संस्कृत सुभाषिते : ५

अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन |

अर्थेन ग्रन्थसंभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः ||
अर्थ : पैसे [देऊन] औषध मिळते, पण आरोग्य कधीही पैसे देऊन मिळत नाही. पैशांनी पुस्तकांची चळत [विकत] मिळते, पण ज्ञान [त्यामुळे ज्ञान मिळत नाही ते ] कष्टाने मिळवावे लागते.
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः |
यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम् ||
अर्थ : हे निषादा , चिरंतन काळपर्यन्त तुला प्रतिष्ठा मिळणार नाही, कारण की कामेच्छा झालेल्या क्रौंच जोडप्यामधील एकाला तू ठार केले आहेस. – वाल्मिकी ऋषी
[पक्ष्याला मारलेले दिसल्यावर त्यांच्या तोंडून वरील उद्गार बाहेर पडले तेंव्हा ब्रह्मदेवाने प्रकट होऊन वाल्मिकी ऋषींना रामायण लिहिण्यास सांगितले]
लौकिकानां हि साधूनामर्थं वागनुवर्तते |
ऋषीणां पुनराद्यानां वाचमर्थोनुधावति ||
अर्थ : सगळे सत्प्रवृत्त लोक जसं असेल – घडेल – तसं वर्णन करतात. परंतु [द्रष्टे ] ऋषी जस बोलले त्याप्रमाणेच [नंतर ] घटना क्रम घडला.
[वाल्मिकी ऋषीनी आधी वर्णन केल्याप्रमाणे नंतर रामायण घडलं]
मनसेह मनोज्ञाय धारासंसरणे रभः|
भरणे रससंराधा यज्ञा नो महसे नमः ||
अर्थ : इथे [ह्या जगात ] मनाने त्या सुंदर तेजाला नमस्कार असो. आम्ही उच्च ध्येयाकडे जोमाने जात आहोत आणि त्यासाठी केलेले यज्ञ म्हणजे रसपूर्ण मेजवानीच.
श्री . भि . वेलणकर यांच्या चित्रकाव्यातील विलोमकाव्य या पोटप्रकारातला हा श्लोक आहे . पहिली ओळ वाचल्यानंतर शेवटच्या अक्षरा पासून उलट वाचत आले तरी त्याला सुंदर अर्थ असतो अशा काव्याला विलोम काव्य म्हणतात.
पक्षिणां बलमाकाशो मत्स्यानामुदकं बलम् |
दुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम् ||
अर्थ : आकाशात पक्ष्यांची ताकद काम करते. माश्यांच बळ पाण्यात असतं राजाने [केलेले रक्षण] हे दुबळ्यांचे बळ होय आणि रडणं ही लहान मुलांची ताकद असते.
विकृतिं नैव गच्छन्ति सङ्गदोषेण साधवः |
आवेष्टितं महासर्पैश्चन्दनं न विषायते ||
अर्थ : सज्जन माणसे [वाईट लोकांच्या] संगतीने बिघडत नाहीत. चंदनाच्या वृक्षाला मोठमोठया सापांनी वेढले तरी तो विषारी बनत नाही.
अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः |
अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते ||
अर्थ : रोहित हा [एक मोठा मासा] खूप खोल पाण्यात विहार करून सुद्धा गर्व करीत नाही. पण शफरी मात्र टीचभर पाण्यात असली तरी [गर्वाने] फुगते.
आयुषः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न लभ्यते |
नीयते स वृथा येन प्रमादः सुमाहनहो ||
अर्थ : सर्व रत्ने [सर्वात महाग वस्तू] दिली तरीहि आयुष्याचा एक क्षण सुद्धा [वाया घालवलेला परत] मिळत नाही. म्हणून वेळ वाया घालवणे ही घोडचूक आहे.
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् |
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ||
इति पुंसार्पिता विष्णौ भक्तिश्चेन्नवलक्षणा |
क्रियते भगवत्यद्धा तन्मन्येऽधीतमुत्तमम् || भागवत सातवा स्कंध पाचवा अध्याय
अर्थ : प्रल्हाद हिरण्यकश्यपुला सांगतो विष्णूची भक्ति – श्रवण [त्याच्या कथा ऐकणे] नामसंकीर्तन, मनात स्मरण करणे, पाय चेपणे, पूजा करणे, नमस्कार करणे, दास्य भक्ति [हनुमानाप्रमाणे], सख्य भक्ति [अर्जुनाप्रमाणे] आणि आत्मनिवेदन [स्वतः देव आपलं ऐकतो आहे अशा प्रकारे त्याला सर्व सांगणे] – अशी नवविधा भक्ति केली तर ते उत्तम शिक्षण होय.
पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासा |
तथापि तत्तूल्यकवेरभावादनामिका सार्थवती बभूव ||
अर्थ : पूर्वी कवींची मोजदाद करण्याच्या वेळी करंगळी [वर पहिलं नाव] कालिदास [हे] घेऊन मोजलं. पण पुढे त्याच्या तोडीचा कवि न सापडल्याने अनामिका [जिच्यासाठी नाव नाही अशी] सार्थ नावाची झाली. [कालिदासाची अद्वितीयता सांगण्यासाठी नेहमी हा श्लोक उद्धृत करतात]
कालिदासाच्या स्मृती निमित्त हा श्लोक.

Leave a Comment