संस्कृत सुभाषिते : १

चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः |

सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ||

अर्थ : चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता [काळजी] जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर [मृताला] जाळते

विद्या शस्त्रस्य शास्त्रस्य द्वे विद्ये प्रतिपत्तये |


आद्या हास्याय वृद्धत्वे द्वितीयाऽद्रियते सदा ||

अर्थ : शस्त्रविद्या आणि शास्त्रविद्या [ज्ञान] दोन्ही विद्या कीर्ति मिळवून देणाऱ्या आहेत [परंतु] पहिली म्हातारपणी हास्यास्पद ठरते तर दुसरीचे नेहमी कौतुक होते.

नाप्राप्यमभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम् |


आपत्स्वपि न मुह्यन्ति नराः पण्डितबुद्धयः ||

अर्थ : विद्वान् माणसे न मिळण्याजोग्या [अशक्य] गोष्टीची इच्छा करीत नाहीत, नाश पावलेल्या गोष्टीबद्दल दुःख करीत नाहीत आणि संकटकाळी डगमगत नाहीत.

नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम् , नष्टा विद्या लभ्यतेऽभ्यासयुक्ता |


नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम् नष्टा वेला या गता सा गतैव ||

अर्थ : [खूप] कष्ट करून गेलेली संपत्ति मिळवता येते. [विसरल्यामुळे] गेलेली विद्या अभ्यास करून [पुन्हा] मिळवता येते. तब्बेत खराब झाली तर चांगले उपचार करून ति सुधारता येते. पण वेळ [वाया] घालवला तर तो गेला तो गेलाच. [वेळ वाया घालवण टाळावं]
यत्र विद्ववज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि |


निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते ||

अर्थ : ज्या ठिकाणी विद्वान लोक नाहीत त्याठिकाणी कमी बुद्धी असणारा माणूस देखील स्तुतीला पात्र ठरतो. जसे [मोठे] वृक्ष नसलेल्या प्रदेशात एरंडसुद्धा वृक्ष म्हणून मिरवतो.

वाच्यं श्रद्धासमेतस्य पृच्छकस्य विशेषतः |


प्रोक्तं श्रद्धाविहीनाय ह्यरण्यरुदितं भवेत्‌ ||

अर्थ : ज्याचा [आपल्यावर] विश्वास आहे आणि जास्तकरून ज्याने आपल्याला [त्याबद्दल] विचारलेले आहे अशा [माणसालाच उपदेश] सांगावा पण विश्वास नसणाऱ्याला सांगितले तर ते कष्ट व्यर्थ जातील.

अवज्ञात्रुटितं प्रेम नवीकर्तुं क ईश्वरः |


सन्धिं न यान्ति स्फुटितं लाक्षालेपेन मौक्तिकम् ||

अर्थ : अपमानामुळे तुटलेले प्रेम पुन्हा निर्माण करण्यास कोण बरे समर्थ आहे? [एखाद्याचा अपमान झाल्यावर त्याच्याशी पुन्हा जवळीक होत नाही] जसे फुटलेले मोती लाखेच लेप लावून सांधता येत नाहीत.

श्व:कार्यमद्य कुर्वीत पूर्वांण्हे चापराण्हिकम् |


न हि प्रतीक्षते मृत्युः कृतमस्य न वा कृतम् ||

अर्थ : उद्या करायचे काम आज करावे आणि दुपारनंतर करायचे काम सकाळीच करावे. कारण ह्या माणसाचे काम झाले आहे किंवा नाही याची मृत्यु वाट पाहत नाही.

यथा खनन् खनित्रेण नरो वार्यधिगच्छति |


तथा गुरुगतां विद्यां शुश्रूषुरधिगच्छति ||

अर्थ : ज्याप्रमाणे कुदळीने [सतत] खणत राहणाऱ्या मनुष्याला [विहिरीचे] पाणी मिळते, त्याप्रमाणे गुरूंची [निष्ठेने] सेवा करणाऱ्या [व त्यांच्याकडून विद्या मिळवू इच्छिणाऱ्या] विद्यार्थ्याला गुरुकडे असलेली विद्या मिळते.


त्वयि मेऽनन्यविषया मतिर्मधुतेऽसकृत् |


रतिमुद्वहताद्धा गङ्गेवोघमुदन्वति || कुन्ती भागवत १ स्कंध ८ अध्याय

अर्थ : हे मधू राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे [न थांबता, सतत ] समुद्राकडे झेप घेतो त्याप्रमाणे तुझ्याविषयी माझ्या मनात एकान्तिक [दुसरा कुठलाही विचार न येता फक्त तुझेच चिंतन एवढा एकच] विचार येवो
विपदः सन्तु नः शश्वत्तत्र तत्र जगद्गुरो |


भवतो दर्शनं यत्स्यादपुनर्भवदर्शनम् || कुन्ती भागवत १स्कन्ध ८ अध्याय.

अर्थ : हे या जगात श्रेष्ठ असणाऱ्या श्रीकृष्णा, आम्हाला सतत संकटे येवोत [कि ज्यामुळे तुझे स्मरण होईल व त्यामुळे ] जन्ममृत्यूचा फेरा संपवणारे तुझे दर्शन होईल.