रकारे सांगू नका. या इंग्रजी आद्याक्षरांनी गुरुदास, शिवानंद, आरती अशासारख्या तुमच्या अर्थपूर्ण नावांचा बोध होत नाही. त्यामुळे स्वतःचे नाव सांगतांना पूर्ण नाव, नाहीतर मराठी आद्याक्षरे सांगा ! पुस्तके, वह्या आदींवरही ‘एम्.व्ही. पंडित’ असे नव्हे, तर कु. मोक्षदा वसंत पंडित / कु. मोक्षदा पंडित / कु. मो. व. पंडित असे लिहा !

३. शाळेच्या ओळखपत्रावर किंवा अन्यत्र स्वाक्षरी मातृभाषेत करा !

४. मित्र / मैत्रीण यांच्याशी दूरभाषवर वा भ्रमणभाषवर (‘मोबाईल’वर) बोलतांना ‘हॅलो’ नव्हे, तर ‘नमस्कार’ म्हणा !

५. सण, नववर्ष आदींच्या शुभेच्छा मराठीत द्या, उदा. ‘हॅपी दिवाली’ नव्हे, तर ‘दीपावलीनिमित्त शुभेच्छा !’ असे म्हणा ! गुढीपाडव्याला ‘हॅपी न्यू इयर’ नव्हे, तर ‘नववर्षाच्या र्हािदक शुभेच्छा !’ असे म्हणा !

६. मराठी भाषेत लिहितांना इंग्रजी लेखनपद्धतीनुसार रेषेच्या वर नव्हे, तर रेषेखाली लिहा आणि सर्वच शब्दांना शीर्षरेषा द्या !

७. घरचे दूरभाष / भ्रमणभाष क्रमांक सांगतांना इंग्रजीत नव्हे, तर मराठीत सांगा, तसेच अन्य कोणाचे क्रमांक लिहून घेतांना मराठी अंकांतच लिहून घ्या !

८. ‘गुड मॉर्निंग’ नव्हे, तर ‘सुप्रभात’ म्हणा आणि ‘गुड नाईट’ नव्हे, तर ‘शुभ रात्री’ असे म्हणा ! (तथापि ‘सुप्रभात’ किंवा ‘शुभ रात्री’ असे म्हणायची हिंदु संस्कृती नाही. आपण स्वभाषेत ‘सुप्रभात’ किंवा ‘शुभ रात्री’ हे शब्द उच्चारत असलो, तरी एक प्रकारे ते परकियांच्या प्रथेचे अनुकरण असावे.)

९. बाहेर जाणाऱ्या  व्यक्तीला निरोप देण्यासाठी हात हालवून ‘टाटा’ किंवा ‘बाय’ म्हणू नका. निघतांना त्यांना नमस्कार करा आणि ‘पुन्हा या’ किंवा ‘लवकर या’ असे म्हणा !

१०. दिनांक लिहितांना इंग्रजी नव्हे, तर हिंदू कालगणनेचा वापर करा, उदा. चैत्र शुद्ध पक्ष प्रतिपदा (गुढीपाडवा), कलियुग वर्ष ५११४ (२३.३.२०१२)

११. राष्ट्राभिमान व्यक्त करण्यासाठी ‘इन्कलाब झिंदाबाद !’ नव्हे, तर ‘वन्दे मातरम् ।’ ही घोषणा द्या ! (‘इन्कलाब’ आणि ‘झिंदाबाद’ हे शब्द अनुक्रमे अरबी आणि फारसी या भाषांतील आहेत.)

१२. मित्र-मैत्रिणींना हाक मारतांना इंग्रजी भाषेतील आद्याक्षरांनी हाक मारू नका, उदा. मित्राचे नाव कु. संजय सखाराम परब असे असल्यास त्याला ‘एस्एस्’ असे म्हणू नका !

१३. ‘संदीप’ नावाच्या मित्राला ‘सॅन्डी’ अशी हाक मारणे टाळा !

१४. मनासारखी घटना घडली की, हात वर करून वा मुठी आवळून ‘येऽऽस्स’ असे म्हणू नका; अशा वेळी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !

१५. मराठीत बोलतांना आणि लिहितांना परकीय शब्द न वापरता मराठी शब्दच वापरा !

परकीय शब्द मराठी प्रतिशब्द परकीय शब्द मराठी प्रतिशब्द
अ. शाळाविषयक इ. अभ्यासविषयक
१. युनिफॉर्म गणवेश १. सिलॅबस अभ्यासक्रम
२. बॅच तुकडी २. होमवर्क गृहपाठ
३. क्लासरूम वर्ग ३. ट्यूशन शिकवणी
४. बेंच बाक ४. वर्कबुक व्यवसाय पुस्तिका
५. हजर उपस्थित  ५. गाईड मार्गदर्शक
६. चॉक खडू ६. प्रोग्रेस रिपोर्ट प्रगतीपुस्तक
७. ब्लॅकबोर्ड फळा ७. मार्कलिस्ट गुणपत्रक
८. हॉल सभागृह ८. रिझल्ट निकाल
९. लायब्ररी वाचनालय ९. पास उत्तीर्ण
१०. गॅदरिंग स्नेहसंमेलन १०. नापास अनुत्तीर्ण
११. स्टेज व्यासपीठ ११. मेरीट लिस्ट गुणवत्ता सूची
१२. ग्राऊंड पटांगण १२. करिअर भवितव्य
आ. शालेय पदे / व्यक्ती यांच्या विषयक ई. अन्य
१. मॉनिटर वर्गप्रमुख १. रोज प्रतिदिन
२. मॅडम बाई २. तयार सिद्ध, सज्ज
३. सर गुरुजी ३. किंमत मूल्य
४. सुपरवायझर पर्यवेक्षक ४. हजार सहस्र
५. हेडमास्टर मुख्याध्यापक ५. तारीख दिनांक
६. प्रिन्सिपॉल प्राचार्य ६. सही स्वाक्षरी

मुलांनो, आम्ही सांगितलेल्या वरील काही कृती तुम्हाला आचरणात आणायला कठीण वाटत आहेत का ? ठीक आहे. ज्या कृती सोप्या वाटत आहेत, त्या आजपासून आचरणात आणा व बाकीच्यांसाठी प्रयत्न करत रहा !

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !

Leave a Comment