संस्कृत सुभाषिते : १६

अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशनविहीनं जातं तुण्डम्|
वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चत्याशा पिण्डम् ||
अर्थ : शरीर थकले आहे. डोके पांढरे झाले आहे. तोंडात दात नाहीत. म्हातारा काठी घेऊन जात आहे. [इतके म्हातारपण आले तरीहि] हाव माणसाला सोडत नाही.
हा श्लोक शंकराचार्यांचा आहे
तैलाद्रक्षेत् जलाद्रक्षेत् रक्षेत् शिथिलबंधनात् ।
मूर्खहस्ते न दातव्यमेवं वदति पुस्तकम् ॥
अर्थ : पुस्तक म्हणते की तेलापासून माझे रक्षण करा, पाण्यापासून माझे रक्षण करा, माझे बंध शिथिल होणार नाहीत असे बघा, आणि मूर्ख लोकांच्या हातात मला देऊ नका.
सुलभाः पुरुषा राजन् सततं प्रियवादिनः ।
अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः ॥
अर्थ : सतत प्रिय बोलणारी माणसे जगात सुलभ आहेत. परंतु अप्रिय पण हिताचे बोलणार वक्ता आणि श्रोता दोघेही मिळणे दुर्लभ आहे.
अकृत्वा परसन्तापं अगत्वा खलानम्रताम् |
अनुसृत्य सतां वर्त्म यदल्पमपि तद्बहु ||
अर्थ : दुसर्‍याला त्रास न देता, दुष्टांशी लाचारी न करता जरी थोडंच [मिळालं] तरी ते पुष्कळ आहे. [नेहेमी आपले आचरण शुध्द ठेवावे मग फळ जरी थोडे कमी मिळाले तरी चालेल.]
शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे ।
साधवो नहि सर्वत्र चंदनं न वने वने ॥
अर्थ : प्रत्येक पर्वतावर माणिक सापडत नाही, प्रत्येक हत्तीमधे मोतीमिळत नाही (अशी एक समजूत आहे की हत्तीच्या गंडस्थळामधे मोती असतो), सज्जन माणसे सगळीकडे नसतात (आणि) प्रत्येक अरण्यात चंदनाची झाडे नसतात. (चांगल्या गोष्टी दुर्मिळ असतात)
पिपीलिकार्जितं धान्यं मक्षिकासञ्चितं मधु ।
लुब्धेन सञ्चितं द्रव्यं समूलं हि विनश्यति ॥
अर्थ : मुंग्यांनी जमवलेले अन्न, मधमाश्यांनी साठवलेला मध (आणि) कंजूस माणसाने साठवलेले धन ह्या सगळ्यांचा संपूर्ण नाश होतो. (ह्या गोष्टी कोणीतरी चोरतेच)
यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पण्डितः स श्रुतवान् गुणज्ञः ।
स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते ॥
अर्थ : ज्याच्याकडे पैसे आहेत तोच माणूस घरंदाज, तोच बुद्धिमान, तोच गुण जाणणारा आणि शिकलेला. तोच (चांगला) वक्ता आणि तोच देखणा. (खरे आहे) सगळे गुण सोन्याच्या (संपत्तीच्या) आश्रयाला असतात.
हस्तस्य भूषणं दानं सत्यं कण्ठस्य भूषणम् |
श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणैः किं प्रयोजनम् ||
अर्थ : दान [करणे] हा हाताचा अलंकार आहे. खरे [बोलणे] हा गळ्याचा अलंकार आहे. शास्त्रांचा [अभ्यास करणे] हा कानाचा अलंकार आहे. [दुसऱ्या] अलंकाराची जरूरच काय?
काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी |
देशोऽयं क्षोभरहितः सज्जनाः सन्तु निर्भयाः ||
अर्थ : पाऊस [योग्य] वेळी पडो. पृथ्वी धान्यांनी बहरलेली शोभून दिसो. ह्या आपल्या देशात शांती नांदो. सज्जन लोक निर्भय राहोत.

Leave a Comment