शिवाजी महाराजांच्या गडकोटांना प्रत्यक्ष भेट द्या !

जाणता राजा, रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याचे निर्माते, महाराष्ट्रासह जगभरात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते; ज्यांच्या साहस कथा, विचार, तत्त्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात, ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास हा महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगांमधील घनदाट जंगल, दर्‍या-खोर्‍यांशी, डोंगरांशी जोडलेला आहे. स्वराज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांनी अनेक गड कोट बांधले. अनेक गड जिंकले आणि दुरवस्था झालेल्या अनेक किल्ल्यांची डागडुजी करून ते सुस्थितीत आणले. ह्याशिवाय काळाच्या फार पुढचा विचार महाराजांनी केला आणि सागराकडून परकीय शक्तींचे आक्रमण रोखण्यासाठी सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे जलदुर्ग सागरी सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी बांधले. या गडांचा हा इतिहास आपणासमोर आजही बोलका करतात. या गडांवरच इतिहास जन्माला आला आणि यांच्या साहाय्याने स्वराज्य स्थापन झाले. हे गड इतिहासाची साक्ष देतात.

१. दिवाळीपूर्वी शक्यतर घराजवळ दगडमातीचा गड (किल्ला) बांधा !

पूर्वीच्या काळी मुले घराजवळ दगडमातीचा गड बांधण्याचा खेळ खेळत असत. आता शहरीकरणामुळे हा खेळ काहीसा लुप्त होत चालला आहे. काही गावांमध्ये मात्र आजही मुले दिवाळीच्या आधी दगडमातीचा गड बांधतात. या गडावर सिंहासनावर आरूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे अष्टप्रधान मंडळ आणि मावळे यांचे पुतळे ठेवतात.

दगडमातीचा गड बांधण्याचा लाभ

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या ‘हिंदवी स्वराज्या’चे बालपणापासूनच स्मरण रहाते, तसेच राष्ट्रप्रेम, शौर्य इत्यादींविषयीचे विचार बालकांमध्ये रुजतात.

२. शिवाजी महाराजांच्या गडकोटांना प्रत्यक्ष भेट द्या !

तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत केवळ दगडमातीचे गड बांधण्यावरच समाधान मानणार का ? नाही ना ! शक्य होईल तेव्हा खऱ्या गडांना प्रत्यक्ष भेट द्या ! हे गड ‘हिंदवी स्वराज्याच्या स्थापने’च्या आठवणी जागवतात. हे गड आजही आपल्याला सांगत आहेत, ‘उठा ! अन्यायाविरुद्ध जागे व्हा !’ काही गडांची थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

अ. रायगड

ही हिंदवी स्वराज्याची राजधानी होती. छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा सुवर्णक्षण आणि त्यांच्या महानिर्वाणाचा दुःखद क्षणही या गडाने अनुभवला !

आ. प्रतापगड

प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपतींनी अफझलखानाशी केलेले युद्ध हे जगातील महत्त्वाच्या १० युद्धांपैकी एक मानले जाते. गडावरील बालेकिल्ला, सूर्य बुरूज, कडेलोट बुरूज, जिवा महाल बुरूज आदी ठिकाणे मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाची आठवण करून देतात.

इ. सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगराच्या समुद्रात ‘कुरटे’ नावाचे विशाल बेट आहे. तेथे शिवरायांच्या देखरेखीखाली साकार झालेला एक अभेद्य जलदुर्ग म्हणजे ‘सिंधुदुर्ग’ ! या दुर्गावरील एका घुमटीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा आहे.

ई. विजयदुर्ग

या जलदुर्गाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, दुर्गाच्या रक्षणासाठी समुद्राच्या पाण्यात बांधलेली संरक्षक भिंत ! पाण्यावर न दिसणाऱ्या या भिंतीवर शत्रूच्या नौका आपटून फुटत असत.

सचित्र दुर्गदर्शनासाठी येथे क्लिक करा !

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !