पाठ्यपुस्तकांतील राष्ट्रद्रोही आणि खोट्या इतिहासाला विरोध करा !

मुलांना नैतिकतेचे धडे मिळावेत, त्यांचा राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान वाढावा, देशवासियांकडून पूर्वी झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत आदी हेतूंसाठी मुलांना शालेय पाठ्यपुस्तकांतून इतिहास शिकवला जातो. परंतु आजकालच्या पाठ्यपुस्तकांतून हे हेतू काही वेळा डावलले जातात.

१. राष्ट्रद्रोही आणि खोट्या इतिहासाचे उदाहरण

भारत शासनाच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (‘एन्.सी.ई.आर.टी.’च्या) पाठ्यपुस्तकांतून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा इतिहास अल्प पानांत संपवण्यात येतो, तर मोगलांच्या राजवटीचे वर्णन करण्यासाठी पाठ्यपुस्तकांतील बरीच पाने वापरली जातात.

२. इतिहासाविषयी स्वाभिमान जपणारी मुलेच पुढे महान राष्ट्रकार्य करू शकतात !

अ. छत्रपती शिवाजी महाराजांना ‘लुटारू’ असे संबोधण्यात आलेले इतिहासाचे पुस्तक भर वर्गात फाडणारा पांडुरंग ! : दुसऱ्या इयत्तेसाठीच्या ‘इंग्रजी’ या विषयामधील एका धड्यात छत्रपती शिवाजी महाराजांना ‘लुटारू’ असे संबोधण्यात आले होते. एका स्वाभिमानी विद्यार्थ्याला ते सहन झाले नाही. तो धडा शिकतांना त्याने शिक्षकांशी वाद घातला. त्याने चुकीचा इतिहास असलेले ते पुस्तक भर वर्गात फाडले. त्या विद्यार्थ्याचे नाव होते पांडुरंग सदाशिव खानखोजे !

७ नोव्हेंबर १८८४ या दिवशी जन्मलेला हा पांडुरंग देशाला स्वतंत्र करण्याच्या उद्देशाने लो. टिळकांच्या आदेशानुसार सैनिकी शिक्षण घ्यायला विद्यार्थीदशेतच परदेशी गेला. पुढे अमेरिकेत डॉ. खानखोजे यांनी ‘गदर पार्टी’च्या उभारणीत मोलाचा वाटा उचलला. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इराणमध्ये चार वर्षे ब्रिटिशांशी सैनिकी झुंज दिली. वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय आणि भूपेंद्रनाथ दत्त यांच्यासह त्यांनी जर्मनीत छुपे क्रांतीकेंद्र चालवले; मात्र हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर त्यांच्या त्यागाची म्हणावी तशा नोंद (दखल) घेतली गेली नाही ! १८ जानेवारी १९६७ या दिवशी त्यांना देवाज्ञा झाली.

३. मुलांनो, राष्ट्रद्रोही इतिहासाला विरोध करा !

चुकीचा इतिहास शिकल्याने भावी पिढी राष्ट्राभिमानशून्य होते. हे टाळण्यासाठी हे करा…

अ. राष्ट्रद्रोही आणि खोट्या इतिहासाविषयी मित्र-मैत्रिणींना जागृत करा !

आ. चुकीचा किंवा विकृत इतिहास प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्ती, संघटना, संस्था, पाठ्यपुस्तक मंडळ, प्रकाशक आदींना निषेधपत्रे पाठवा !

इ. ‘हिंदू जनजागृती समिती’ने वेळोवेळी आरंभिलेल्या यासंबंधीच्या आंदोलनांत यथाशक्ती सहभागी व्हा !

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !

Leave a Comment