संस्कृत सुभाषिते : ९

अहो दुर्जनसंसर्गान्मानहानिः पदे पदे |

पावको लोहासङ्गेन मुद्गरैरभिहन्यते ||
अर्थ : दुष्ट माणसाच्या सहवासाने पावलोपावली अपमान होतो. [लोखंड गरम करतात तेंव्हा] पावकाला [पवित्र अशा अग्नीला सुद्धा] लोखंडाच्या सहवासामुळे मोगरीचे [घण] तडाखे खावे लागतात.
हीयते हि मतिस्तात हीनैः सह समागमात् |
समैश्च समतामेति विशिष्टैश्च विशिष्टताम् ||
अर्थ : बाळा, हलक्या [किंवा कमी बुद्धी असलेल्याच्या] सहवासाने बुद्धीचा क्षय होतो. बरोबरीच्या [आपल्या सारख्याच लोकांच्या] सहवासाने तेवढीच राहते आणि [खूप] विशेष लोकांच्या सहवासाने अधिक चांगली बनते.
साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः |
तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ||
अर्थ : ज्याला साहित्य, गाणं किंवा एखादी कला येत नाही, तो माणूस म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेला पशूच होय. तो गवत न खाता जगतो हे पशूंच मोठंच भाग्य आहे.
तृणादपि लघुस्तूलः तूलादपि च याचकः |
वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति ||
अर्थ : गवतापेक्षाही कापूस हलका असतो, कापसापेक्षा याचक क्षुद्र असतो. [मग प्रश्न असा पडतो की] वाऱ्याने त्याला उडवले कसे नाही? तर माझ्याजवळ काहीतरी मागेल म्हणून.
पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि नवमित्यवद्यम् |
सन्तः परीक्ष्यान्यतरद्भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः ||
अर्थ : सर्वच जुन्या गोष्टी चांगल्या नसतात किंवा नवीन आहे म्हणून वाईट पण नसतात. सज्जन लोक विचारपूर्वक त्यापैकी जे चांगलं असेल त्याची निवड करतात. मूर्ख मात्र दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे [चांगलं वाईट] ठरवतात.
मालविकाग्निमित्र या कालिदासाच्या नाटकातील पहिल्या अंकातला हा श्लोक आहे.
दूरेऽपि श्रुत्वा भवदीयकीर्तिं कर्णौ हि त्रृप्तौ न च चक्षुषी मे |
तयोर्विवादं परिहर्तुकामः समागतोऽहं तव दर्शनाय ||
अर्थ : खूप लांबवरून आपली कीर्ति ऐकून कानांच समाधान झालं पण [ आपलं दर्शन लांबून होऊ शकत नसल्याने] डोळे मात्र अतृप्त राहिले. [म्हणून] त्याचं भांडण होऊ लागलं ते मिटवण्यासाठी मी [आपल्या दर्शनाने डोळ्यांना सुखी करण्यासाठी] आलो आहे.
स्वभावं न जहात्येव साधुरापद्गतोऽपि सन् |
कर्पूरः पावकस्पृष्टः सौरभं लभतेतराम् ||
अर्थ : संकट कोसळलं म्हणून सज्जन स्वतःचा [सुस्वभाव] कधीहि सोडत नाही. कापाराला अग्नीचा स्पर्श झाला [जळून नाहीसा होण्याची वेळ आली तर उलट] तरी तो अधिकच सुगंधित होतो.