मुलांवर लहान वयातच संस्कार कसे करावेत ?

संस्काराचा मूळ पाया म्हणजे शिस्त. प्रत्येक कृतीला जर शिस्त, नियम घालून घेतले नाहीत, तर ती कृती अपूर्ण होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले, तर अध्यात्मातील प्रगती जलद होते. त्यासाठी लहानपणीच शिस्तीचे संस्कार बालमनावर रुजवायला हवेत.

१. मुलांना स्ववलंबी बनवणे

लहानपणीच मुलांना योग्य वळण लावावे. झोपून उठल्यावर स्वतःच्या पांघरुणाची घडी घालायला शिकवावे. सुरुवातीला नीट येणार नाही; पण हळूहळू मूल जसे मोठे होईल, तसा व्यवस्थितपणा त्याच्या अंगी आल्याशिवाय रहाणार नाही. सकाळचे आन्हीक उरकल्यावर शाळेचा अभ्यास, शाळेची तयारी त्यांची त्यांनाच करायला शिकवावी. अभ्यासाची पुस्तके, वह्या निटनेटक्या व जागच्याजागी ठेवायचे वळण लावावे. शाळेतून अथवा बाहेरून आल्यावर चप्पल-बूट, दप्तर वगैरे ठराविक जागीच ठेवायला शिकवावे. तसेच हातपाय स्वच्छ धुतल्यावर कपडे बदलून त्यांच्या नीट घड्या घालून ठेवण्यास शिकवावे. कपड्याचे बटण अथवा हुक तुटले असल्यास किंवा कपडे थोडेसे उसवले असल्यास त्यांचे त्यांनाच शिवायला शिकवावे. स्वतःचे स्वतः करण्यात मुलांनाही आनंद वाटतो. वयानुसार स्वतःचे कपडे धुवायलापण शिकवावे.

सकाळ-दुपारचा नाश्ता झाल्यावर कपबशी व ताटली घासायला शिकवावी. थोडक्यात म्हणजे मुलांना स्वावलंबी करावे. त्यात मुलगा-मुलगी असा फरक नको. प्रत्येक गोष्टीचे नीट वळण लावले, तर मूल घरी असो वा इतर ठिकाणी, ते नेटकेपणानेच वागेल.

२. वेळोवेळी प्रार्थना व कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणे

सकाळी झोपून उठल्याबरोबर मुलांना अंथरुणातच प्रार्थना करायला व आजचा दिवस ईश्वराने दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवावे. तोंड धुतल्यावर देवाला नमस्कार करायला सांगावे. कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी त्यांच्याकडून प्रार्थना म्हणवून घ्यावी. तसेच प्रत्येक गोष्ट ईश्वरकृपेनेच झाली, हे त्यांच्या मनावर बिंबवावे.

३. लवकर निजणे व लवकर उठणे

लहानपणापासूनच मुलांना लवकर उठण्याची सवय लावावी. पुष्कळ घरांतून बघायला मिळते की, मुले अभ्यासासाठी रात्री जागतात व सकाळी ८-९ वाजता उठतात. याउलट रात्री लवकर झोपून पहाटे अभ्यास केला असता तो जास्त चांगला लक्षात रहातो. ‘लवकर निजे व लवकर उठे, त्यास आरोग्य व धन-संपत्ती मिळे ।’, असा श्लोक आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत असत. रात्री रज-तमाचे प्राबल्य असते. याउलट पहाटे सात्त्विकता असल्यामुळे त्याचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो.

४. प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्यास शिकवणे

मोठ्यांच्या कृतींतूनच लहान मुले शिकतात; म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे, बोलणे, इतरांना मान देणे, हे सर्व केले पाहिजे. तसेच प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी. ‘मग करू’ म्हटले की, पुन्हा ती गोष्ट केली जात नाही. त्यासाठी शरीराला म्हणण्यापेक्षा मनालाच शिस्त लावायला पाहिजे. पुष्कळांच्या घरी कपाटात, रॅकमध्ये कपडे कोंबलेले किंवा अस्ताव्यस्त लटकलेले असतात. तसेच घरही अव्यवस्थित असते. मग घरात कोणी अचानक आले, तर धांदल उडते. एकदा हाताला वळण लावले की, मनाला ते नीट केल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही. घर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यामध्ये आळस नको. आळस हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवावे.

५. मुलांचे अती लाड करणे टाळणे

आजकाल घरांतून एखाद-दुसरेच मूल असल्याने त्यांची आवड-नावड जपली जाते. जेवण, कपडे सर्वच बाबतींत ‘मुले म्हणतील ती पूर्व दिशा’, असे आढळून येते. लहानपणापासून त्यांचे ऐकत गेले की, मुले पुढे ऐकेनाशी होतात. त्यामुळे त्यांचे अती लाड करू नयेत.

६. मुलांपुढे स्वत:चा आदर्श ठेवा !

घराचे ‘सत्यं शिवं सुंदरम्’ करायचे असेल, तर शिस्त, आज्ञापालन, मोठ्यांचा आदर करणे, हे सर्व करता आले पाहिजे. मोठ्यांनी आपला आदर्शच असा निर्माण केला पाहिजे की, आपले वळण, शिस्त बघून आपले मूलही आपले अनुकरण करील. असे झाले, तर आदर्श कुटुंब व्हायला वेळ लागणार नाही.

Leave a Comment