नवजात बालक

१. भारतात प्रसूतीनंतर पहिले काही आठवडे
बाळंतिणीच्या खोलीत इतरांना प्रवेश न देण्याच्या प्रथेची कारणे

गर्भाशयात अर्भक निर्जंतुक अशा वातावरणात असते. जन्मल्यानंतर ते अनेक जंतू असलेल्या वातावरणात येते. नवजात बालकाची रोगप्रतिकारक शक्तीफारच अल्प असते; म्हणून आपण नवजात बालकाला जंतूंच्या संपर्कात न आणता वेगळ्या खोलीत ठेवणे हितावह असते.

प्रसूतीनंतर आई फारच थकलेली असते; तसेच तिची रोगप्रतिकारक शक्ती अल्प झालेली असते. प्रसूतीनंतर वार पडल्यावर गर्भाशयाला घाव झाल्यामुळे तेथे जंतू झटकन वाढू शकतात. आईला सर्दी, खोकला झालेल्या लोकांच्या सान्निध्यामुळे सर्दी, खोकला झाला, तरी त्याचे जंतू मुलापर्यंत सहज पोहोचू शकतात; म्हणून आई आणि मूल यांचे जंतूसंसर्गापासून संरक्षण केले पाहिजे. समाजातील लोकांच्या भावना न दुखवता आई आणि नवजात बालक यांचे रोगजंतूंपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या वाडवडिलांनी थोडे दिवस बाळंतिणीला न शिवण्याची प्रथा पाडली आहे.

२. प्रसूतीनंतर नवजात बालक आणि आई यांना
अल्प उजेड असणार्‍या अंधार्‍या खोलीत ठेवण्याचे कारण

मूल गर्भाशयात असतांना अंधार्‍या वातावरणात असते. तेथे प्रकाशकिरण पोहोचू शकत नाहीत. बाहेरील ध्वनी, स्पर्श यांसारख्या ज्ञानेंद्रिये उत्तेजित करणार्‍या गोष्टीही तेथे नसतात किंवा त्यांचे प्रभाव अत्यंत अल्प असतात. जन्मल्यानंतर मूल प्रकाश, ध्वनी, तसेच ज्ञानेंद्रिय उत्तेजित करणारा वारा, वास इत्यादी गोष्टींच्या सान्निध्यात येते. आपणसुद्धा अंधार्‍या खोलीतून किंवा चित्रपटगृहातून एकदम बाहेर प्रखर प्रकाशात आल्यास, आपले डोळे दिपून जातात आणि आपल्या डोळ्यांना त्रास होतो, तर मग ज्यांच्या डोळ्यांना उजेडाची कधीच सवय नसते, अशा नवजात बालकाला प्रकाश, वारा आणि इतर ज्ञानेंद्रियांना सतत उत्तेजित करणारे वातावरण यांत ठेवणे अन्यायकारक अन् अहितकारक होणार नाही का? मुलांना जर ज्ञानेंद्रिये उत्तेजित करणारा उजेड, वारा इत्यादी गोष्टींची सवय केली, तर त्यांना त्याविषयी तिरस्कार न वाटता आनंदच होतो. तसेच मुलाचे थंडी, वारा आणि अतीउष्णता यांपासून संरक्षण होते. प्रत्येक मूल १८ ते २० घंटे झोपते आणि आपल्या सारखीच त्यांनाही झोपतांना काळोखी खोली हवीशी वाटते. तसेच थकल्या भागल्या आईलाही अल्प उजेडाच्या खोलीत आराम करता येतो. खोली टापटीप आणि स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे. ‘अंधारी खोली, म्हणजे अस्वच्छ खोली’, असा चुकीचा अर्थ करू नये.

३. नवजात अर्भकाला सोने चाटावयास देण्याची प्रथा

सोने हे आयुर्वेदाच्या शिकवणीप्रमाणे मज्जासंस्थेसाठी उपयुक्त शक्तीवर्धक असल्यामुळे त्याने बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते. त्वचेची कांती सुधारते. इतर अवयवांवरही त्याचा चांगला परिणाम होतो. पुढील स्वरूपात मुलाला सोने देतात.

अ. सहाणेवर मध आणि तूप यांत सोने उगाळून त्याचे चाटण मुलाला देतात.

आ. ब्राह्मी, वेखंड आणि शंखपुष्पी या औषधांसह शुद्ध सोने उगाळून देतात.

लहानपणी मुलाच्या मेंदूची वाढ आणि विकास जलद होत असतो; म्हणूनच पारंपारिक शक्तीवर्धके अन् मेंदूची वाढ करणारी शक्तीवर्धके ६ मास ते १ वर्ष या कालावधीत दिली गेली पाहिजेत.

४. नवजात बालकाला आणि त्याच्या आईला आंघोळीनंतर धुरी देण्याची प्रथा ?

हिवाळ्यामध्ये नवजात बालक आणि आई यांच्या खोलीत विस्तव असलेली शेगडी ठेवून खोली उष्ण राखण्याची प्रथा आहे. शेगडीमध्ये तूप, सर्जरस, हळद, मोहरी, हिंग, वावडिंग आणि वेखंड टाकून निर्माण केलेली धुरी आंघोळीनंतर नवजात बालकाला दिली जाते. त्यामुळे थंडीपासून त्याचे संरक्षण होते आणि शरीर पूर्णपणे वाळण्यास साहाय्य होते. तसेच छातीमध्ये कफ साठत नाही. या औषधी धुरीमुळे डास किंवा कीटक यांचा त्रास होत नाही. तसेच रोगजंतूंचाही नाश होतो. उन्हाळ्यात आई आणि बाळ यांना धुरी सहन होत नसल्यास धुरी देऊ नये. खोली उबदार आणि निर्जंतुक असेल, तर धुरी देण्याची आवश्यकता नाही. सध्या आधुनिक पद्धतीने म्हणजेच इलेक्ट्रिक हीटर्स इत्यादींनी खोली उबदार ठेवण्याची सोय असल्याने धुरी देण्याची आवश्यकता नाही.

‘संस्कार हीच साधना’, लेखक : डॉ. वसंत बा. आठवले, एम्. डी., डी. सी. एच्., एफ्. ए. एम्. एस्.,
वैद्याचार्य आणि डॉ. कमलेश व. आठवले एम्. डी., डी. एन्. बी., एफ्. ए. एम्. एन्. एस्.

Leave a Comment