संस्कृत सुभाषिते : ४

न तेन वृद्धो भवति येनास्य पलितं शिरः |

यो वै युवाप्यधीयानः तं देवाः स्थविरं विदुः ||
अर्थ : ज्याचं डोकं म्हातारपणामुळे पांढरे झाले आहे त्याला देव वृद्ध म्हणत नाहीत तर जो तरुण असूनही [खूप] शिकलेला आहे त्याला वृद्ध असे म्हणतात.
को हि तुलामधिरोहति शुचिना दुग्धेन सहजमधुरेण |
तप्तं विकृतं मथितं तथापि यत्स्नेहमुद्गिरति ||
अर्थ : जन्मतः मधुर असणाऱ्या दुधाची कोण बरे बरोबरी करू शकेल ते तापवल [त्रास दिला] विकार केला [विरजून दही केलं] घुसळल [कसाही त्रास दिला] तरी स्नेह [स्निग्धता -प्रेम – ओशटपणा] प्रकट करते.
विना कार्येण ये मूढा गच्छन्ति परमन्दिरम् |
अवश्यं लघुतां यान्ति कृष्णपक्षे यथा शशी ||
अर्थ : जे मूर्ख लोक काही काम नसताना दुसऱ्याच्या घरी जातात, त्यांना कृष्णपक्षातील चंद्र ज्याप्रमाणे क्षय पावतो त्याप्रमाणे नक्की कमीपणा येतो.
तारतारतरैरेतैरुत्तरोत्तरतो रुतैः |
रतार्ता तित्तिरी रौति तीरे तीरे तरौ तरौ ||
अर्थ : कामविव्हल झालेली टिटवी ह्या अशा अधिकाधिक वाढत जाणाऱ्या कर्कश आवाजात सगळ्या काठावर प्रत्येक झाडावर ओरडत आहे.
चित्रकाव्यामध्ये हा द्वयक्षर श्लोक रसपूर्ण आणि अर्थाची ओढाताण न करता सुंदर रचना केली आहे.
प्रदोषे दीपक: चन्द्र: प्रभाते दीपको रवि:।
त्रैलोक्ये दीपको धर्म: सुपुत्रो कुल दीपक: ॥
अर्थ : रात्री चन्द्र हा दिवा असतो. [उजेड देतो] पहाटेपासून सूर्य हा दिवा असतो. तिन्ही लोकात धर्म [आपण केलेली सत्कृत्ये ही] दिव्याप्रमाणे [उपयोगी] पडतात. सुपुत्र हा घराण्याला दिवा [मार्गदर्शक] असतो.
कति वा पाण्डवा भद्र खट्वाखुरमितास्त्रयः |
एवमुक्त्वा जडः कश्चिद् दर्शयत्यङ्गुलिद्वयम् ||
अर्थ : सद्गृहस्था, पांडव किती [होते] [यावर] एका मूर्खाने खाटेच्या खुरांइतके तीन, असे म्हणून दोन बोटे दाखवली.
अनालस्यं ब्रह्मचर्यं शीलं गुरुजनादरः |
स्वावलम्बो दृढाभ्यासः षडेते छात्रसद्गुणाः ||
अर्थ : उद्योगीपणा, ब्रह्मचर्य, उत्तम चारित्र्य, शिक्षकांबद्दल आदर, स्वावलंबन, सतत अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे सहा गुण आहेत.
दृष्टान्तो नैव दृष्टस्त्रिभुवनजठरे सद्गुरोर्ज्ञानदातुः स्पर्शश्चेत्तत्र कल्प्यः स नयति यदहो स्वर्णतामश्मसारम् |
न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयुगे सद्गुरुः स्वीयशिष्ये स्वीयं साम्यं विधत्ते भवति निरुपमस्तेन वाऽलौकिकॉऽपि || शङ्कराचार्य – शतश्लोकी
अर्थ : या त्रिभुवनात ज्ञानदात्या सद्गुरुना शोभेल असा दृष्टान्तच नाही. त्यांना परिसाची उपमा दिली तर [तर तीही योग्य नाही], कारण अहो, जरी परिस लोखंडाला सुवर्णत्व देतो तरी परिसत्व देत नाही. [परंतु ]सद्गुरू चरणयुगुलांचा आश्रय करणाऱ्या आपल्या शिष्याला स्वतःचे साम्य देतात आणि त्यामुळेच ते निरुपम आहेत आणि त्यांना योग्य असा दृष्टान्त प्रपंचात मिळत नाही.
स्लिष्टा क्रिया कस्यचिदात्मसंस्था संक्रान्तिरन्यस्य विशेषस्लिष्टा|
यस्योभयं साधु स शिक्षकाणां धुरि प्रतीष्ठापयितव्य एव || कालिदास – मालविकाग्निमित्र
अर्थ : कोणाला [एखाद्या शिक्षकाला] स्वतःचे ज्ञान प्रशंसनीय असते. कुणाला शिकवण्याची हातोटी उत्तम असते. ज्याला या दोनही गोष्टी चांगल्या येतात त्याला निश्चितपणे अग्रस्थान दिले पाहिजे.