संस्कृत सुभाषिते : २५

लालयेत् पञ्च वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् |
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् ||
अर्थ :पुत्र पाच वर्षाचा होई पर्यंत त्याचे लाड करावेत. पुढील दहा वर्षे होईपर्यंत मारावे.[शिस्त लावावी या अर्थाने] परंतु सोळा वर्षाचा झाल्यावर मात्र त्याला मित्राप्रमाणे वागवावे.
गुणाः कुर्वन्ति दूतत्वम् दूरेऽपि वसतां सताम् ।
केतकीगंधमाघ्रातुम् स्वयमायान्ति षट्पदाः ॥
अर्थ :ज्याप्रमाणे केवड्याच्या वासामुळे भुंगे त्याच्याकडे आकर्षित होतात, त्याप्रमाणे चांगल्या माणसांचे गुण त्यांची थोरवी दुरवर पसरवतात.
यौवनम् धनसम्पत्ति: प्रभुत्वमविवेकिता |
एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ||
अर्थ :तारुण्य, संपत्ती, प्रभुत्व आणि अविवेक यातिल एक एक गोष्ट देखिल विनाशाला कारणीभूत होते, मग जिथे चारही गोष्टी एकत्र असतील तर त्याची काय कथा?
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानाम् तु वसुधैव कुटुम्बकम् ॥
अर्थ :हा आपला तो परका असा भेदभाव हलक्यामनाची माणसे करतात. परंतु थोर माणसांसाठी (संपूर्ण) पृथ्वी परिवाराप्रमाणे असते.
वनानि दहतो वह्ने: सखा भवति मारुत: |
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ||
अर्थ :जेव्हा वणवा लागतो तेव्हा वारा तो पसरवण्यासाठी अग्नीला सहाय्य करतो. पण तोच वारा छोट्या दिव्याला मात्र क्षणात विझवून टाकतो. खरचं दुर्बलांशी कोणी मैत्री करत नाही.
निर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महती फटा|
विषं स्यात्‌ यदि वा न स्यात्‌ फटाटोपो भयङकर :||
अर्थ :साप बिनविषारी असला तरी त्याने मोठा फणा उगारावा विषारी असो किंवा नसो उभारलेला फणा भयंकर दिसतो [त्यामुळे सापाला स्वतःचे संरक्षण करता येईल तो जरी बिनविषारी असला तरी ]
भद्रं भद्रं कृतं मौनं कोकिलै: जलदागमे |
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ||
अर्थ :हा अन्योक्ती अलंकार असलेला श्लोक आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला कोकिळांनी मौन धारण केले ते फार चांगले झाले. कारण पावसाळ्याच्या सुरवातीला जेंव्हा बेडूक [डराव डराव असा घाणेरडया आवाजात ] बडबड करतात, तेंव्हा गप्प बसणेच चांगले. [जेंव्हा सामान्य बुद्धीची माणसे खूप बडबड करतात तेंव्हा प्रतिभावंतानी गप्प बसणेच चांगले. कारण त्यांची झेप सामान्यांना कळणार नाही. ]
अमंत्रम्‌ अक्षरं नास्तिनस्तिमूलमनौषध‍म्‌।
अयोग्यः पुरुषः नास्तियोजकस्तत्र दुर्लभः॥
अर्थ :मंत्रात ज्याचा उपयोग करता येत नाही असे एकही अक्षर नाही. ज्याच्यात औषधी गुणधर्म नाहीत अशी एकही मूळी नाही. सर्वथः अयोग्य असा कोणीही पुरुष नाही तर दुर्लभ काय आहे तर योजक. [म्हणजे ह्या सगळ्यांचा योग्य उपयोग करणारा माणूस मिळणे दुर्लभ आहे. ]
चिन्तनीया हि विपदां आदावेव प्रतिक्रिया ।
न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वन्हिना गृहे ॥
अर्थ :संकटाचा (संकटातुन सुटण्याचा) विचार (संकट येण्याच्या) आधीच करावा.(जसे) घर पेटल्यावर विहीर खणण्याचा काय उपयोग?