संस्कृत सुभाषिते : २१

दारिद्र्य भोस्त्वं परमं विवेकि गुणाधिके पुंसि सदानुरक्तम् |

विद्याविहीने गुणवर्जिते च मुहूर्तमात्रं न रतिं करोषि ||

अर्थ : हे दारिद्र्या, तू फार विचारी आहेस नेहमी खूप गुणी अशा माणसावर प्रेम करतोस. [त्यांच्याकडे राहून त्यांना गरीब करतोस]पण शिक्षण नसलेल्या किंवा [कोणतेही] गुण नसलेल्या [माणसांवर] क्षणभर सुद्धा प्रेम करीत नाहीस.


प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति प्राणिन:|


तस्मात तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रता ||

अर्थ : गोड बोलण्याने सर्व माणसांना आनंद होतो. म्हणून तसेच बोलावे. बोलण्यात कंजूषपणा [शब्दशः गरिबी]कशाला?


वितरति गुरु: प्राज्ञे विद्यां यथैव तथा जडे न तु तयोः ज्ञाने वृत्तिं करोत्यपहन्ति वा |


भवति च पुन: भूयान् भेद: फलं प्रति तद् यथा प्रभवति शुचि: बिम्बग्राहे मणिः न् मृदां चय: ||

अर्थ : गुरु ज्ञानी [हुशार] विद्यार्थ्याला जसं ज्ञान देतो तसंच, मंद [मुलाला] पण देतो. त्यात एकाला अधिक किंवा कमी करीत नाही. पण फळाच्या बाबतीत फार फरक पडतो. जसं प्रतिबिम्ब ग्रहण करण्याच्या बाबतीत तेजस्वी हिरा समर्थ असतो, मातीचे ढेकूळ नव्हे.

हा श्लोक भवभूतीच्या उत्तररामचरितातला आहे.


लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा: धन्वन्तरिश्चन्द्रमा: गाव: कामदुभ: सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङना: |


अश्व: सप्तमुखो विषं हरिधनु: शङखोऽमृतं चाम्बुधे: रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मङगलम् ||

अर्थ : लक्ष्मी [धनाची देवता], कौस्तुभ, प्राजक्त, दारू, धन्वन्तरी [देवांचा वैद्य ], चंद्र, कामधेनु, ऐरावत [इन्द्राचा हत्ती], उर्वशी वगैरे अप्सरा, सात तोंडे असलेला [सूर्याचा] घोडा, विष, विष्णूचे धनुष्य, शङख आणि अमृत, अशी समुद्रातून निघालेली हि चौदा रत्ने तुमचे नेहमी कल्याण करोत.


यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ|


समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागम:||

अर्थ : ज्याप्रमाणे एखाद लाकूड आणि दुसर लाकूड महासागरात जवळ येतात. जवळ आल्यावर [काही वेळाने] दूर जातात. [ते लाटा, भरती, ओहोटी वगैरे गोष्टींवर अवलंबून असते] त्याप्रमाणे प्राण्यांचा सहवास असतो. हा श्लोक महाभारतातील आहे.


वनेऽपि सिंहाः मृगमांसभक्षा बुभुक्षिता नैव तृणं चरन्ति ।


एवं कुलीनाः व्यसनाभिभूता न नीतिमार्गं परिलंघयन्ति ॥

अर्थ : अरण्यात प्राण्यांचे मांस खाणारे सिंह, भुकेले असले तरी गवत खात नाहीत. त्याप्रमाणे, घरंदाज (सज्जन) कितीही संकटात असले तरी योग्य (न्याय्य) मार्ग सोडत नाही.


सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम् ।


दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ॥

अर्थ : दास असो वा दासीपुत्र, जो कोणी मी असू दे. कोणत्या कुळात जन्माला यायचे ते नशीबावर अवलंबून असते, पराक्रम मात्र स्वतःवर.


आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् |


सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||

अर्थ : ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पाणी [शेवटी ] समुद्राला मिळते, त्याप्रमाणे [कुठल्याही] देवाला केलेला नमस्कार विष्णूलाच पोचतो.


लज्जास्पदं न दारिद्र्यं पुरुषस्य कदाचन |


दरिद्रोऽस्मीति जिह्रेति यत्त्वसौ तद् ह्रिय: पदम् ||

अर्थ : माणसाला कधीही गरीब आहे हि गोष्ट लज्जास्पद नाही. [मी ] गरीब आहे म्हणून तो लाजतो हे लज्जास्पद आहे.


नक्रः स्वस्थानमासाद्य गजेन्द्रमपि कर्षति ।


स एव प्रच्युत स्थानात् शुनापि परिभूयते ॥

अर्थ : मगर स्वतःच्या ठिकाणी (पाण्यात) राहून हत्तीला सुद्धा ओढून घेते. त्याने स्वतःची जागा सोडल्यास (पाण्यातून बाहेर आल्यास) मात्र कुत्रासुद्धा त्याला हरवतो.