संस्कृत सुभाषिते : २८

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यार्थसिद्धये ||
अर्थ :हे मुख वक्र असणाऱ्या, शरीर विशाल असणाऱ्या, कोटी सूर्याच्याप्रमाणे तेजस्वी अशा देवा [माझी] सर्व कामे पूर्णव्हावी म्हणून [तू] सर्व संकटे नाहीशी कर.
न चोरहार्यम् न च राजहार्यम् न भ्रातृभाज्यम् न च भारकारी ।
व्यये कृते वर्धत एव नित्यम् विद्याधनं सर्वधनप्रधानम् ||
अर्थ :विद्यारूपी धन हे सर्व प्रकारच्या संपत्तीमध्ये श्रेष्ठ प्रकारची संपत्ती आहे. [कारण] चोर ती पळवू शकत नाही, राजा कर वगैरे रीतींनी घेऊ शकत नाही. तिची भावांमध्ये वाटणी होऊ शकत नाही. तिचे ओझे होत नाही. ती खर्च केली [दुस-याला दिली, शिकवलं] तर वाढते.
राकारोच्चारमात्रेण मुखान्नीर्याति पातकम् |
पुन: प्रवेशभीत्या एव मकारस्तत् कपाटवत् ||
अर्थ :राम हा उच्चार इतका पवित्र आहे की फक्त राचा उच्चार झाल्यावर पाप तोंडाबाहेर पळून जाते आणि त्याने पुन्हा आत प्रवेश करू नये म्हणून म चा असा उच्चार आहे की दाराच्या फळ्या बंद झाल्याप्रमाणे तोंड बंद होते त्यामुळे पाप परत आत येऊ शकत नाही.
अनारम्भो हि कार्याणाम् प्रथमं बुद्धीलक्षणम् |
प्रारब्धस्यान्तगमनम्‌ द्वितीयं बुद्धीलक्षणम् ||
अर्थ :कामाला मुळीच सुरवात न करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण आहे. पण माणसाला काहीतरी [काम]करावच लागत त्यामुळे जे [काम]सुरु केले असेल ते पूर्ण करणे हे बुध्दीचे दुसरे पण खरे लक्षण आहे.
माता मित्रम्‌ पिता चेति स्वभावात्‌ त्रितयम्‌ हितम्‌ |
कार्यकारणतश्चान्ये भवन्ति हितबुद्धय:||
अर्थ :निसर्गत: आई, वडील आणि मित्र हे त्रिकूट [आपल्याला ] कल्याणकारक असते ते आपल्या हितासाठी झटत असतात इतर सगळेजण काही निमित्ताने आपल्या हिताची इच्छा करतात. [त्यांचा स्वत:च्या फायदा तोट्याचा विचार करून सल्ला देतात.]
माता पिता गुरुश्चेति त्रयो वन्द्या नृणां सदा।
आयुर्यशो बलं चेति त्रीण्याप्नोति तदाशिषा॥
अर्थ :माणसांनी नेहमी आई, वडील आणि शिक्षक [गुरु ] यांना नमस्कार केला पाहीजे त्यांच्या आशीर्वादाने दीर्घ आयुष्य, कीर्ति आणि ताकद मिळते.
शतेषु जायते शूर: सहस्रेषु च पंडित: |
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ||
अर्थ :शंभर मुले जन्माला येतात तेंव्हा एक शूर जन्माला येतो हजारांमध्ये एक विद्वान असतो दहा हजारांमध्ये एक [चांगला] फर्डा वक्ता असतो [पण] उदार माणूस जन्माला येतो असे नाही कधी जन्माला येतो कधी येत पण नाही.
[यातील शेवटच्या वा न वा म्हणजे होतो किंवा होत पण नाही या शब्दांवरून वानवा म्हणजे दुर्मिळता असा शब्द मराठीत तयार झाला आहे]
दुर्जन: परिहर्तव्य: विद्ययाऽलंकृतोऽपि सन|
मणिना भूषित: सर्प: किमसौ न भयङकर:||
अर्थ :सुशिक्षित असला तरी दुष्ट माणूस टाळावा ज्याच्या [फण्यावर] रत्न असते असा साप भीतीदायक नसतो काय? [निश्चित असा साप भीतीदायक असतो.]
गौरवं प्राप्यते दानात्‌ न तु वित्तस्य संचयात्‌ |
स्थितिरुचै: पयोदानाम्‌ पयोधीनाम्‌ अध: स्थिति: ||
अर्थ :संपत्तीचे दान करण्यामुळे मोठेपणा मिळतो साठा करण्यामुळे नव्हे. याला कवींनी दृष्टांत दिला आहे. पयोद [पाणी देणारे = ढग] ते दान करतात म्हणून त्यांची जागा वर असते. पयोधि [पाण्याचा साठा करणाऱ्या = समुद्राची] जागा खाली असते.
स जयति सिंदुरवदनो देवो यत्पादपङकजस्मरणम् |
वासरमणिरिव तमसाम् राशीन्नाशयति विघ्नानाम् ||
अर्थ :ज्याच्या मुखाला शेंदूर लावलेला आहे असा; ज्याच्या चरणकमलांचे स्मरण केले असता ; सूर्य ज्याप्रमाणे अंधाराच्या लोटांचा नाश करतो त्याप्रमाणे ; संकटांचा नाश होतो ; अशा देवाचा [गणेशाचा] जयजयकार असो.