पैसे कसे खर्च करावेत ?

पैसे कसे खर्च करावेत ?

एकदा एका राजाने प्रधानाला त्याच्या राज्यातील सर्वात शहाणा माणूस शोधून काढावयास सांगितले. एक महिन्यानंतर प्रधानाने शहाण्या माणसास राजासमोर दरबारात आणले. राजाने विचारले, ’तू, मिळवलेले पैसे कसे खर्च करतोस ?’ तो म्हणाला, ’मी २५ टक्के पैशांनी कर्ज फेडतो. २५ टक्के पैशांचे कर्ज देतो. २५ टक्के पैसे जाळून टाकतो आणि उरलेले २५ टक्के पैसे फेकून देतो’. राजा मनात म्हणाला, ’हा माणूस तर महामूर्खच दिसतो आहे’. प्रधानाने त्या माणसास त्याच्या विधानांचा अर्थ सांगण्याची विनंती केली. तेव्हा तो शहाणा माणूस म्हणाला,’ मी २५ टक्के पैशांनी कर्ज फेडतो, म्हणजे आई-वडिलांसाठी खर्च करतो. २५ टक्के कर्ज देतो, म्हणजे माझ्या मुलांवर मी खर्च करतो. २५ टक्के पैसे जाळतो, म्हणजे संसारासाठी, पोटासाठी खर्च करतो आणि उरलेले २५ टक्के पैसे फेकून देतो, याचा अर्थ ते समाजासाठी खर्च करतो’.

अहंमुळे संतांचा लाभ घेता न येणे

मीरेचे गुरु रोहिदास चांभार हे होते. ते काशीत रहात होते. काशीच्या राजाला शांती हवी होती. त्याच्या मंत्र्याने सल्ला दिला, ’रोहिदासांकडे जा. आपल्याला शांती मिळेल’. राजा व्यापा-याचा म्हणजे शेटजींचा लांब डगला (कोट) घालून संत रोहिदासांकडे गेला आणि म्हणाला, ’रोहिदासजी, मला शांती द्या’. राजाचा अहंकार गेलेला नाही. त्यामुळे राजा म्हणून यायला त्याला लाज वाटते, हे संत रोहिदासांच्या लक्षात आले. नंतर राजा पुन्हा दसर्याच्या दिवशी (लोक जेव्हा रावण जाळतात तेव्हा) आला. रोहिदासांनी चामड्याचे लाल पाणी राजाला दिले आणि सांगितले, ’हे पी म्हणजे तुला शांती मिळेल’. राजाने तोंड वळवले आणि ते पाणी डगल्यात ओतले. राजाचा डगला लाल झाला. राजाने तो धुण्यासाठी धोब्याकडे दिला. धोब्याने त्याची मुलगी सृजलु हिला तो डगला धुण्यासाठी दिला. डाग काढता काढता सृजलु संत बनली. पुढे एकदा राजा सृजलुकडे आला आणि तिला म्हणाला, ’मला शांती हवी आहे’. ती म्हणाली, ’तुझा डगला धुवून मला शांती मिळाली आणि तू माझ्याकडे शांती मागायला आलास ?’ तेव्हा राजाचे डोळे उघडले.

कवीचा आणि राजाचा अहंकार

एकदा भोजराजाने एका कवीच्या कवितेवर प्रसन्न होऊन त्या कवीला १ लक्ष मोहरा बक्षीस देणार असल्याची घोषणा केली. कवी राजसभेतून उठून मोहरा घेण्यासाठी राजाकडे येईना. त्या वेळी तो कवी आणि राजा यांच्यात पुढील संभाषण झाले.

कवी :मान माझा आहे. मोहरा माझ्याकडे यावयास पाहिजेत.

राजा :तू हिंदुस्थानभर भटकलास, तरी तुला एका कवितेला एक लक्ष मोहरा देणारा राजा मिळणार नाही.

कवी :भोजराजा, तुला अनेक कवी मिळतील; पण एक लक्ष मोहरा नाकारणारा कवी परत मिळणार नाही !

संभाजी महाराज आणि औरंगजेब

संभाजी औरंगजेबाकडे डोळे रोखून उभा राहिला.

औरंगजेब : तुझे डोळे काढीन.

संभाजी : ठीक आहे. जिभेने अपमान करीन.

औरंगजेब : तुझी जीभ कापीन.

संभाजी : अंगाअंगाने बोलत राहीन.

औरंगजेब : तुझे मुंडके उडवीन.

संभाजी : माझी आकृती जाईल; पण कृती अमर होईल !

– पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका).

Leave a Comment