संस्कृत सुभाषिते : ७

वृक्षाग्रवासी न च पक्षिराजस्त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः |
त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलं च बिभ्रन्न घटो न मेघः ||

अर्थ : झाडाच्या शेंड्यावर राहतो पण पक्षिश्रेष्ठ नाही. तीन डोळे आहेत पण शंकर नाही. वल्कलं परिधान केली आहेत पण तापसी नाही. पाणी बाळगतो पण घडा किंवा ढग नाही. असा कोण ते ओळखा?
प्रहेलिका
अस्ति ग्रीवा शिरो नास्ति द्वौ भुजौ करवर्जितौ |
सीताहरणसामर्थ्यो न रामो न च रावणः ||
अर्थ :गळा आहे पण डोक नाही. पंज्याशिवाय दोन हात आहेत आणि त्याला सीतापहरण करण्याचं बळ आहे. पण तो राम नाही आणि रावण पण नाही.
प्रहेलिका
अपदो दूरगामी च साक्षरो न च पण्डितः |
अमुखः स्फुटवक्ता च यो जानाति स पण्डितः ||
अर्थ :[प्रहेलिका म्हणजे कोडं या प्रकारचा हा श्लोक आहे ]
पाय नसून दूरदूर जातो. साक्षर असला तरी विद्वान नाही. त्याला तोंड तर नाहीच. पण सर्व गोष्टी सविस्तर सांगतो. जो ओळखेल तो ज्ञानी आहे.
कौर्मं संकोचमास्थाय प्रहारानपि मर्षयेत् |
प्राप्ते काले च मतिमानुत्तिष्ठेत् कृष्णसर्पवत् ||
अर्थ :[कठीण प्रसंगात] कासावाप्रमाणे पाठीचे कातडे घट्ट करून दणके सुद्धा खावे. पण योग्य वेळ येताच सापाप्रमाणे फणा काढावा.
शिरसा विधृता नित्यं तथा स्नेहेन पालिताः |
केशा अपि विरज्यन्ते निःस्नेहा किं न सेवकाः ||
अर्थ :नेहमी डोक्यावर घेतलेले, [मानाने] दिलेले, स्नेहाने [तेल लावून किंवा प्रेमाने] सांभाळले, तरी सुद्धा केस देखील विरक्त [ प्रेमरहित किंवा काळा रंग जाऊन पांढरे] होतात. तर स्नेह [प्रेम] न दिलं तर नोकर वैतागतील यात काय संशय?
उदीरितोऽर्थः पशुनापि गृह्यते हयाश्च नागाश्च वहन्ति चोदिताः |
अनुक्तमप्यूहति पण्डितो जनः परेङ्गितज्ञानफला हि बुद्धयः ||
अर्थ :[बुद्धिहीन] पशुसुद्धा सांगितल्यावर [मालकाच्या मनातील गोष्ट] समजतात. चाबूक मारल्यावर घोडे, हत्ती सुद्धा ओझे वाहून नेतात. पण विद्वान लोक सांगितल्याशिवाय [दुसऱ्याच्या मनातील गोष्ट] ओळखतात. [कुशाग्र] बुद्धीला दुसऱ्याच्या मनातील गोष्ट ओळखण्याची कला असते.
तृणानि नोन्मूलयति प्रभञ्जनो मृदूनि नीचैः प्रणतानि सर्वतः |
समुच्छ्रितानेव तरून्स बाधते महान्महत्स्वेव करोति विक्रमम् ||
अर्थ :सोसाट्याचा वारा सर्व बाजूनी वाकलेल्या मउ [लेच्यापेच्या] गवताला उपटत नाही, तर तो उंच वाढलेल्या झाडांना पाडतो. थोर माणसे थोरांशीच स्पर्धा [शौर्य] दाखवतात.
परिचरितव्याः सन्तो यद्यपि कथयन्ति नो सदुपदेशम् |
यास्तेषां स्वैरकथास्ता एव भवन्ति शास्त्राणि ||
अर्थ :जरी सज्जनांनी आपल्याला उपदेश केला नाही तरी त्यांची सेवा करावी. कारण ते सहजच ज्या गप्पा मारतात ते सुद्धा शास्त्रीय वचनच असत.
इक्षोरग्रात्क्रमशः पर्वणि पर्वणि यथारसविशेषः |
तद्वत्सज्जनमैत्री विपरीतानां च विपरीता ||
अर्थ :उसाच्या टोकाच्या कांडापासून जसजस पुढे जावं तसा तो अधिकाधिक [मधुर] रसाचा लागतो. त्याप्रमाणे सज्जनाशी मैत्री केली असता अधिकाधिक मधुर बनतं जाते आणि उलट लोकांची [दुष्टांची अधिकाधिक] त्रासदायक बनत जाते.
परैः प्रोक्ता गुणा यस्य निर्गुणोऽपि गुणी भवेत्‌ |
इन्द्रोऽपि लघुतां याति स्वयं प्रख्यापितैर्गुणैः ||
अर्थ :दुसऱ्यांनी ज्याचे गुण गाईले असतील तो जरी गुणी नसला तरी गुणी [मानला] जाईल. पण स्वतःच्या तोंडाने स्वतःच गुणवर्णन केलं तर इंद्राला सुद्धा कमीपणा येतो.