अंबरनाथचे मंदिर

महाराष्ट्रातील हेमांडपंथी मंदिरांमध्ये उत्कृष्ठ नमुना असे ज्याचे वर्णन करावे, असे मंदिर आहे ते अंबरनाथचे शंकराचे ११ व्या शतकात शिलाहार राजघराण्याने बांधलेले हे मंदिर आज महाराष्ट्राच्या कलापूर्ण वारशाची साक्ष देत उभे आहे.

ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ हे गाव आहे. या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदीमंडप कालौघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून शाबूत आहे. या मंदिराच्या स्थापत्याने आधुनिक अभियंते देखील याचा अभ्यास करायला प्रवृत्त झाले आहेत.म्हणूनच मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचे बांधकाम करताना वास्तुविशारदांनी अंबरनाथच्या मंदिराचा अभ्यास केला आणि त्यानुसार त्यांनी सिद्धिविनायक मंदिराचे बांधकाम केले आहे.

सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे, गर्भगृह आणि सभामंडप. गर्भगृह हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. गाभार्‍याच्या दरवाजावर गणेशपट्टी आहे. या गणेशपट्टीच्या वरच्या भागात शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलयं उठावीत अशी एकामागोमाग एक अशी असंख्य वर्तुळ कोरली आहेत. मंडपाच्या खांबांवर अंत्यत कोरीव अशा मूर्ती आहे या भिंतीवर एकूण ७० अशा प्रतिमा कोरल्या आहेत. शंकर पार्वतीची विविध मुद्रांमधील ह्या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत.

या मूर्तींमध्ये एक अतिशय सुरेख अशी कामदेवाची मूर्ती आहे. ह्या मूर्तीला आठ हात आहेत. कामदेवाच्या मुर्तीचे एकूणच कमनीयता, अलंकार, सुस्पष्टपणे आणि नाजुकपणे कोरलेली आहेत. या मंदिरातल्या एका मुर्तीला त्रिमुखी मूर्ती म्हणतात.या मूर्तीला तीन तोंडे आहेत. हे बहुधा शंकर पार्वतीचेच शिल्प असावे. कारण मूर्तीच्या मांडीवर आणखी एक स्त्री प्रतिमा कोरली आहे.

गर्भगृह सभामंडपापेक्षा थोडे खाली आहे. या गाभार्‍यात आपण नेहमी बघतो तसे शिवलिंग नाहीच. शिवलिंगाऐवजी एक उंचवटा आहे. यालाच स्वयंभू शिवलिंग मानून त्याची पूजा केली आहे.

श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या वेळेस मंदिरात भक्तांची रीघ लागते. अंबरनाथ हे मंदिर त्यातल्या शिल्पाकृतींनी बघणार्‍याला मोहित करते. या मंदिराच्या स्तंभावर शिव पार्वती, विष्णू, महिषासूर मर्दिनी यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आणि प्रत्येक मूर्तींवर तेवढेच सुंदर, नक्षी केलेले तोरण आहे. हे मंदिर म्हणजे आपल्या पूर्वजांच्या कलापूर्ण दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच एकदा तरी बघावेच असे आहे.