संस्कृत सुभाषिते : १३

उष्ट्राणां च गृहे लग्नं गर्दभाः शान्तिपाठकाः |

परस्परं प्रशंसन्ति अहो रूपमहो ध्वनिः ||
अर्थ : काही वेळा अगदी क्षुल्लक अशा माणसांची गाठ पडते आणि अशासारख्या गोष्टी घडतात. उंटाच्या घरी लग्न [होतं आणि] गाढव पुरोहित असते. त्यामुळे ते एकमेकांचे कौतुक करतात. [गाढवं म्हणतात ] काय रूप आहे उंट म्हणतात काय आवाज आहे.
न गणस्याग्रतो गच्छेत्सिद्धे कार्ये समं फलम् |
यदि कार्यविपत्तिः स्यात्‌ मुखरस्तत्र हन्यते ||
अर्थ : जमावाच्या पुढे [मोर्चात प्रथम] जाऊ नये. काम झालं तर सगळ्यांना सारखाच वाटा मिळतो. [म्हणजे फायदा असं काहीच नाही] पण काही उलट घडलं तर पुढचा माणूस मारला जातो.
आपद्गतं हससि किं द्रविणान्धमूढ: लक्ष्मीः स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् |
एतान् प्रपश्यसि घटान् जलयन्त्रचक्रे रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः ||
अर्थ : संपत्तीने अंध झालेल्या [गर्विष्ठ] मूर्खा, संकटात सापडलेल्या या [गरीब माणसाला] तू का हसत आहेस? अरे लक्ष्मी [कधी कोणाकडे] कायम राहत नाही यात आश्चर्य काय? रहाटगाडग्याच्या चाकावर असलेले हे घडे तू पाहतच आहेस, की रिकामे असलेले घडे भरतात आणि भरलेले रिकामे होतात.
न धैर्येण विना लक्ष्मीः न शौर्येण विना जयः |
न ज्ञानेन विना मोक्षो न दानेन विना यशः ||
अर्थ : धीराने [प्रयत्न केल्याशिवाय] संपत्ती मिळत नाही. पराक्रमाशिवाय विजय होत नाही. [तत्व] ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. दान केल्याशिवाय कीर्ति मिळत नाही.
क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् |
क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम् ||
अर्थ : [प्रत्येक] क्षण [उपयोगात आणून] विद्या मिळवावी, [प्रत्येक] कण [वापरून] संपत्ती मिळवावी. क्षण वाया घालवल्यास विद्या कोठून [मिळणार?] कण वाया घालवल्यास संपत्ती कशी साठणार?
उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे शत्रुसङ्कटे |
राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बान्धवः ||
अर्थ : आनंदाचे प्रसंगी, दुष्काळात, शत्रूने हल्ला केला असता, राजदरबारात, स्मशानात [म्हणजे सर्व सुख, दुःखाच्या वेळी] जो आपल्या जवळ राहतो तो [खरा] बांधव होय.
नलिकागतमपि कुटिलं न भवति सरलं शुनः पुच्छम् |
तद्वत् खलजनहृदयं बोधितमपि नैव याति माधुर्यम् ||
अर्थ : [ज्याप्रमाणे] कुत्र्याचे वाकडे शेपूट नळीत घातले तरी सरळ होत नाही, त्याप्रमाणे दुष्ट मनुष्याचे मन उपदेश करूनही मधुर [चांगले] होत नाही.
वह्निस्तस्य जलायते जलनिधिः कुल्यायते तत्क्षणान्मेरुः स्वल्पशिलायते मृगपतेः संघः कुरङ्गायते |
व्यालो माल्यगुणायते विषरसः पीयूषवर्षायते यस्याङ्गेऽखिललोकवल्लभतमं शीलं समुन्मीलति ||
अर्थ : सर्व जगाला अत्यंत प्रिय असणारे शील [चारित्र्य] ज्याने विकसित केले आहे, त्याच्या बाबतीत अग्नी हा पाण्या [प्रमाणे शीतल] बनतो, समुद्र लहान डबक्या प्रमाणे [लहानसा] होतो, मेरू लगेचच लहान ढेकळा प्रमाणे होतो, सिंहाचा कळप हरणांसारखा [क्रूरता सोडून देतो] होतो, साप फुलांच्या हारासारखा [आनंददायी] होतो ,विष अमृता प्रमाणे बनते.
राजा भतृहरीच्या नीतिशतकातील हा श्लोक आहे.

Leave a Comment