प्रेमातील व्यापकता

संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, ‘‘तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ?’’ ते म्हणाले, ‘‘बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तूपण.. हा, तू घे… हा, तू घे.’’ असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते.तो प्रकार पाहून तुकाराम महाराजांची पत्नी आवळी भरपूर रागावली. आपल्याला मिळालेला सर्व ऊस लोकांच्या मुलांना देऊन आपल्या मुलांना काही आणले नाही; म्हणून ती तुकाराम महाराजांना नको नको, ते बोलली आणि रागाच्या झपाट्यात तिने तो उसाचा तुकडा त्यांच्या पाठीवर मारला. त्या वेळी त्याचे तीन तुकडे होऊन एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि दोन तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे तिला म्हणाले, ‘‘आवळे, किती ग धोरणी तू ? आता तू सारखे वाटे केलेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला, तो तुझा आणि खाली जे पडले त्यांतील एक माझा अन् दुसरा मुलांचा !’’ ही त्यांची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्चात्ताप झाला.

तात्पर्य :‘हे विश्वची माझे घर’, असे वाटत असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली आणि लोकांची मुले असा भेदभाव केला नाही.’

– डॉ. वसंत बाळाजी आठवले (खिस्ताब्द १९८०)