वेशभूषेचा विचारांवर होणारा परिणाम

वैधव्याचे नाही, तर मीराबाई होता येत नाही, म्हणून दुःख करणारी राजकन्या !

एकदा ब्रिटनची राणी भारतात आली असतांना राजस्थानातील एक छोटा राजा तिला भेटायला गेला. राजासमवेत त्याची विधवा मुलगी होती. राणीने विचारले, ‘ ही मुलगी उदास का दिसते ?’ राजा म्हणाला, ‘ती विधवा झाली आहे’. राणीने विचारले, ‘ती दुसरे लग्न का करत नाही ?’ तेव्हा मुलगी तेथून निघून गेली. नंतर राजाने मुलीला समजावले, ‘राणीला तुझा अपमान करावयाचा नव्हता. त्यांच्या प्रथेप्रमाणे तुझे दुःख नाहीसे व्हावे; म्हणून ती तसे म्हणाली’. मुलगी म्हणाली, ‘मी त्यासाठी रडत नाही. माझ्यातच अजून काहीतरी न्यून आहे. राणीच्या मनात असा विचार का आला नाही की, ही मारवाडची दुसरी मीरा का बनत नाही ?’

वेशभूषेचा विचारांवर होणारा परिणाम

एकदा एक बहुरूपी राजाच्या राजसभेत गेला. दुसरी वेशभूषा केल्यावर ओळखता न आल्यास त्याला ५०० मोहरा देण्याचे राजाने मान्य केले. एकदा तो बहुरूपी राजसभेत साधूच्या वेशात आला. साधूचे नाटक त्याने अतिशय उत्कृष्ट केले. राजाने त्यालाच साधू समजून ५००० मोहरा दिल्या. साधूने त्या मोहरा न स्वीकारता केवळ राजाला आशीर्वाद दिला आणि तो निघून गेला. थोड्या वेळाने बहुरूपी परत नेहमीच्या वेशात आला आणि त्या ५०० मोहरा मागू लागला. राजाला आश्‍चर्य वाटले. त्याने त्याला विचारले, तू मगाशी, म्हणजे साधूच्या रूपात असतांना त्या ५०० मोहरा का स्वीकारल्या नाहीस ? बहुरूप्याने उत्तर दिले, मी साधूच्या रूपात असतांना मला पूर्ण वैराग्यच प्राप्त झाले होते. त्यामुळे मला मोहरा घेण्याची इच्छाच झाली नाही.

अवतारांचे कारण म्हणजे भगवंताचे भक्तांवरील प्रेम !

एकदा अकबराने बिरबलाला विचारले, लहानसहान गोष्टींसाठी तुमचा भगवान नेहमी अवतार का घेतो ? बिरबल तेव्हा शांत बसला. नंतर बिरबलाने अकबराच्या ४ मासांच्या मुलाचा मेणाचा पुतळा (मुलगा) बनवला. त्याला अकबराच्या मुलाचेच कपडे घातले आणि नावेतून येतांना दासीला (दाईला) सांगितले, नाव हलावयास लागली की, मेणाच्या पुतळ्याला नदीत टाक आणि तोबा तोबा असे ओरड. ती तसे ओरडल्यावर अकबराने त्वरित नदीत उडी टाकली. बघतो तर मेणाचा मुलगा. बिरबलाने विचारले, ‘मी होतो ना ! मला सांगितले असते, तर मी उडी मारली असती’. तेव्हा अकबर म्हणाला, ‘माझ्या हृदयाचा तुकडा पाण्यात पडल्यावर विचार करायला मला वेळ नव्हता’. तेव्हा बिरबल म्हणाला, ‘भगवंतही आपल्या भक्ताला स्वतःच्या हृदयाचा तुकडा समजतो; म्हणून त्याला वाचवण्यासाठी तो नेहमी अवतार घेत असतो’.

हुशार राजा

फ्रान्समधील एका शेतक-याने त्याच्या शेतात आलेला सर्वांत मोठा भोपळा ५० कि.मी. अंतर चालत जाऊन फ्रान्सचा राजा लुई याला त्याच्या राजसभेत (दरबारात) प्रेमाने भेट दिला. राजाने त्याला एक सहस्र क्रोन बक्षीस दिले. हे पाहून दुसर्या दिवशी राजसभेतील एका सरदाराने आपला सर्वांत उत्तम घोडा राजाला भेट दिला. राजा मनातल्या मनात समजला आणि त्याने त्या सरदाराला एक सहस्र क्रोनचा तो भोपळा बक्षीस दिला !

सर्वकाही देऊन राजाला जर एवढा आनंद होतो, तर ते घेण्यात काहीच अर्थ नाही, हे समजल्याने शिष्य पुन्हा स्वतःच्या गुरूंकडे जाणे

‘पहाटेच्या वेळी तू राजाला जाऊन भेट. तो तुला हवे ते देईल’, असे एका गुरूंनी शिष्याला सांगितले. शिष्य भेटायला गेल्यावर राजा म्हणाला, ‘तू माझे राज्य जरी मागितलेस, तरी मी ते तुला देईन’. शिष्य म्हणाला, ‘मला तुझ्यापाशी असलेले सर्व दे. राजाने त्याला राज्य दिले’. त्यावर तो शिष्य म्हणाला, ‘मी तुझ्यापाशी असलेले सर्व मागितले आहे. त्यामुळे केवळ अंगावरच्या कपड्यानिशी मी तुला या महालातून बाहेर जाऊ देईन’. राजा आनंदित झाला. त्याने कृतज्ञतेने देवाचे आभार मानले; कारण गेली ३० वर्षे तो देवाला त्यासंदर्भात भावपूर्ण प्रार्थना करत होता. त्याची अवस्था पाहून शिष्य विचारात पडला, ‘सर्वकाही देऊन राजाला जर एवढा आनंद होतो, तर ते घेण्यात काय अर्थ आहे’. शिष्याने राजाला त्याचे राज्य परत दिले आणि तो पुन्हा आपल्या गुरूंकडे परतला.

– पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका)

Leave a Comment