संस्कृत सुभाषिते : २६

उपदेशो हि मूर्खाणाम् प्रकोपायन शान्तये |
पय: पानम् भुजङगानाम्‌ केवलं विषवर्धनम् ||
अर्थ :[चांगल्या] उपदेशाने सुध्दामूर्ख लोक शान्त न होता अधिकच चिडतात. याला दृष्टांत म्हणजे दूध सापाचे विष फक्त वाढवते, दुधामुळे सापामधे चांगला फरक काही होत नाही.
युक्तियुक्तम् वच: ग्राह्यम् बालादपि शुकादपि|
युक्तिहीनम् वच: त्याज्यं वृद्धादपि शुकादपि ||
अर्थ :योग्य अशा बोलण्याचा जरी ते [लहान मुलांनी सांगितलं असलं] तरी किंवा पोपटानी सांगितलं असलं तरी [नुसतं ऐकून न समजता बोलणाऱ्याकडून] सु्द्धा स्वीकार करावा. [पण] बोलणे मूर्खपणाचे असेल तर जरी वयस्कर माणसाने सांगितले असले किंवा शुकाचार्यानी [अगदी विद्वान माणसाने] सांगितले तरी ते सोडून द्यावे.
स्वभावम् नैव मुञ्चन्ति सन्त: संसर्गतोऽसताम् |
न त्यजन्ति रुतम्‌ मञ्जु काकसंपर्कत: पिका: ||
अर्थ :दुष्ट लोकांचा सहवास असला तरीही सज्जन माणसे आपला स्वभाव सोडत नाहीत. [चांगलीच वागतात] कावळ्याच्या संगतीत असले तरी कोकीळ आपलं मधुर आवाजातील [कुहूकुहू] टाकून देत नाहीत. [ते कावळ्याप्रमाणे कर्कश ओरडत नाहीत.]
कुलीनै: सह संपर्कम् पण्डितै: सह मित्रताम् |
ज्ञातिभिश्च समम् मेलम् कुर्वाणो नावसीदति ||
अर्थ :घरंदाज लोकांशी संबंध, विद्वान लोकांशी मैत्री आणि आपल्या गाववाल्यांशी [चांगले] संबंध ठेवणार्‍यांचा [कधी] नाश होत नाही.
कस्तुरी जायते कस्मात् को हन्ति करिणाम् शतम् ।
भीरुः करोति किं युद्धे मृगात् सिंहः पलायते ॥
अर्थ :कस्तुरी कोणापासून मिळते (हरणापासून)? शंभर हत्तींना कोण मारतो (सिंह)? भित्रा युद्धामधे काय करतो (पळून जातो)? हरिणापासून सिंह पळून जातो.
टीप :समस्या प्रकारचा हा श्लोक आहे राजदरबारामध्ये कवीना चौथा चरण देऊन श्लोक रचणे अशी एक प्रकारे परीक्षा होती. हरीण सिंहाला पळवून लावते हे वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी पहिले तीन योग्य असे चरण कवीने रचले आहेत.
चलत्येकेन पादेन तिष्ठत्यन्येन बुद्धिमान्‌ |
नासमीक्ष्य परम् स्थानम् पूर्वमायतनम् त्यजेत् ||
अर्थ :बुद्धिमान मनुष्य एकच पाऊल [पुढे] टाकतो. एक तसेच [आहे त्या जागीच ] ठेवतो. पुढच्या जागेची [धंदा किंवा नोकरी यांची ] नीट परीक्षा केल्याशिवाय पहिली जागा सोडू नये.
अहं च त्वं च राजेन्द्र लोकनाथावुभावपि |
बहुव्रीहि: अहम् राजन् षष्ठीतत्पुरुषो भवान् ||
अर्थ :राजाची स्तुती मोठ्या चातुर्याने करण्याचा प्रयत्न कवीने केला आहे.
हे राजा, तू आणि मी दोघेही लोकनाथ आहोत. फरक इतकाच की मी बहुव्रीहि आहे [लोक ज्याचे नाथ आहेत असा] आणि तू षष्ठीत्तपुरुष आहेस. [लोकांचा नाथ]
वैद्यराज नम: तुभ्यं यमज्येष्ठसहोदर:|
यमस्तु हरते प्राणान् त्वं तु प्राणान् धनान्यपि ||
अर्थ :हे वैद्यराज, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही तर यमाचे मोठे भाऊच. यम प्राण हरण करतो पण तुम्ही प्राण आणि धन या दोन्हींचे हरण करतां.