पंचतंत्र

पंचतंत्र – मूर्खालाही व्यवहारकुशल बनवणारी संस्कृत भाषेची देणगी !

‘पंचतंत्र’ या शब्दाची उत्पत्ती संस्कृत भाषेपासून झाली आहे. ‘पंच म्हणजे पाच’ आणि ‘तंत्र म्हणजे तत्त्व’. ‘पंचतंत्र म्हणजे पाच तत्त्वे’. ही पाच तत्त्वे राजाला तसेच सामान्य व्यक्तीलासुध्दा दैनंदिन जीवनासाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या ग्रंथात राजाने राज्य कसे करावे, मित्र कसे व कोणते करावे, कोणते करु नयेत, योग्य मंत्री कसे निवडावेत आणि दैनंदिन जीवनात कसे वागावे यांचे मार्गदर्शन गोष्टीरूपात केले आहे.

पंचतंत्राची निर्मिती

पूर्वीच्या काळी, भारताच्या दक्षिणेकडील ‘महिलारोप्य’ या प्रदेशात ‘अमरशक्ती’ नावाचा एक प्रजाहितदक्ष आणि कर्तव्यदक्ष असा राजा होता. या राजाला तीन मुले होती, बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती. ही तीनही मुले मूर्ख, आळशी नि अक्कलशून्य होती. त्यामुळे राजाला सतत त्या मुलांची काळजी असे. राजा आता वृध्द झालेला होता. आपल्यानंतर आपला राज्यकारभार कोण सांभाळणार या विचाराने राजा चिंतातुर झाला होता. आपली मूर्ख मुले पाहून त्याला वारंवार एक वचन आठवे –

अजातमृतमूर्खेभ्यो मृतजातौ सुतौ वरम् ।
यतस्तौ स्वल्पदुःखाय यावज्जीवं जडो दहेत् ॥

अर्थात्, अजात (न जन्मलेले), मृत आणि मूर्ख अशा पुत्रांत मेलेले आणि न जन्मलेले पुत्र अधिक बरे; कारण त्यांच्या पायी होणारे दुःख स्वल्प असते. मूर्ख पुत्र मात्र यावज्जीव (मनाला) जाळत रहातो.

त्या राजाच्या आश्रयाला ५०० पंडित होते. एक दिवस त्या पंडितांना राजाने सांगितले, की माझे पुत्र शहाणे होतील असे काहीतरी करा.’ त्यावर ते पंडित राजाला म्हणाले ’विष्णुशर्मा नावाचा एक पंडित ब्राह्मण आहे. तुम्ही आपल्या मुलांना त्याच्या स्वाधीन करा. तो त्यांना शहाणे करील.’ राजाने विष्णुशर्मा यांना बोलावून आणले आणि आपली इच्छा सांगितली. त्यासाठी राज्य देऊ केले. परंतु विष्णुशर्माने मात्र त्यांचे ज्ञान विकण्यास नकार दिला. व मुलांना ६ मासांत व्यवहारकुशल आणि त्याचबरोबर देवांचा राजा इंद्राला जिंकण्याची क्षमता येईल इतके सामर्थ्यवान बनविण्याचे वचन राजाला दिले. ते ऐकल्यावर राजाने राजपुत्रांना पंडित विष्णुशर्मा यांच्यासोबत पाठविले. विष्णुशर्मांनी त्या मुलांना विविध गोष्टींच्या माध्यमातून व्यवहारज्ञान शिकवले.

सहा मासांनंतर जेव्हा राजाने आपल्या मुलांना पाहिले तेव्हा त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. राजाची तीनही मुले सहा मासांत व्यवहारकुशल बनली होती. राजाला ते पाहून अत्यानंद झाला. विष्णुशर्माने राजपुत्रांना केवळ ज्ञान देण्यापेक्षा ते ज्ञान कसे वापरावे, केव्हा व कोठे वापरावे, ज्ञानाचा उपयोग कसा करावा हे पशू-पक्ष्यांच्या गोष्टीतून सांगितले. पंडित विष्णुशर्मांनी राजपुत्रांना शिकविलेल्या कथा पाच विभागात विभागल्या जातात. याच गोष्टींना ‘पंचतंत्र’ असे म्हणतात. ती पाच तंत्रे पुढीलप्रमाणे –

१. मित्रभेद – कोणते मित्र करु नयेत.

२. मित्रप्राप्ती – कोणते मित्र करावेत.

३. काकोलुकीयम् – कावळा आणि घुबड यांच्या वैराची कथा आहे.

४. लब्धप्रणाशनम् – मिळालेल्याचा नाश कसा होतो.

५. अपरीक्षितकारकम् – संपूर्णपणे विचार न करता ज्या गोष्टी केल्या जातात, त्याचा काय परिणाम होतो.

मानवी जीवनातील उच्च मूल्यांची ओळख करुन देणारे उत्तम साधन

पंचतंत्र जवळ जवळ २००० वर्षांपूर्वी लिहिले गेले परंतू त्यातील मौलिक ज्ञानामुळे ते आजही लोकप्रिय व मार्गदर्शक आहे. मूलतः संस्कृतमध्ये लिहीले गेलेले हे पंचतंत्र सध्या जगातील अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. पंचतंत्रात एकूण ८७ गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टींत एक मौल्यवान असे नीतीमूल्य दडलेले आहे. मानवी जीवनातील उच्च मूल्यांची ओळख करुन देण्यासाठी ‘पंचतंत्र’ हे एक उत्तम साधन आहे. मनोविज्ञान, व्यावहारिकता आणि राजकारणांतील सिद्धांत यांचा परिचय या कथांद्वारे होतो. संस्कृत साहित्यांत पंचतंत्राला अग्रगण्य स्थान प्राप्त झालेले आहे.

पंचतंत्राच्या गोष्टी (ध्वनिचित्रफिती) येथे पहा.