संस्कृत सुभाषिते : १९

सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः |

पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ||
अर्थ : सर्व उपनिषदातील [तत्त्वज्ञान]ह्याचा अर्थ गाई, श्रीकृष्ण हा दूध काढणारा, अर्जुन म्हणजे वासरू, जाणकार ह्याला [ते सारभूत तत्वज्ञान रूपी] अमृतासारखे श्रेष्ठ असे दूध म्हणजे गीतांमृत चाखायला मिळते.


यदीच्छसि वशीकर्तुं जगदेकेन कर्मणा|
परापवादसस्येषु चरन्तीं गां निवारय ||


अर्थ : जर एकाच कृत्याने जग ताब्यात आणण्याची [तू] इच्छा करत असशील, तर दुसऱ्याचे दोष रूपी धान्यावर चरत असलेल्या [आपल्या] वाणिरूपी गाईला अडव. [दुसऱ्यांची निंदा करून आपण शत्रू करून घेत असतो. ]




सद्विद्या यदि का चिन्ता वराकोदरपूरणे |


शुकोऽप्यशनमाप्नोति राम रामेति च ब्रुवन् ||


अर्थ : जर चांगलं शिक्षण झालं असलं तर, क्षुल्लक पोट भरण्याची, काय काळजी? [केवळ] राम राम असे बोलण्याने पोपटसुद्धा पोट भरतो.


सम्पुर्णकुम्भो न करोति शब्दम् अर्धो घटो घोषमुपैति नूनम् ।


विद्वान कुलीनो न करोति गर्वम् जल्पन्ति मूढास्तु गुणैर्विहीनाः ।।


अर्थ : पाण्याने पूर्ण भरलेल्या घागरीचा (घागरीतील पाण्याचा) आवाज येत नाही, अर्धवट भरलेल्या घागरीचा मात्र येतो. त्याचप्रमाणे विद्वान, चांगली माणसे गर्व करत नाही, अडाणी मूर्खमात्र उगाच बडबड करतात.


अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम् ।


अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवं च विद्यया ॥


अर्थ : अन्नदान श्रेष्ठ आहे, पण विद्यादान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण अन्नामूळे त्यावेळेची भूक भागते मात्र विद्येमूळे संपूर्ण आयुष्याची.


काचः काञ्चनसम्पर्कात् धत्ते मारकतिं द्युतिम् ।


तथा सत्सन्निधानेन मूर्खोयाति प्रवीणताम् ॥


अर्थ : काचसुद्धा सोन्याच्या संपर्कात येऊन चमकते. त्याप्रमाणे चांगल्या लोकांच्या सहवासामूळे मूर्खसुद्धा तरबेज होतात.


पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनम्।


कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम् ||


अर्थ : दुसर्‍याला दिलेले पैसे आणि [घरात असलेल्या, डोक्यात न पोहोचलेल्या] विद्येचा जरूरीच्या वेळी काही उपयोग होत नाही.


गते शोको न कर्तव्यो भविष्यम नैव चिन्तयेत्‌।


वर्तमानेन कालेन बुधो लोके प्रवर्तते॥


अर्थ : जे [झाले] गेले, त्याच्याविषयी दु:ख करू नये. पुढे होणार्‍या गोष्टींचा विचार [काळजी] मुळीच करू नये. शहाणा माणूस या जगात चालू काळाला अनुसरून वागत असतो.


आलस्येन गतं दीर्घ जीवितं न हि जीवितम्‌।


क्षणमेकं सुयत्नेन यो जीवति स जीवति ॥


अर्थ : आळशीपणाने गेलेले आयुष्य दीर्घ [लांब] असले [तरी] हे खरे [सफल] आयुष्य नव्हे. एक क्षण [का होईना, पण] चांगला प्रयत्न करून जो जगतो तोच [खरा] जगतो.


रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं भास्वानुदेष्यति हसिष्यति पङ्कजश्री: ।


इत्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार ॥


अर्थ : रात्र जाऊन सकाळ होईल, सूर्य उगवेल आणि कमळ उमलेल. (आणि तेव्हा मला बाहेर पडता येईल) अशी स्वप्न कमळाच्या कोशात अडकलेला भुंगा बघतो. पण हाय रे देवा, हत्तींनी त्या कमळालाच पायदळी तुडवलं. (आणि त्याचबरोबर भुंग्याच स्वप्नदेखील.)

Leave a Comment