संस्कृत सुभाषिते : १५

सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति |
कन्दैः फलैर्मुनिवराः क्षपयन्ति कालं संतोष एव पुरुषस्य परं निधानम् ||
अर्थ : साप हवा खाऊन राहतात पण ते अशक्त नसतात, वाळलेली पाने खाऊन रानटी हत्ती ताकदवान होतात, थोर ऋषी कंदमुळे खाऊन दिवस काढतात समाधान हाच माणसाचा मोठा खजिना आहे.
विधे पिधेहि शीतांशुं यावन्नायाति मे प्रियः |
आगते दयिते कुर्याः शतचन्द्रं नभस्तलम् ||
समस्या : शतचन्द्रं नभस्तलम्
अर्थ : हे ब्रह्मदेवा, माझा प्रियकर येई पर्यंत चंद्राला लपव [नायिकेला चंद्राच्या दर्शनाने विरहाचा त्रास जास्त होतो. म्हणून चन्द्र नाहीसा करायला ती सांगते.] मग तो आल्यावर [वाटल्यास] आकाशात शंभर चन्द्र का आणीनास?
चलत्तरङ्गरङ्गायां गङ्गायां प्रतिबिम्बितम् |
सचन्द्रं शोभतेऽत्यर्थं शतचन्द्रं नभस्तलम् ||
अर्थ : गंगेच्या अतिशय हालणाऱ्या लाटांवर प्रतिबिंबित झालेल्या. आकाशात चंद्र असल्याने ते शंभर [हालणाऱ्या लाटांमुळे शंभर प्रतिबिंबे पडल्यामुळे] चंद्र असल्याप्रमाणे अतिशय शोभून दिसते.
दामोदारकराघातविव्हलीकृतचेतसा |
दृष्टं चाणूरमल्लेन शतचन्द्रं नभस्तलम् ||
अर्थ : कृष्णाच्या हातांच्या तडाख्यांनी कळवळून गेलेल्या [चीत झाल्याने पाठीवर पडलेल्या] चाणूर मल्लाला आकाशात शंभर चंद्र दिसले. [काजवे चमकल्याने शंभर चंद्र दिसल्या प्रमाणे गरगरले. ]
प्रदोषे दीपकश्चन्द्रः प्रभाते दीपको रविः ।
त्रैलोक्ये दीपको धर्मः सुपुत्रः कुलदीपकः॥
अर्थ : प्रदोषसमयी चंद्रामुळे प्रकाश मिळतो तर दिवसा सूर्यामुळे. तिन्हीलोकात धर्माचरण उपयोगी येते, तर सुपुत्र कुळाचा उद्धार करतो.
पात्रापात्रविवेकोऽस्ति धेनुपन्नगयोरिव ।
तृणात्सञ्जायते क्षीरं क्षीरात्सञ्जायते विषम्‌ ॥
अर्थ : (दान देताना) योग्य आणि अयोग्याचा (दान ज्याला देणार त्याचा) विचार गाय आणि सापाप्रमाणे करावा. जसे गाय गवतापासून (गवत खाऊन) दूध निर्माण करते तर साप दुधापासून विष निर्माण करतो. (त्यामुळे सत्पात्री दान करावे असे सुचविले आहे.)
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनंजय |
सिध्यसिद्धयोः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ||गीता २ .४८ कर्मयोगाची व्याख्या दुसरी ओळ
अर्थ : कर्मयोगाचा अंगीकार करून आसक्ती सोडून कर्तव्य कर. हे अर्जुना फलप्राप्ती आणि काम पुरे न होणे या बाबत तटस्थ असणे, [त्यांचा विचार न करता काम करणे यालाच [कर्म] योग असे म्हणतात.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि ||गीता २ .४७ कर्मयोगाची चतुस्सूत्री.
अर्थ : कर्तव्य बजावण्यावर तुझा अधिकार आहे पण फलप्राप्तीवर कधीच नाही. फळावर लक्ष ठेवून काम करू नकोस. आळशीपणा [कर्तव्य टाळण्याकडे] वर प्रेम करू नकोस.