कवी कालिदास यांची कुशाग्र बुद्धी

भोजराजाच्या राजसभेत कालिदास नामक एक मोठा विद्वान कवी होता. स्वत: भोजराजाही अनेक गोष्टींमध्ये कालिदासाच्या विचाराने वागत असे. कालिदास इतर विद्वानांचा आदर करत असे. तो विद्वानाला त्याच्या योग्यतेप्रमाणे साहाय्यही करत असे. एके दिवशी एक गरीब ब्राह्मण कालिदासाकडे आला. तो कालिदासाप्रमाणे कवी नसला, तरी धर्म-कर्म जाणणारा होता. साधा भोळा; पण सन्मार्गाने चालणारा होता. भोजराजाकडून आपल्याला काही द्रव्य मिळेल, या आशेने तो धारा नगरीत आला होता. कालिदासाने त्याची सर्व परिस्थिती जाणून घेतली. नंतर कालिदासाने त्याला विचारले, ''राजसभेत रिकाम्या हाताने जाऊ नये. तू राजाला देण्यासाठी काय आणले आहेस ?'' या प्रश्नावर तो गरीब ब्राह्मण म्हणाला, ''कविराज, शेजारच्या शेतकऱ्याकडून भिक्षा मागून उसाच्या कांडक्या आणल्या आहेत.'' त्यावर कालिदास त्याला म्हणाला, “ठीक आहे. त्या घेऊन उद्या राजसभेत ये.''

ब्राह्मण तेथीलच एका धर्मशाळेत थांबला होता. तेथे गेल्यावर संध्या इत्यादी आटोपून फराळाचे खाऊन तो झोपी गेला. झोपतांना उशीच्या जवळच उसाच्या कांडक्यांचे गाठोडे ठेवून तो झोपी गेला. त्या वेळी तेथे जवळच काही टवाळखोर लोक होते. त्यांनी त्या उसाच्या कांडक्या काढून खाल्ल्या आणि त्याच्या वाटची अर्धवट जळलेली लाकडे गाठोड्यात बांधून ठेवली.

ब्राह्मण सकाळी उठला. आंघोळ करून गाठोड्यात उसाच्या कांडक्या असल्याच्या समजुतीने राजसभेत जाण्यासाठी निघाला. राजसभा भरलेली होती. भोजराजा सिंहासनावर बसला होता. कालिदास एका उच्च आसनावर बसला होता. इतरही मान्यवर उपस्थित होते. ब्राह्मण दबकत दबकत पुढे आला आणि त्याने राजाला साष्टांग नमस्कार केला. तो म्हणाला, ''महाराज, राजा, देवता आणि गुरु यांच्या भेटीला रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणतात; म्हणून मी ही अल्पशी भेट आपल्यासाठी आणली आहे. त्याचा आपण स्वीकार करावा'', असे म्हणून त्याने आपल्या जवळच्या गाठोड्याची गाठ सोडली. बघतो तर त्यामध्ये उसाऐवजी अर्धवट जळलेली लाकडे होती. ब्राह्मण घाबरून गेला. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. हा राजाचा अपमानच होता.राज सभेतील सर्व लोकांनी 'ब्राह्मणाला शिक्षा करा', असा एकच हलकल्लोळ केला.

एवढा वेळपर्यंत कालिदास गप्प होता. तो म्हणाला, ''राजसभेतील लोकहो, शांत व्हा. तुम्ही समजता तसा हा ब्राह्मण अपराधी नाही. धर्म-कर्म करणारा आहे; पण दारिद्र्यात गांजलेला आहे. बिचाऱ्याला आपली दुर्दशा तोंडाने सांगता येत नाही. त्याने आणलेल्या या जळक्या कांड्या म्हणजे त्याच्या गरिबीचे प्रतीक आहे. या कांड्या अर्ध्या जळल्या आहेत आणि अर्ध्या तशाच आहेत, याचा अर्थ हा ब्राह्मण दारिद्र्यात धड जळतही नाही आणि धड जगतही नाही. ही अवस्था फार वाईट! या जळक्या लाकडांनी ती व्यक्त झाली आहे. त्यामुळे महाराजांनी याला धन देऊन त्याची काळजी मिटवावी.''

कालिदासाचे हे बोलणे ऐकून सारी राजसभा स्तब्ध झाली. कोणालाच पुढे काही बोलता येईना. भोजराजालाही कालिदासाचे म्हणणे पटले. त्याने ओंजळभर मोहरा ब्राह्मणाच्या उपरण्याच्या पदरात घातल्या. गरीब ब्राह्मण सन्मानाने आणि भरल्या झोळीने परत गेला. त्याने कालिदासाचे आभार मानले.

मुलांनो, जो सचोटीने वागतो, त्याचा नेहमी जय होतो, हे या गोष्टीवरून लक्षात आलेच असेल.