संस्कृत सुभाषिते : २४

काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिककाकयोः ।


वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ॥
अर्थ :कावळा काळा, कोकिळ पण काळा. कावळा आणि कोकिळेत फरक काय? वसंत ‌ऋतु आल्यावर मात्र कावळा तो कावळा आणि कोकिळ तो कोकिळ. (वसंत ‌ऋतुचे कोकिळ गोड आवाजात स्वागत करतो, त्यावेळी दोघांमधील फरक लक्षात येतो).
टीप :प्रथमदर्शनी सज्जन आणि दुर्जन सारखेच दिसतात पण त्यांच्याशी व्यवहार केल्यावर मग खरं चांगला कोण ते समजते.

विद्या विवादाय धनं मदाय शक्तिः परेषां परपीडनाय ।


खलस्य साधोर्विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय ॥
अर्थ :वाईट माणसे विद्या भांडण करण्यासाठी, धन गर्व करण्यासाठी आणि बळ दुसर्‍यांना त्रास देण्यासाठी वापरतात. सज्जन माणसांचे मात्र ह्याच्या एकदम विरुद्ध असते. (विद्या) ज्ञानदानासाठी, (धन) देण्यासाठी आणि (बळ) दुसर्‍यांच्या रक्षणासाठी असते. (येथे कवीने यथासांख्य या अलंकाराचा सुंदर उपयोग केला आहे)
सज्जनस्य हृदयं नवनीतं यद्वदन्ति कवयस्तदलीकम् ।


अन्यदेहविलसत्परितापात सज्जनो द्रवति नो नवनीतम् ॥
अर्थ :सज्जनांचे हृदय लोण्यासारखे असते असे कवि म्हणतात ते खोटे आहे. (कारण) दुसर्‍याला होणार्‍या दुःखामुळे सज्जन पाघळतो पण लोणी नाही.
अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम् ।


अधनस्य कुतो मित्रम् अमित्रस्य कुतः सुखम् ॥
अर्थ :आळशी माणसाला विद्या कशी मिळणार, ज्याच्याकडे विद्या नाही त्याला संपत्ती कशी मिळणार, ज्याच्याकडे संपत्ती नाही त्याला मित्र कुठून आणि मित्र नसलेल्याला सुख कसे मिळणार? (थोडक्यात आळशी माणसाला सुख मिळणे अवघड आहे).
न स्थातव्यं न गन्तव्यं क्षणमप्यधमै: सह |


पयोऽपि शौण्डिकीहस्ते वारुणीत्यभिधीयते ||
अर्थ :[माणसाने ] क्षणभर सुद्धा नीच लोकांबरोबर थांबू नये किंवा [कोठे] जाऊ नये. कलालाच्या [दारु बनवणारा] हातात दूध असलं तरी [लोक] त्याला दारूच म्हणतात.

ग्रहाणां चरितं स्वप्नोऽ निमित्तान्युपयाचितम् |


फलन्ति काकतालीयं प्राज्ञास्तेभ्यो न बिभ्यति ||
अर्थ :[कुंडलीतील] ग्रहांचे फेरे, [पडलेली] स्वप्न, शकून किंवा अपशकून आणि नवस हे कावळ्याने बसल्यावर फांदी मोडावी त्याप्रमाणे [योगायोगाने] फलद्रुप होतात बुध्दिमान माणसे त्यांना घाबरत नाहीत.
यावत् जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् |


भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत : ||
अर्थ :जीवनात सुखेनैव जगावे. गरज पडल्यास कर्ज काढून तूपरोटी खावी. एकदा देहाची राख झाल्यावर परत कोण येणार आहे?
हा चार्वाकाचा श्लोक असून त्यात संपूर्ण इहवादी तत्वज्ञान सांगितले आहे.
भो दारिद्र्य नमस्तुभ्यं सिद्धोऽहम् त्वत् प्रसादतः ।


पश्याम्यहं जगत् सर्वम् न मां पश्यति कश्चन ॥
अर्थ :हे दारिद्र्या, तुला नमस्कार असो. तुझ्या कृपेमुळे मी सिद्ध झालो आहे. (कारण) मी सगळ्या जगाला बघु शकतो पण मला कोणीच पाहु शकत नाही. (गरीब माणसाकडे कोणी लक्ष देत नाही म्हणुन एका भिकारी माणसाने केलेला हा विचार आहे)
क्षमा शस्त्रं करे यस्य दुर्जनः किं करिष्यति ।


अतृणे पतितो वन्हिः स्वयमेवोपशाम्यति ॥
अर्थ :क्षमा हेच ज्यांचे शस्त्र आहे त्यांना (क्षमाशील माणसांना) वाईट माणसे काय करणार? (ज्याप्रमाणे) गवत नसलेल्या जमिनीवर पडलेली (लागलेली) आग आपोआप विझून जाते.
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणम् ।


येन केन प्रकारेण प्रसिद्धपुरुषो भवेत ॥
अर्थ :मडके फोडावे, कपडे फाडावेत (किंवा) गाढवावर बसावे (पण) या ना त्याप्रकारे माणसाने प्रसिद्ध व्हावे.