संस्कृत सुभाषिते : १०

भारतं पञ्चमो वेदः सुपुत्रः सप्तमो रसः |

दाता पञ्चदशं रत्नं जामातो दशमो ग्रहः ||
अर्थ : महाभारत हे पाचवा वेद [वेदा इतका पवित्र]आहे. चांगला मुलगा सातवा रस आहे.[अन्नातल्या षड्रसांप्रमाणे सुख देतो]. उदार मनुष्य हे पंधरावे रत्नच आहे. जावई नऊ ग्रहांप्रमाणे दहावा ग्रहच आहे. [मंगळ, शनी वगैरे ग्रहांप्रमाणे त्रास देऊ शकतो.]
रिक्तपाणिर्न पश्येत् राजानं देवतां गुरुम् |
दैवज्ञं भिषजं मित्रं फलेन फलमादिशेत् ||
अर्थ : राजा, देव, गुरु, ज्योतिषी, वैद्य आणि मित्र यांच्याकडे रिकाम्या हाताने जाऊ नये. काही वस्तू, फळ देऊन त्याचं फळ मिळवावे.
मलिनैरलकैरेतैः शुक्लत्वं प्रकटीकृतम् |
तद्रोषादिव निर्याता वदनाद्रदनावलिः ||
अर्थ : कवि म्हातारपणाचे वर्णन करतो. मळकट [काळ्या] केसांचे पांढरे केस झाले. त्याचा राग येऊन की काय दाताची कवळी तोंडातून निघून गेली. [पांढरे असणं हा दातांचा गुण केसांनी चोरला अस वाटून रागावून दात निघून गेले.]
दर्शने स्पर्शने वाऽपि श्रवणे भाषणेऽपि वा |
यत्र द्रवत्यन्तरङ्गं स स्नेह इति कथ्यते ||
अर्थ : जीला [व्यक्ति नुसती] पाहिल्यावर, तिला नुसता स्पर्श केला तरी, तिचं बोलण ऐकून, तिच्या बद्दल गोष्टी ऐकून, तिच्याशी बोलून किंवा तिच्याबद्दल बोलून मनात भावना तरंग [तिच्याबद्दल चांगले] उठतात असं असेल, तर त्याला प्रेम असं म्हणतात.
यथा गजपतिः श्रान्तश्छायार्थी वृक्षमाश्रितः |
विश्रम्य तं द्रुमं हन्ति तथा नीचः स्वमाश्रयम् ||
अर्थ : ज्याप्रमाणे थकल्यामुळे झाडाच्या सावलीला आलेला हत्तींचा राजा विश्रांती झाल्यावर [तेच] झाड तोडतो. त्याप्रमाणे दुष्ट मनुष्य आपल्याला मदत करणाऱ्याचा [सुद्धा] नाश करतो.
चित्ते भ्रान्तिर्जायते मद्यपानाद्भ्रान्ते चित्ते पापचर्यामुपैति |
पापं कृत्वा दुर्गतिं यान्ति मूढास्तस्मान्मद्यं नैव पेयं न पेयम् ||
अर्थ : दारू प्यायल्याने मनात गोंधळ निर्माण होतो. मन थाऱ्यावर नसलं की पापाचरण घडतं. अशा प्रकारे पाप करून मूर्ख लोक नरकात पडतात. त्यामुळे दारू पिऊ नये, मुळीच पिऊ नये.
मौनं कालविलम्बश्च प्रयाणं भूमिदर्शनम् |
भ्रृकुट्यन्यमुखी वार्ता नकारः षड्विधः स्मृतः ||
अर्थ : गप्प बसणे, वेळ लावणे, निघून जाणे, जमिनीकडे बघत बसणे, भुवया वाकड्या करणे, दुसर्‍याशीच बोलत बसणे अशा सहा रीतींनी नकार दिला जातो.
साक्षरा विपरीताश्चेद्राक्षसा एव केवलम् |
सरसो विपरीतश्चेत्सरसत्वं न मुञ्चति ||
अर्थ : सुशिक्षित [साक्षरा हे बहुवचन आहे] जर उलटले [साक्षरा हा शब्द उलट वाचला] तर राक्षस होतात. [सुशिक्षित उलटले तर राक्षसांप्रमाणे त्रास देतात ,रा-क्ष-सा उलट सा-क्ष-रा ] पण सुसंस्कृत [सरस] उलटले तरी ते सरसत्व [स-र-स उलट स-र-स ] सोडत नाहीत.
मृदोः परिभवो नित्यं वैरं तीक्ष्णस्य नित्यशः |
उत्स्रृज्य तद्द्वयं तस्मान्मध्यां वृत्तिं समाश्रयेत् ||
अर्थ : [फार] मऊपणाने वागलं तर नेहमी अपमान होतो. खूप तापटपणा केला तर [सगळ्यांशी] भांडणं होतात. म्हणून या दोन्ही गोष्टी सोडून [माणसाने] मध्यममार्ग स्वीकारावा.