संस्कृत सुभाषिते : १७

त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।

ग्रामं जनपदस्यार्थे ह्यात्मार्थे पृथिवीं त्यजेत् ॥

अर्थ : कुटुंबाच्या भल्यासाठी एकाचा त्याग करावा (बळी द्यावा), गावासाठी एका घराचा त्याग करावा, शहरासाठी गावाचा त्याग करावा तर स्वतःसाठी पृथ्वीचा त्याग करावा.

अर्थनाशं मनस्तापं गृहे दुश्चरितानि च ।


वञ्चनं चापमानं च मतिमान्न प्रकाशयेत् ॥

अर्थ : पैशाचा ह्रास, मनाला झालेला त्रास आणि घरी घडलेल्या वाईट गोष्टी आणि फसवणूक आणि अपमान – ह्या गोष्टी शहाण्या माणसाने उघड करू नयेत

वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम् ।


वृथा दानम् समर्थस्य वृथा दीपो दिवाऽपि च ॥

अर्थ : समुद्रामधे झालेला पाऊस व्यर्थ, भूक नसलेल्याला जेवण देणे व्यर्थ. श्रीमंताला दिलेले दान व्यर्थ आणि दिवसा लावलेला दिवा पण व्यर्थ.

अल्पाक्षरमसन्दिग्धं सारवद्विश्ववतोमुखम् |


अस्तोभमनवद्यं च सूत्रं सूत्रविदो विदुः ||

अर्थ : कमीत कमी अक्षरात लिहिलेले, अर्थ अगदी स्पष्ट असणारे, [कुठला तरी] मुद्दा मांडणारे, सर्व उदाहरणात वापरता येते असे निर्दोष [वाक्य] म्हणजे सूत्र असे ज्ञानी लोक म्हणतात

येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः |


तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः ||

अर्थ : माणसांची वाणी विपुल अशा [बिनचूक] शब्द रूपी स्वच्छ उदकाने शुद्ध केली अज्ञानाचा अंधार नाहीसा केला त्या [ थोर महर्षी] पाणिनींना नमस्कार असो

उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात् परं बलम् ।


सोत्साहस्य हि लोकेषु न किंचिदपि दुर्लभम् ॥

अर्थ : हे भल्यामाणसा, उत्साह दाखव (आणि सज्ज हो). उत्साहापेक्षा श्रेष्ठ बळ नाही. ह्या जगात उत्साही माणसाला काहीच अशक्य नाही.

टीप : जेव्हा सीतेला रावण पळवून नेतो त्यावेळी हताश झालेल्या रामाला उद्देशून लक्ष्मण वरील श्लोक म्हणतो.

उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा ।


संपत्तौ च विपत्तौ च महतामेकरुपता ॥

अर्थ : सूर्य उगवतांना तसेच मावळतांना लाल असतो, त्याप्रमाणे थोर माणसे चांगल्या तसेच कठीण प्रसंगी सारखीच असतात (वागतात).

रामाभिषेके जलमाहरन्त्याः हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्याः |


सोपानमार्गेण करोति शब्दं ठ ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ ||

अर्थ : रामराज्याभिषेकासाठी पाणी आणतांना सोन्याची घागर तरुणीच्या हातातून सुटून जिन्यावरून ठ ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ असा आवाज करत खाली येते.

असितगिरिसमं स्यात्‌ कज्जलं सिन्धुपात्रे सुरतरुवरशाखा लेखनी पत्रमूर्वी |


लिखति यदि गृहीत्वा शारदा सार्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति ||

अर्थ : पर्वताएवढे काजळ हीच शाई, समुद्ररुपी भांडेकरून, कागद म्हणून पृथ्वीवर जर सरस्वतीने कल्पवृक्ष्याच्या फांदीच्या लेखणीने सतत लिहीले तरी हे परमेश्वरा तुझ्या गुणांचा अंत येणार नाही.

अशनं मे वसनं मे जाया मे बन्धुवर्गो मे|


इति मे मे कुर्वाणं कालवृकॉ हन्ति पुरुषाजम् ||

अर्थ : [हे] अन्न मे, [अस्मद सर्वनाम षष्टी एकवचन अर्थ माझे] कपडे मे, [माझे] पत्नी मे,[माझी] हे नातेवाईक मे, [माझे] असे मे मे करणाऱ्या मनुष्य रूपी बोकडाला काळ रूपी लांडगा ठार मारतो.

Leave a Comment