पालकांनो, तुमच्या पाल्याला समजून घ्या !

प्रत्येक मातापित्याच्या आपल्या मुलांकडून बर्‍याच अपेक्षा असतात आणि ते साहजिकही आहे; पण त्याच वेळेला आपल्या मुलांच्या क्षमतेविषयी आपण अवास्तव अपेक्षा तर ठेवत नाही ना, याचाही विचार करावा लागतो. या मर्यादांचे योग्य ते भान ठेवले नाही, तर मातापित्यांच्या आकांक्षा या मुलांना न पेलणारे ओझे बनते. प्रस्तूत लेखात विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्यांविषयी आणि त्यावर पालकांनी करावयाची उपाययोजना यांविषयी ऊहापोह केला आहे.

१. पालकांच्या अपेक्षा आणि मुलांची तारांबळ !

मुलाला शाळेत घातले म्हणजे त्याने अभ्यासात आघाडीवरच असले पाहिजे, असा पालकांचा आग्रह असतो. माझ्या मुलाने अभ्यासासह खेळातही अव्वल असले पाहिजे. त्याला एखादी कला आली पाहिजे. पालकांच्या अपेक्षांचे ओझे संपत नाही. ते पेलतांना मुलांची चांगलीच तारांबळ उडते. आपले मूल वर्गात इतर मुलांच्या तुलनेतच मागे पडते, असे लक्षात आल्यावर पालकांना धक्का बसतो. मग प्रश्‍न पडतो ‘आम्ही दोघे तर किती हुशार आहोत. मग आमचा मुलगा मठ्ठ कसा असेल ? साध्या साध्या प्रश्‍नांची उत्तरे देणे त्याला का जमत नाही ?’ यावर ‘हा सगळा त्याचा हट्टीपणा असेल. नक्कीच शाळेत न जाण्याची कारण शोधतोय तो !’, अशा संवादांच्या फैरी झडू लागतात.

२. शालेय वयात शिकण्याशी संबंधित मुलांच्या समस्या !

मुलांच्या शालेय वयात शिकण्याशी संबंधित मुलांना असलेल्या समस्यांची माहिती पुढीलप्रमाणे !

२ अ. स्पेसिफिक लर्निंग डिसअ‍ॅबिलिटी (विशिष्ट शिक्षण न्यूनता)

शाळेत काही मुले अभ्यासात मागे पडत असल्याचे निदर्शनास येते. काही विशिष्ट गोष्टी समजून घेण्यात या मुलांना वारंवार अडचणी येतात. अशा मुलांना एखादे काम करायला दिल्यास त्यांना त्या कामासाठी इतर मुलांपेक्षा अधिक वेळ लागतो. वर्गात लक्ष एकाग्र करणे त्यांना कठीण जाते. त्याच त्याच चुका ही मुले पुनःपुन्हा करतात. वाचन करतांना वरच्या ओळीतले किंवा खालच्या ओळीतले शब्द न वाचण्यासारख्या या चुका असतात. तोंडी सांगितलेले वाक्य किंवा शब्द लिहिणे त्यांच्यासाठी अवघडच असते. गणिताची चिन्हे समजणे जड जाते. काही सूचना सलगपणे केल्यास त्यानुसार कृती करणे त्यांना जड जाते. शालेय मुलांमध्ये अशा प्रकारची लक्षणे दिसत असल्यास त्याला ‘स्पेसिफिक लर्निंग डिसअ‍ॅबिलिटी’ ही मानसिक समस्या असू शकते.

२ आ. स्लो लर्नर्स (विद्या ग्रहण करण्यात गती अल्प असलेला )

अशा मुलांचा बुध्यांक ७० ते ९० च्या दरम्यान असू शकतो. शाळेत शिकण्याच्या संदर्भात ही मुले इतर मुलांच्या तुलनेत अल्प गतीने शिकतात. यांनाही वर्गात लक्ष देण्यास आणि एकाग्रता साधण्यास अडचणी येतात. दिलेले काम पूर्ण करण्यास अधिक काळ लागतो. अशा मुलांचे लिहिणे अस्ताव्यस्त आढळते. लिहितांना ती आवश्यक नसलेल्या गोष्टीही लिहितात. लेखी परीक्षेपेक्षा तोंडी परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळतात. प्रयोग परीक्षेत मात्र दिलेल्या सूचना त्यांना परत सांगाव्या लागतात. ज्या मुलांना त्यांच्या भूतकाळात फिट्स येण्याचा त्रास असेल किंवा डोक्याला मार लागलेला असेल, अशा मुलाला ‘स्लो लर्निंग’ची समस्या उद्भवू शकते.

२ इ. ऑटिझम् (आत्मकेंद्रितपणा)

शाळेत गेल्यावरही काही मुले एकटे एकटे रहाणे पसंत करतात. कुणातही मिसळत नाहीत. या मुलांना इतरांशी बोलतांना नजर भिडवणे जमत नाही. त्यामुळे बोलतांना ही मुले इकडे तिकडे बघतात. एखादा प्रश्‍न विचारल्यावर त्याचे उत्तर देण्याऐवजी ही मुले शक्यतो तोच प्रश्‍न पुन्हा उच्चारतात, उदा. माझे नाव काय ? अशा प्रश्‍नाला उत्तर देतांना नाव सांगण्याऐवजी मुलाकडून ‘तुझे नाव काय ?’ असा प्रतीप्रश्‍न विचारला जाऊ शकतो. इतर मुलांसमवेत खेळत असतांना ही मुले स्वत:ची खेळण्याची वेळ येण्याची वाट पाहू शकत नाहीत. त्यांना त्यांच्या नावाने हाक मारल्यास प्रत्येक वेळेला ती हाकेला ओ देत नाहीत. या मुलांना डोळे मिचकवणे, खांदे उडविणे, विशिष्ट वस्तूंचा वास घेणे, अशा प्रकारच्या सवयी असू शकतात. या समस्येने ग्रस्त असलेली मुले वर्गातील त्यांच्या बसण्याच्या जागेविषयी कमालीचे हट्टी असतात. वर्गात ही मुले तोच तोच प्रश्‍न पुन्हा विचारण्याची किंवा चाललेल्या मुद्यांशी संबंधित नसलेला प्रश्‍न विचारण्याची शक्यता असते. त्यामुळे शिक्षकांच्या किंवा इतर मुलांच्या मनात चाललेल्या कामात अडथळा निर्माण होत असल्याची भावना निर्माण होऊ शकते.

२ ई. लो व्हिजन (अल्प दृष्टी)

शाळेत काही मुले फळ्यावर लिहिलेले नीट दिसत नसल्यामुळे अभ्यासात मागे पडत असतात. या मुलांना ‘लो व्हिजन’, ही समस्या असू शकते. काही मुलांना पहिल्या बाकावर बसूनही नीट दिसत नाही. शालेय वयात मुलांमध्ये ही लक्षणे दिसत असल्यास त्याला ‘लो व्हिजन’ म्हणजे दृष्टी अल्प असल्याची समस्या असू शकते.

३. मुलांना योग्य मार्गदर्शन हवे !

मला अमुक एक समस्या आहे, असे मूल स्वत:च्या तोंडाने निश्‍चितपणे सांगत असते ! त्याच्या समस्या ओळखाव्या लागतात. पालकांना आणि मुख्य म्हणजे शाळेतील शिक्षकांना असलीच एखादी समस्या म्हणजे ‘आपले मूल सर्वसाधारण (नॉर्मल) नाही’, असे मुळीच समजू नये. शेवटी ‘नॉर्मल’ आणि ‘अ‍ॅबनॉर्मल’ या संकल्पनाही आपणच निष्कारण सिद्ध करत असतो ! आपल्या मुलाच्या काही विशेष गरजा आहेत, हे या पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ही मुले कुठेही मागे पडत नाहीत. वेळेवर घेतलेला वैद्यकीय तज्ञांचा सल्ला आणि योग्य समुपदेशन हेही महत्त्वाचे ठरते.’

संकलक – श्रीमती रेश्मा भाईप, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात