संस्कृत सुभाषिते : १८

अपेक्षन्ते न च स्नेहं न पात्रं न दशान्तरम् |
सदा लोकहिते युक्ताः रत्नदीपा इवोत्तमाः ||
अर्थ : ज्याप्रमाणे रत्न रूपी दिवे स्नेहाची [तेलाची] पात्राची [समई वगैरे वस्तूंची] दशेची [वातीची] अपेक्षा न करता नेहमी प्रकाश पाडण्यात मग्न असतात, त्याप्रमाणे श्रेष्ठ लोक स्नेहाची [त्यांना प्रेम दिल पाहिजे अशी, ज्याला द्यायचं तो] पात्र [लायक] पाहिजे किंवा [वाईट] दशेतला पाहिजे, अशी अपेक्षा न ठेवता सतत लोकांचे कल्याण करण्यात मग्न असतात.
सर्वं परवशं दुःखं सर्वमात्मवशं सुखम् |
एतद्विद्यात् समासेन लक्षणं सुखदुःखयोः ||
अर्थ : ज्या गोष्टी आपल्याजवळ असतात त्याला सुख [म्हणावं] आणि जे दुसऱ्याच्या ताब्यात असतं ते [वापरण्याची इच्छा करणे] म्हणजे दुःख. अशी सुख दुःखाची थोडक्यात व्याख्या आहे.
मनो यस्य वशे तस्य भवेत्सर्वं जगद्वशे |
मनसस्तु वशे योऽस्ति स सर्वजगतो वशे ||
अर्थ : ज्याच्या मन ताब्यात असेल, त्याच्या ताब्यात सर्व जग आहे. पण जो मनाच्या ताब्यात आहे, [ज्याचा मनावर संयम नाही] त्याच्यावर सगळ्या जगाची सत्ता चालते.
सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः |
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ||
अर्थ : ह्या [जगामध्ये] सर्वजण सुखी राहोत. सर्वजण निरोगी असोत. सर्वांचे खूप कल्याण होवो. कोणालाही दुःख भोगायला लागू नये.
सहसा विदधीत न क्रियामविवेकः परमापदां पदम् |
वृणुते हि विम्रृश्यकारिणं गुणलुब्धः स्वयमेव सम्पदः ||
अर्थ : [कोणतेही] काम एकदम [विचार न करता] करू नये. अविचार हा मोठ्या संकटाचे स्थान असतो. लक्ष्मी [शब्दशः सम्पत्ती] स्वतः विचार करून काम करणाऱ्याला वरते.
हा भारवीचा श्लोक आहे.
सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डितः ।
अर्धेन कुरुते कार्यम् सर्वनाशो न जायते ॥
अर्थ : विनाश जवळ आल्यावर बुद्धिमान अर्ध्याचा त्याग करतात (अर्ध्यागोष्टी सोडून देतात) आणि (राहिलेल्या) अर्ध्यामधे काम भागवतात, त्यामूळे सर्वनाश होत नाही.
न कश्चिदपि जानाति किं कस्य श्वो भविष्यति ।
अतः श्वः करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान् ॥
अर्थ : कोणाचे कधी काय होईल हे कोणालाच माहीत नसते. म्हणून हुशार माणसाने कामे लगेच करावी (उगाच कर्तव्यात चालढकल करू नये)
नाहं जानामि केयुरे नाहं जानामि कुण्डले ।
नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात् ॥
अर्थ : मी वाकी ओळखत नाही (आणि) मी कर्णफुले ओळखत नाही. पण नेहमी पायांना नमस्कार करत असल्यामूळे मी पैंजण मात्र ओळखतो.
टीप : जेव्हा रावणाने पळवलेल्या सीतेचे दागिने राम आणि लक्ष्मणाला मिळतात त्यावेळी लक्ष्मणाचे हे उद्गार आहेत.
काचं मणिं काञ्चनमेकसूत्रे मुग्धाः निबध्नन्ति किमत्र चित्रम् |
विचारवान् पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह ||
अर्थ : अडाणी लोक काचेचा [मणी] सोनं आणि रत्न अशा भारी आणि अगदी क्षुल्लक वस्तू एकाच सूत्रात [दोऱ्यात] गुंफतात यात नवल ते काय? ज्ञानी अशा पाणिनीने देखील श्वान [कुत्रं] युवा [तरुण] मघवा [इन्द्र] एकाच सूत्रात [सूत्राची व्याख्या श्लोक क्रमांक १०७] माळेत ओवले. [श्वायुवामघवा असं एक सूत्र आहे]

Leave a Comment