पालकांनो, मुलांवर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे संस्कार करून आदर्श भावी पिढी निर्माण करा !

‘हिंदु राष्ट्रासाठी आदर्श भावी पिढी निर्माण करण्यात पालकांचे दायित्व मोलाचे आहे. आदर्श भावी पिढी निर्माण करणे आणि तिला सुसंस्कारित करणे, हे पालकांचे दायित्व आहे. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच हिंदवी स्वराज्य आणि हिंदु धर्म यांचे संस्कार केले. त्यामुळे श्री भवानीदेवीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे पालकांनी त्यांच्या मुलांमध्ये लहान वयातच अध्यात्मासह धर्मशिक्षण, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे बीज पेरायला हवे.

१. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेची मर्यादा आणि राष्ट्र अन् धर्म
यांविषयीचे प्रेम निर्माण करणार्‍या शिक्षणव्यवस्थेचा अवलंब करण्याची अपरिहार्यता

सध्याच्या काळात या भ्रष्ट आणि बरबटलेल्या शिक्षणव्यवस्थेमधून बाहेर पडणारी मुले कधीतरी हिंदु राष्ट्र स्थापन करू शकतील का ? एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकांमधून मुलांवर स्वदेशापेक्षा विदेशांचा अगौरवशाली इतिहास गौरवाने गायिला जात आहे. मग ‘मुले अखंड हिंदु राष्ट्राचा गौरव कसा काय गातील ?’ याचा पालकांनीच विचार करायला हवा. हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी मुलांवर हिंदु राष्ट्र प्रेमाचा संस्कार असायला हवा. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेऐवजी राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे प्रेम निर्माण करणार्‍या शिक्षणव्यवस्थेचा अवलंब करणे, हा त्यावरील उपाय आहे.

२. काही वैज्ञानिकांनी गुरुकुल शिक्षणपद्धतीचे श्रेष्ठत्व
मान्य करूनही तिचा अवलंब करण्यास सिद्ध नसलेले सध्याचे पालक

पूर्वीच्या काळी लहान वयातच मुले ब्रह्मचर्याश्रम धारण करून त्यांच्या गुरूंकडे शिक्षणाला जायचे. त्यामुळे गुरूंसमवेत राहून अध्ययन केल्याने ते गुणसंपन्न होत असत. कालांतराने भारतामध्ये इंग्रजांची सत्ता आल्यावर या शिक्षणपद्धतीमध्ये पालट होऊन ‘गुरुकुल’ पद्धत कालबाह्य झाली. श्री. विजय भटकर यांसारखे वैज्ञानिकही सांगतात, भारतातील ‘गुरुकुल’ शिक्षणपद्धत ही सर्वांत श्रेष्ठ आहे. असे असले, तरी या शिक्षणपद्धतीचा अवलंब करण्यासाठी सध्याचे पालक सिद्ध नसतात.

३. पालकांनो, मुलांना उच्चशिक्षित करणे, म्हणजे सुसंस्कारित करणे नव्हे !

काही पालकांचा अपसमज असतो की, मी माझ्या मुलांना उच्चशिक्षित केले, म्हणजे मी माझ्या आयुष्यातील सर्व कर्तव्ये पार पाडली. मुले उच्चशिक्षित झाली आणि सुसंस्कारित झाली नाहीत, तर त्या उच्च शिक्षणाचा काय उपयोग ? हे शिक्षण घेऊन पदवीधर मुलांनाही आज स्वतःच्या उपजीविकेसाठी दारोदार भटकावे लागत आहे, तर असे शिक्षण हवे कशाला ? पण हे पालकांना कोण सांगणार ? मुलांनी शिक्षण घेऊन इतर सर्व करावे; परंतु ‘साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करावे’, असे पालकांना वाटत नाही.

४. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी मुलांना घडवणार्‍या वीरमातांचा आदर्श घ्या !

जर जिजामातेने विचार केला असता, ‘मोगलांचे राज्य आहे, तर मी माझ्या शिवाजीला आगीच्या फुफाट्यात कशाला घालावे ?’ तर हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली असती का ? जर चंद्रगुप्ताच्या आईने त्याला तक्षशिलेला शिक्षण घेण्यासाठी पाठवले नसते, तर दुष्ट नंदाची राजवट कशी संपुष्टात आली असती ?

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०१४)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात