आवश्यकता…संस्कृत शिकण्याची !

केंब्रीज विद्यापीठात आपल्या शांत खोलीत बसून प्राध्यापक अभ्यासात गढून गेलेले आहेत. अचानक एक त्रस्त आणि प्रक्षुब्ध सैनिक येतो आणि सरळ सरळ त्यांच्यावर आरोप करतो की जर्मनीविरुध्द लढणारे त्याच्यासारखेच अनेक सैनिक युध्दामुळे निर्माण झालेल्या नैराश्यामुळे दुःखी आहेत आणि तुम्हाला त्याचं काहीच कसं सोयरसुतक नाही?

प्राध्यापक त्या तरुण सैनिकाला शांतपणे विचारतात,” कशासाठी लढतो आहेस तू? ”

झट्कन उत्तर मिळतं, “अर्थात देशाच्या संरक्षणासाठी! ”

सुज्ञ प्राध्यापक पुढे विचारतात, ” स्वतःचं रक्त सांडण्याइतकं महत्वाचं असं काय आहे त्यात? ”

” देशाची भूमी आणि त्यातील नागरिक.”

प्राध्यापक अजुन खोदून-खोदून विचारतात तेव्हा उत्तर मिळतं,

” हे नाही. मी माझ्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी लढतो ”

प्राध्यापक पूर्वीच्याच शांतपणाने सांगतात,

” याच संस्कृतीत माझंही योगदान आहेच! ”

सैनिक थंडावतो. प्राध्यापकापूढे आदराने नतमस्तक होतो आणि देशाच्या सांस्कृतिक ठेवीसाठी अधिक प्राणपणाने लढण्याची शपथ घेतो.

दूसरे महायुद्ध शेवटच्या टप्प्यावर आलेले असतांना इंग्रज सैनिक अंतिम यशासाठी आपले योगदान देत होते तेव्हाचा प्रसंग आहे हा! यावरून पाश्चात्यांनाही आपल्या स्वतःच्या संस्कृतीची किती चाड आहे हे कळते. आपल्या म्हणजे भारतीयांच्या मनीही अतिप्राचीन अशा या भारत देशाच्या सांस्कृतिक परंपरेबद्दल नितांत आदर आहे. आधीच सांगायचं तर आपल्या या सांस्कृतिक ठेवीचं जतन करण्यासाठी संस्कृत शिकणं निकडीचं आहे.

सुप्रीम कोर्टानेही मान्य केलं की संस्कृती जतन करण्यासाठी संस्कृत शिकणं निश्चितच आवश्यक आहे. आपली संस्कृती ज्या तत्वज्ञानावर आधारित आहे, ते समजण्यासाठी, उमजण्यासाठी संस्कृत शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. संस्कृत कमीशन रिपोर्टचा दाखला देऊन कोर्टाने उर्द्धृत केले की या देशातील नागरिकांमध्ये कितीही भिन्नता असली तरी एका बाबतीत मात्र कमालीचं साधर्म्य आहे. ते म्हणजे आपल्या सांस्कृतिक परंपरेबद्दल वाटणारा अभिमान आणि हीच तर संस्कृतची परंपरा आहे!

Leave a Comment