स्वमाता, भूमाता (राष्ट्र) आणि गोमाता यांना संकटमुक्त करण्याची प्रतिज्ञा करूया !

स्वमाता, भूमाता (राष्ट्र) आणि गोमाता यांना संकटमुक्त करण्याची प्रतिज्ञा करून ती कृतीत आणण्यासाठी प्रयत्नरत रहा !

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’, ‘जिचे हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी’, अशा काही सुवचनांतून आईची म्हणजेच मातृदेवतेची महती गायिलेली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ‘मातृदेवो भव । पितृदेवो भव । आचार्यदेवो भव ।’ म्हणजे आई, वडील आणि गुरु यांना देवासमान मानावे, असे म्हटलेले आहे. येथेही मातृदेवतेचा, म्हणजेच आईचा पहिला मान आहे. आईची महती सांगतांना एका काव्यपंक्तीत असेही म्हटले आहे, प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई, बोलावू तुज मी आता कोणत्या उपायी ।

१. आईचे माहात्म्य

अ. आध्यात्मिक संस्कारांनी बाळाला सुसंस्कारित आणि चारित्र्यसंपन्न बनवून ईश्वरापर्यंत पोहोचवणारी आई !

काही संतांनी विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड, मालवण येथील संत प.पू. परूळेकर महाराज यांनी आईविषयी असे म्हटले आहे की, ‘आ’ म्हणजे आकार आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. जी जीवनाला आकार देऊन ईश्वरापर्यंत नेते, ती आई. यामध्ये सुसंस्कृत याचा अर्थ आहे. अनेक आध्यात्मिक संस्कार करून बाळाला सुसंस्कारित करून, त्याचे व्यक्तीमत्त्व चारित्र्यसंपन्न घडवून आणि त्याच्याकडून साधना करवून घेऊन त्याला गुरूंपर्यंत, म्हणजेच ईश्वपरापर्यंत पोहोचवण्याचे काम जी माता करते, तीच खऱ्या अर्थाने ‘आई’ या संज्ञेला पात्र असते.

आईची महती सांगतांना आद्य शंकराचार्यांनीही म्हटले आहे,

‘कुपुत्रो जायेत क्वचित् अपि कुमाता न भवति ।’
– देव्यपराधक्षमापनस्तोत्र, श्लोक २

अर्थ : एक वेळ कुपुत्र जन्माला येईल; पण कुमाता (वाईट आई) कधीही होऊ शकणार नाही.

आ. मूल लहानपणापासून आईच्या सहवासात जास्त वेळ असल्याने
त्याला घडवण्याचे दायित्व माता-पिता यांच्यामध्ये आईवरच अधिक असणे

छत्रपती शिवरायांना घडवण्यात जिजामातेचा सिंहाचा कसा वाटा होता ? हे तर सर्वश्रुत आहे. माणगाव, जिल्हा सिंधुदुर्ग येथील दत्तावतारी संत प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज हेही परम मातृभक्त होते. मुलाला घडवण्यासाठी त्याच्या व्यक्तीमत्त्व विकासाचे दायित्व स्वाभाविकपणे माता-पिता यांच्यामध्ये मातेवर, म्हणजे आईवरच अधिक असते; कारण मुलाला समजायला लागेपर्यंत ते आईच्या सहवासातच अधिक असते.

इ. आईच्या प्रीतीची तुलना केवळ परमेश्वर आणि गुरु यांच्या प्रीतीशीच होऊ शकणे

माता, आई, माऊली हे समानार्थी शब्द आहेत. आपण गुरुमाऊली, ज्ञानेश्वरमाऊली, विठूमाऊली असे शब्द वाचतो आणि ऐकतो. त्या माऊलीचे प्रेम ईश्वरतुल्य, गुरुतुल्य असते किंवा ईश्वराचे, गुरूंचे प्रेम हे आईसारखे असते, असे माऊलीचे दोन्ही अर्थ निघू शकतात. आईच्या प्रीतीची, वात्सल्याची तुलना केवळ परमेश्वर आणि गुरु यांच्या प्रीतीशीच होऊ शकते.

२. मातृदिनापुरतेच नाही, तर कायमस्वरूपी मातृभक्त असणे आवश्यक !

मातृदिन साजरा करण्याच्या निमित्ताने एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. सांप्रत काळात वेगवेगळे दिन (डे) साजरे करण्याची प्रथा चालू आहे. मातृदिन म्हणजे तेवढ्या एका दिवसापुरती आईची महती गायची, तिच्या ठायी कृतज्ञता व्यक्त करायची, असे न होता आपण कायमस्वरूपी मातृभक्त या भावस्थितीत असले पाहिजे.

३. समर्थ हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी धर्मनिष्ठ आणि
राष्ट्रनिष्ठ अशा सुमाता अन् सुपुत्र यांची आवश्यकता असणे

अ. राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती अत्यंत केविलवाणी, भयावह अन् लाजिरवाणी होण्याचे
प्रमुख कारण म्हणजे आई या संज्ञेला पात्र असलेल्या स्त्रियांचा अभाव !

दुर्दैवाने सांप्रतकाळी ‘आई’ या संज्ञेला पात्र असणाऱ्या महिला नगण्यच आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारखे सुपुत्रही नगण्य आहेत. सध्या राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती अत्यंत केविलवाणी, भयावह अन् लाजिरवाणी झाली आहे. याची काही प्रमुख कारणे आहेत. त्यामध्ये ‘आई’ या संज्ञेला पात्र असलेल्या स्त्रियांचा अभाव हेही एक कारण आहे. ज्या त्याला पात्र आहेत, त्यांना त्यांचे सुपुत्र (कुपुत्र) वृद्धाश्रमात ठेवतात, अशी एकूण स्थिती आहे.

आ. विनाशाच्या उंबरठ्यावर असणार्या राष्ट्र आणि धर्म यांना संकटमुक्त करणे, हे प्रत्येक सुपुत्राचे कर्तव्य आहे !

आज स्वमाता, भूमाता (राष्ट्र) आणि गोमाता संकटात आहेत. त्यामुळे त्यांना संकटमुक्त करणे, हे प्रत्येक सुपुत्राचे कर्तव्य आहे. आजच्या मातृदिनाच्या निमित्ताने प्रत्येक सुपुत्राने तशी प्रतिज्ञा करून ती कृतीत आणणे आवश्यक आहे. मातृदिनाच्या निमित्ताने सारांशाने एवढेच म्हणता येईल की, आज विनाशाच्या उंबरठ्यावर असणा-याराष्ट्र आणि धर्म यांना सावरण्यासाठी, म्हणजे समर्थ हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी धर्मनिष्ठ अन् राष्ट्रनिष्ठ अशा अनेक सुमाता अन् अनेक सुपुत्र यांची आवश्यकता आहे.

४. प्रत्येक स्त्रीने धर्मकार्यात सहभागी होणे, ही काळाची आवश्यकता असणे

भगवान श्रीकृष्णाच्या संकल्पाने हे समर्थ हिंदु राष्ट्र होणार आहेच; पण समस्त हिंदु महिलांनी आपल्या स्तरावर आपली साधना म्हणून माता, भगिनी आणि कन्या म्हणून या धर्मकार्यात सहभागी होणे, ही काळाची आवश्यकता आहे.

॥ जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ॥

– श्री. दत्तात्रय रघुनाथ पटवर्धन, कुडाळ, सिंधुदुर्ग. (६.५.२०१४)