संस्कृत सुभाषिते : २७

अपूर्वः कोऽपि कोषोयम् विद्यते तव भारती।
व्ययतो वृद्धिमायाति व्ययमायाति संचयात॥
अर्थ :हे सरस्वती, तुझ्याकडे विद्यारुपी विलक्षण खजिना आहे. ज्याचा खर्च केला असता त्या खजिन्यात वाढ होते आणि तो साठवुन ठेवल्यास त्याचा क्षय होतो.
अपूर्वः कोऽपि कोपाग्निः खलस्य सज्जनस्य च।

एकस्य शाम्यति स्नेहात् वर्धतेड्न्यस्य वारितः ॥
अर्थ :सज्जन आणि दुर्जन यांचा कोप रूपी अग्नी [भयंकर राग] याचे वर्णन करता येत नाही. पहिल्याचा [सज्जनाचा]राग स्नेहाने [आग असूनही स्नेह म्हणजे प्रेमाने]विझतो आणि दुसऱ्याचा वारित: [संस्कृतमध्ये वारि म्हणजे पाणी वारित: म्हणजे पाण्याने तसेच अडवले असता असा त्या शब्दाचा दुसरा अर्थ आहे] दुर्जनाचा राग वाढतो.
स्नेहाने एकाचा राग विझणे वारी [पाण्यामुळे]वाढणे असा सकृतदर्शनी विरोधाभास कवीने वर्णिला आहे

मनोजवं मारूततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धीमताम् वरिष्ठम् |
वातात्मजं वानरयूथमुख्यम्‌ श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ||
अर्थ :[मी] वाऱ्याप्रमाणे आणि मनाइतका वेग असणाऱ्या; इंद्रिये ताब्यात असणाऱ्या; बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या; वायुदेवाचा पुत्र असलेल्या; वानरांच्या सेनेचा प्रमुख असणाऱ्या श्रीरामाचा दूत असणाऱ्या [हनुमानाला] शरण जाते /जातो.
अस्माकं बदरीचक्रम्‌ युष्माकं बदरीतरु : |


बादरायणसंबधात्‌ यूयं यूयं वयम्‌ वयम् ||
अर्थ :आमच्या [बैलगाडीला] बोराच्या लाकडाचं चाक आहे. तुमच्याकडे बोरीचे झाड आहे. म्हणून तुम्ही म्हणजे आम्हीच आणि आम्ही म्हणजे तुम्ही. [अगदी सुताएवढं नातं किंवा संबध असताना त्याचा फायदा घेणारे लोक असतात ते असं नातं सांगतात]
आत्मनो मुखदोषेण बध्यंते शुकसारिका: |


बकास्तत्र न बध्यंते मौनम् सर्वार्थसाधनम् ||
अर्थ :पोपट आणि साळुंक्या स्वत:च्या [गोड आवाजाच्या खरंतर गुण पण लोकांनी पकडण्याच्या दृष्टीने] दोषामुळे बंधनात पडतात. बगळे [काही आवाज करत नसल्यामुळे] पकडले जात नाहीत [म्हणून] मौन सर्व हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्याचे साधन आहे.
पृथीव्याम् त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् ।


मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते ॥
अर्थ :ह्या पृथ्वीवर पाणी, अन्न आणि सुभाषिते ही ३ रत्ने आहेत. मुर्ख मात्र दगडांना रत्न म्हणून संबोधतात.
यया बद्धाः प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्तिपङ्गुवत् ॥


आशा नाम मनुष्याणाम् काचिदाश्चर्यशृंखला ।
अर्थ :माणसांमधे आशा नावाची एक आश्चर्यकारक बेडी आहे. ह्या बेडीने बांधलेली माणसे सतत धावत असतात आणि मोकळे असलेली माणसे पाय नसल्याप्रमाणे एका जागी बसतात.
अतिपरीचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति ।
मलये भिल्लपुरंध्री चन्दनतरुकाष्ठमिंधनम् कुरुते ॥
अर्थ :(ज्याप्रमाणे) मलयपर्वतावर राहणारी भिल्लिण चंदनाच्या झाडाचा सरपण म्हणून उपयोग करते, (त्याप्रमाणे) जास्त ओळखीमुळे अपमान आणि सारखे (कोणाकडे) गेल्यामुळे मानहानी होते.
नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने ।
विक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव मृग्रेन्द्रता ॥
अर्थ :अरण्यामधे सिंहावर राज्याभिषेक किंवा इतर कोणाताहि संस्कार केला जात नाही. स्वतःच्या शौर्याच्या बळावरच त्याला "प्राण्यांचा राजा" ही पदवी मिळते.
अजरामरवत प्राज्ञ : विद्यामर्थम्‌ च चिन्तयेत् |
गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ||
अर्थ :बुद्धिमान माणसाने शिक्षण आणि पैसे यांचा विचार आपण चिरंजीव असल्याप्रमाणे करावा आणि मृत्यूने जणू काही केस पकडले आहेत [तर भीतीने जसा माणूस चांगला वागेल तस] हे समजून धर्माचं आचरण कराव.

Leave a Comment