इतरांच्या कल्याणात आनंद मानणारे बाल रामानुज

इतरांच्या कल्याणात आनंद मानणारे बाल रामानुज

एकदा गुरूंनी दिलेला गुप्त मंत्र रामानुजांनी सर्व लोकांना सांगून टाकला. गुरु संतापून म्हणाले, ‘तू नरकात जाशील !’ रामानुजांनी गुरूंना नम्रतेने विचारले, ‘महाराज, मी ज्या लोकांना मंत्र सांगितला, त्यांचे काय होणार ?’ गुरूंनी उत्तर दिले, ‘मंत्र हा स्वयंप्रकाशित असल्याने मंत्रजप करणार्यांचे कल्याणच होईल’. तेव्हा रामानुजांनी उत्तर दिले, ‘इतक्या सर्व लोकांचे कल्याण होत असेल, तर मी नरकात गेलो तरी चालेल’.

गुरुनिष्ठा

वल्लभाचार्यांनी त्यांच्या एका शिष्याला श्रीनाथजींना वारा घालण्याची सेवा दिली होती. एके दिवशी त्यांनी त्याला सांगितले, ‘तू श्रीनाथजींना डोळे बांधून वारा घाल’. श्रीनाथजी प्रसन्न झाले. त्यांनी त्याला डोळे उघडण्यास सांगितले. शिष्य म्हणाला, ‘गुरूंची आज्ञा झाल्याशिवाय डोळे उघडणार नाही’. तुमच्या दर्शनाने मला सुख मिळेल; पण गुरूंची आज्ञा पाळण्याने मला आणि गुरूंना सुख मिळेल.

खरा भक्त देवाकडे काही मागत नसणे

एकदा एक जहाज बुडू लागले. जहाजावरील सर्व माणसे प्रार्थना करू लागली; परंतु एक संत मात्र प्रार्थना करत नव्हते. लोक त्यांच्यावर रागावले. संत म्हणाले, ‘जर सगळ्यांना मारून टाकावे, असे देवाला वाटत असेल, तरी आनंद आहे आणि त्याला सगळ्यांना जिवंत ठेवावे, असे वाटत असेल, तरी आनंद आहे. त्याच्या निर्णयात ढवळाढवळ करणारा मी कोण ? मला त्याचा निर्णय १०० प्रतिशत मान्य आहे’.

गुरूंनी शिष्याला भगवंताची अनुभूती तात्काळ देणे

एक शिष्य गुरूंना म्हणाला, मला भगवंताचे दर्शन हवे. गुरूंनी शिष्याची कॉलर पकडली आणि ते म्हणाले, सूर्याच्या किरणांतील चमक, पक्ष्यांची गाणी, आईचे वात्सल्य यांत तुला भगवंताचे दर्शन होत नाही का ? तुला आणखी नवीन आकृती कशाला पाहिजे ? थोडा वेळ शांत बस.

थोड्या वेळाने गुरूंनी शिष्याला उठवले. तेव्हा त्यांच्यात पुढील संवाद झाला.

गुरु : काय दिसते ?

शिष्य : केवळ तुम्ही दिसता.

गुरु : भगवान दिसत नाही ?

शिष्य : तुम्ही आणि भगवान एकच आहात.

गुरु : तत् त्वमसि । तू पण भगवान आहेस.

– पू. (डॉ). वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका)

Leave a Comment